चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०३ सप्टेंबर २०२१

Date : 3 September, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
‘फोर्ब्स’कडून मराठी उद्योजकाचा सन्मान; जागतिक अब्जाधीशांच्या यादीत पुण्याच्या आनंद देशपांडेंचा समावेश :
  • पुण्यातील पर्सिस्टंट सिस्टीम या कंपनीचे सर्वेसर्वा आनंद देशपांडे यांच्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा खोवण्यात आलाय. देशपांडे यांचा गुरुवारी जगभरातील अब्जाधीशांच्या यादीत समावेश करण्यात आलाय. सर्वसामान्य कुटुंबामधून पुढे आलेलं नेतृत्व म्हणून देशपांडे यांच्याकडे पाहिलं जातं. देशपांडे यांच्या कंपनीमधील संपत्तीचा वाटा हा एक अब्ज डॉलर्सहून अधिक असल्याचं ‘फोर्ब्स’ने म्हटलं आहे.

  • महाविद्यालयीन शिक्षणानंतर अमेरिकेमध्ये चांगल्या नोकरीच्या आशेने गेलेले देशपांडे वयाच्या २८ व्या वर्षी पुन्हा मायदेश परत आले आणि त्यांनी स्वत:चा उद्योग सुरु केला. अमेरिकेमध्ये काम करताना जमवलेले २१ हजार डॉलर्सच्या भांडवलावर त्यांनी उद्योग सुरु केला. यामध्ये त्यांना त्यांचे वडील दादा देशपांडे यांनीही काही आर्थिक मदत केली आणि पार्सिस्टंट कंपनीची स्थापना झाली. १९९० मध्ये त्यांनी आपल्या कंपनीची स्थापना केली.

  • फोर्ब्सनुसार आज पर्सिस्टंटचे वार्षिक उत्पन्न हे ५६.५ कोटी डॉलर इतकं आहे. ही कंपनी डेटा मॅनेजमेंट, डिजिटसल इंजिनीअरिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात काम करते. देशपांडे यांनी पाच सहकाऱ्यांच्या मदतीने सुरु केलेल्या या कंपनीत आता १४ हजारांहून अधिक इंजीनीयर्स आणि कर्मचारी काम करतात. जगभरातील ४५ देशांमधील कर्मचारी थेट किंवा अप्रत्यक्षरित्या या कंपनीचा भाग आहेत.

  • मार्चमध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात कंपनीने आपल्या आर्थिक उलाढालीमध्ये १३ टक्क्यांची वाढ नोंदवली असून नफ्यामधील वाढ ही ३८ टक्के इतकी आहे. समोर आलेल्या माहितीनुसार देशापांडेंच्या कल्पनेतून साकारलेल्या या कंपनीने मागील आर्थिक वर्षात ६.२५ कोटी डॉलर्सचा नफा मिळवला आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये १४९ टक्क्यांनी वाढ झाल्याने कंपनीला नफा होतोय.

तालिबान आज स्थापन करणार सरकार!; संपूर्ण जगाचं लक्ष :
  • अफगाणिस्तानमधील सत्ता हस्तगत करुन दोन आठवडे झाल्यानंतर तालिबानकडून आता सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तालिबान शुक्रवारच्या प्रार्थनेनंतर सरकार स्थापन करणार आहे. तालिबानने १५ ऑगस्टला काबूलचा ताबा मिळवल्यानंतर अफगाणिस्तानची सत्ता आपल्या हातात घेतली. अमेरिकी सैन्य परतल्यानंतर तालिबानने आपला विजय घोषित केला असून इतक्या दशकांच्या युद्धानंतर देशात शांतता आणि सुरक्षा प्रस्थापित करण्याचं आश्वासन दिलं आहे. इंडिया टुडेने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

  • अमेरिकी सैन्य माघारी परतल्यानंतर संपूर्ण देशाचा ताबा मिळवणारं तालिबान सध्या देशाचं सरकार चालवण्याची तयारी करत आहे. सध्या अफगाणिस्तानात मोठ्या प्रमाणात आर्थिक संकट असून हे सरकार पूर्णपणे आंतरराष्ट्रीय मदतीवर अवलंबून असणार आहे.

  • अफगाणिस्तान दुष्काळाशी लढत आहे असून जवळपास २ लाख ४० हजार नागरिकांना संघर्षापोटी आपला जीव गमवावा लागला आहे. अशा परिस्थितीत आंतरराष्ट्रीय देणगीदार आणि गुंतवणूकदारांच्या दृष्टीने नवीन सरकारची वैधता अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण ठरेल. तालिबानने देशात अडकलेल्या विदेशी नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर जाऊ देण्याचं आश्वासन दिलं आहे. पण काबूल विमानतळ अद्यापही बंद असल्याने अनेक लोक शेजारच्या देशांमध्ये पलायन करत आहेत.

महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेत अखिल मराठी बुद्धिबळ संघटना विलीन :
  • महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेने बोलविलेल्या ऑनलाईन विशेष सर्वसाधारण सभेमध्ये महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेमध्ये अखिल मराठी बुद्धिबळ संघटनेचे विलीनीकरण झाले. त्याचबरोबर महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या अध्यक्षपदी भंडाऱ्याचे डॉक्टर परिणय फुके यांची एकमताने निवड करण्यात आली. तर माजी अध्यक्ष पुण्याचे सिद्धार्थ मयूर यांची कार्याध्यक्ष म्हणून सर्वानुमते निवड झाली. सांगलीच्या अनिल ताडे यांची मुख्य कायदे सल्लागार म्हणून निवड करण्यात आली. तसेच या सभेमध्ये राज्यातील ३६ जिल्ह्यांपैकी पैकी २७ जिल्ह्यांतील जिल्हा बुद्धिबळ संघटनाना संलग्नता देण्यात आली.

  • महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे माजी अध्यक्ष सिद्धार्थ मयूर यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे नवीन अध्यक्ष, कार्याध्यक्ष व कायदे सल्लागार निवडण्यासाठी आणि संलग्न जिल्हे निश्चित करण्यासाठी ही ऑनलाइन विशेष सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली होती.

  • अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेमध्ये दीर्घकाळ चाललेल्या आरोप, प्रत्यारोप, कोर्ट कचेरीच्या वादानंतर ४ जानेवारी २०२१ रोजी ऑनलाइन पद्धतीने निवडणूक झाली यामध्ये संजय कपूर व भरतसिंग गटाची सरशी झाली होती. यानंतर अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेच्या नव्या कार्यकारिणीने महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेला संलग्नता दिली. अध्यक्ष संजय कपूर व सचिव भरतसिंग चव्हाण यांनी अखिल मराठी बुद्धिबळ संघटनेला, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेत विलीन करून घेऊन दोन्ही संघटनानी एकत्र काम करण्याची विनंती केली होती. त्यानुसार दोन्ही संघटनेने त्रिसदस्यीय समिती नेमून विलीनीकरण प्रक्रीया यशस्वीरित्या राबविली.

11th Admissions Maharashtra: प्रवेशासाठी लागणाऱ्या ‘या’ महत्वाच्या प्रमाणपत्राशिवाय आता मिळणार प्रवेश :
  • राज्यात १० वीचा निकाल लागल्यापासून सर्वत्र ११वीच्या प्रवेश प्रक्रीयेबद्दल चर्चा सुरु आहे. प्रवेश प्रक्रिया म्हंटल की प्रवेशासाठी कागदपत्रे,आवश्यक प्रमाणपत्र जमा करावी लागतातच. अनेकदा या गोष्टीमुळे मुलांना प्रवेशापासून मुकावं लागत. हे यंदाच्या वर्षी होऊ नये म्हणून शालेय शिक्षण विभागानं यासंदर्भात दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.

  • शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भात सोशल मीडियावरून पोस्ट करत घोषणा केली आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे जात प्रमाणपत्र नसेल ते विद्यार्थी तात्पुरत्या स्वरुपात वडिलांचं जात प्रमाणपत्र सादर करु शकतात.

  • प्रवेशाच्या वेळी ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडे स्वतःचं जात प्रमाणपत्र (Caste Certificate) नाही अशा विद्यार्थ्यांना हे प्रमाणपत्र बनवण्यासाठी सरकारकडून ३० दिवसांची मुदत देण्यात येणार आहे. मात्र यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. एकदा विद्यार्थ्यांच्या नावाचं जात प्रमाणपत्र आलं की विद्यार्थ्यांना ते कॉलेजमध्ये सबमिट करावं लागणार आहे.

उंच उडीमध्ये आशियाई विक्रमासहीत प्रवीण कुमारची रौप्यपदकाला गवसणी; भारताचं ११ वं पदक :
  • टोक्यो पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेमधील भारतीय चमूची ड्रीमरन सुरु असून आज उंच उडी प्रकारामध्ये प्रवीण कुमारने रौप्यपदकावर आपलं नाव कोरलं आहे. पुरुष उंच उडी टी ६४ प्रकारामध्ये प्रवीणने ही कामगिरी केलीय. या स्पर्धेमधील भारताचं हे ११ वं पदक ठरलं आहे.

  • ग्रेट ब्रिटनच्या जॉनथन ब्रूम एडवर्ड्स आणि प्रवीणमध्ये सुवर्णपदकासाठी अगदी अटीतटीची लढत पहायला मिळाली. पहिल्या प्रयत्नात प्रवीणने १.८८ मीटरची उडी मारत पहिलं स्थान पटकावलं. नंतर दुसऱ्या प्रयत्नात त्याने १.९३ मीटरची उडी मारली. इथून एडवर्ड्स आणि प्रवीणमध्ये अटीतटीचा सामना सुरु झाला. तिसऱ्या प्रयत्नात प्रवीणने १.९७ मीटरची उडी मारली. त्याला ब्रिटनच्या एडवर्ड्सने आणि पोलंडच्या मिसीज लिपिएटोने कडवी झुंज दिली.

  • पुढील प्रयत्नात प्रवीण आणि लिपिएटो दोघांनी २.०४ मीटर उडी मारली. त्यापाठोपाठ एडवर्ड्सनेही ही कामगिरी करत पदकासाठीची चुरस आणखीन वाढवली. पुढील प्रयत्नात प्रवीणने २.०७ मीटरची उडी मारत आशियाई विक्रम स्वत:च्या नावे केला. अंतिम पदकासाठी एडवर्ड्स आणि प्रवीण यांच्यामध्ये चुरस रंगली. मात्र येथे एडवर्ड्सने २.१० मीटर उडी मारत सुवर्णपदकावर नाव कोरलं.

मेधा कुलकर्णी यांची पंतप्रधानांशी चर्चा :
  • भाजपच्या माजी आमदार व भाजपच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष मेधा कुलकर्णी यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी  भेट घेतली. या वेळी त्यांनी राज्यातील विशेषत: पुण्यातील करोनाच्या परिस्थितीचीही माहिती दिली.

  • करोनाच्या काळात विधवा झालेल्या महिलांना मदत करण्यासंदर्भात केंद्राने राज्य सरकारला आदेश द्यावेत, अशी विनंती कुलकर्णी यांनी मोदींकडे केली. या विधवांना एकरकमी पाच लाख रुपये वा दरमहा पाच हजार रुपयांची पेन्शन दिली जाऊ  शकते, असा मुद्दा त्यांनी पत्रकारांशी बोलताना मांडला. पुण्यातील लसीकरणाचा वेग वाढवण्याची गरज त्यांनी व्यक्तकेली.

  • शनिवारवाड्याचा जीर्णोद्धार करण्यासंदर्भात मेधा कुलकर्णी यांनी मोदींना निवेदन दिले. मेधा कुलकर्णी यांनी संघटना महासचिव बी. एल. संतोष यांचीही भेट घेतली.

०३ सप्टेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.