चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०३ सप्टेंबर २०२०

Date : 3 September, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
नरेंद्र मोदी यांचं ट्विटर अकाऊंट हॅक; देणगी म्हणून बिटक्वाईन देण्याचं केलं आवाहन :
  • देशात दररोज असंख्य सायबर गुन्हे घडत आहेत. आर्थिक फसवणुकीपासून ते सोशल मीडिया अकाऊंट हॅक होण्यापर्यंत. पण, आता चक्क देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तिक वेबसाईटचं (संकेतस्थळ) ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आल्याची घटना घडली आहे. हॅकरनं नरेंद्र मोदी यांच्या नावे असलेलं ट्विटर अकाऊंट हॅक केलं आणि पीएम केअर फंडासाठी डोनेशन म्हणून हॅकरनं चक्क बिटक्वाइन देण्याची मागणी केली. हॅकरनं हे ट्विट नंतर लगेच डिलीट करण्यात आलं.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वैयक्तिक वेबसाईटचं ट्विटरवर अकाऊंट आहे. पंतप्रधान मोदी यांच्या वेबसाईटचं ट्विटरवर narendramodi_in नावानं अकाऊंट आहे. हे अकाऊंटच हॅक करण्यात आल्याची घटना घडली.

  • पंतप्रधान मोदी यांच्या वेबसाईटचं ट्विटर अकाऊंट हॅकरनं हॅक केलं. त्यानंतर क्रिप्टो करन्सीसंदर्भातील ट्विट केले गेले. एक ट्विट करण्यात आलं की, मी सगळ्यांना आवाहन करतो की, कोविड-१९ साठी बनवण्यात आलेल्या पीएम रिलीफ फंडाला मदत करा.

  • हॅकरनं पहिल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं की, कोविड-१९साठी उभारण्यात आलेल्या पीएम केअर फंडाला उदारपणे देणगी द्यावी, असं आवाहन मी करतो. आता भारतात क्रिप्टो चलनाला करन्सी सुरूवात होतोय. कृपया देणगी म्हणून बिटक्वाईन दान करावे. -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अधिकृत ट्विट,” असं पहिलं ट्विट करण्यात आलं.

राज्यातील पोलीस दलात मोठे फेरबदल; २५ वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली :
  • राज्यातील पोलीस दलात आज (बुधवार) मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. राज्याच्या गृहविभागाकडून २५ अतिवरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. वसई-विरारच्या पोलीस आयुक्तपदी आयपीएस अधिकारी सदानंद दाते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांनी मुंबई गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्तपदही भूषवलं आहे. तर रजनीश सेठ यांनी राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांच्याकडे अप्पर पोलीस महासंचालक (कायदा सुव्यवस्था) या पदाची जबाबदारी होती.

  • दरम्यान, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीयांपैकी एक समजल्या जाणाऱ्या पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याकडे नागरी संरक्षण विभागाच्या प्रमुखपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

  • गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या चर्चा सुरु होत्या. त्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला. राजेंद्र सिंह यांच्याकडे अप्पर पोलीस महासंचालक, कायदा व सुव्यवस्था मुंबई या पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर आशुतोष डुंबरे यांच्याकडे राज्य गुप्तवार्ता विभाग, महाराष्ट्र मुंबई या पदाच्या आयुक्तपदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे.

  • यापूर्वी त्यांच्याकडे अँटी करप्शन विभाग मुंबईच्या अप्पर पोलीस महासंचालकपदाची जबाबदारी होती. अमितेश कुमार यांच्याकडे नागपूरच्या पोलीस आयुक्तपदाची तर जय जित सिंह यांच्याकडे अँटी करप्शन विभागाच्या अप्पर महासंचालक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

चीनकडे जगातील सर्वात मोठे नौदल, युद्धनौकांमध्ये अमेरिकेला टाकलं मागे :
  • विस्तारवादी दृष्टीकोन बाळगणारा चीन सातत्याने आपली लष्करी ताकत वाढवत चालला आहे. सध्याच्याघडीला चीनकडे जगातील सर्वात मोठे नौदल आहे. या समुद्री शक्तीच्या बळावर चीनकडून इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील विविध भागात आपल्या नौदलासाठी तळ उभारण्याचे प्रयत्न सुरु आहेत. रणनितीच्या दृष्टीकोनातून पाहिल्यास प्रतिस्पर्धी देशांवर कुरघोडी करण्याचा चीनचा उद्देश आहे. दक्षिण चीन समुद्र त्याचे चांगले उदहारण आहे.

  • पुढच्या दशकभरात अणवस्त्रांची संख्या दुप्पट करण्याचेही चीनने लक्ष्य ठेवले आहे. चीनकडे असलेली दीर्घ पल्ल्याची क्षेपणास्त्रे, अण्वस्त्र पाणबुडया, एअर डिफेन्स सिस्टिम, अवकाश आणि इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर क्षमता याचा पेंटागॉनने अभ्यास करुन त्यासंबंधीचा सविस्तर अहवाल अमेरिकन काँग्रेसला मंगळवारी सादर केला. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

  • लडाखमध्ये सुरु असलेला ताजा संघर्ष तसेच हिंदी महासागर क्षेत्रातील चिनी नौदलाच्या वाढत्या हालचाली या पार्श्वभूमीवर भारत सरकारने पेंटागॉनच्या या अहवालाची गंभीर दखल घेणे आवश्यक आहे. ऑगस्ट २०१७ मध्ये आफ्रिकेतील डिजीबाऊटी येथे चीनने परदेशातील पहिला लष्करी तळ स्थापन केला. चिनी नौदलाकडून या तळाचे संचालन केले जाते. त्यानंतरच चिनी नौदलाच्या हिंदी महासागर क्षेत्रातील हालचालीत वाढ झाली. त्याशिवाय पाकिस्तानातील कराची, ग्वादर बंदरातही चीनचा कुठल्याही आडकाठीशिवाय मुक्तपणे वावर सुरु असतो.

भारताने मोडला स्वतःचाच विक्रम; जागतिक उच्चांकी रुग्णसंख्येची नोंद :
  • मार्चपासून देशात शिरकाव केलेल्या करोना विषाणूनं भारतात हातपाय पसरले आहेत. देशातील अनेक राज्यांची स्थिती करोनाशी लढा देताना गंभीर बनली आहे. विशेषतः मागील काही महिन्यात देशातील रुग्णसंख्ये स्फोटक वाढ झाली असून, दिवसेंदिवस संकट गंभीर बनत चाललं आहे. त्यातच आता करोनाशी लढा देत असलेल्या भारतानं दुर्दैवानं स्वतःचाच मोडला. जगात एका दिवसात सर्वाधिक रुग्ण आढळून आल्याची विक्रम नोंद भारताच्या नावे होती.

  • बुधवारी (२ सप्टेंबर) देशात जागतिक विक्रमाला मागे टाकेल इतके रुग्ण आढळून आले. एका दिवसात रुग्णसंख्येत विस्फोटक अशा वाढीची नोंद झाली. देशात ८३ हजार ८८३ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. या वाढीबरोबरच जगात एका दिवसात इतके रुग्ण आढळून येणाऱ्या देशांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. यापूर्वी या स्थानी भारतच होता. आतापर्यंत तिसऱ्यांदा भारतात ८० हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत. चिंतेची बाब म्हणजे मागील चार दिवसांतच इतक्या मोठ्या प्रमाणात हे रुग्ण आढळून आले आहेत.

  • मागील २४ तासात देशातील करोना रुग्णांच्या संख्येत ८३ हजार ८८३ नवीन रुग्णांची भर पडली. त्याबरोबर १ हजार ४३ जणांचा मृत्यू झाला आहे. नवीन रुग्णसंख्येमुळे देशातील एकूण करोना रुग्णांची संख्या ३८ लाख ५३ हजार ४०७ इतकी झाली आहे. यात ८ लाख १५ हजार ५३८ रुग्ण उपचार घेत आहेत. तर २९ लाख ७० ४९३ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. 

“मोदीजींचा ‘तो’ भारत म्हणजे मजूर, शेतकरी, छोटे व्यासायिक मुक्त भारत” :
  • काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारनं घेतलेल्या निर्णयांवरून हल्लाबोल सुरू केला आहे. जीडीपीची ऐतिहासिक घसरण, डबघाईस आलेली अर्थव्यवस्था यासाठी मोदी सरकारला दोषी ठरवत राहुल गांधी यांनी ‘अर्थव्यवस्था की बात’ सुरू केली असून, दुसऱ्या भागात पंतप्रधान मोदी यांच्यावर नोटबंदीच्या निर्णयावरून टीकेची तोफ डागली आहे.

  • राहुल गांधी यांनी ‘अर्थव्यवस्था की बात’ व्हिडीओ मालिकेतील दुसरा व्हिडीओ ट्विट केला आहे. “मोदीजींचा कॅशमुक्त भारत म्हणजे मजूर, शेतकरी, छोटे व्यापारी मुक्त भारत आहे. जो फासा ८ नोव्हेंबर २०१६ रोजी टाकण्यात आला होता, त्याचा भयंकर परिणाम ३१ ऑगस्ट २०२० रोजी समोर आला आहे.

  • जीडीपी घसरण्याबरोबरच नोटबंदीनं देशाची असंघटित अर्थव्यवस्था तोडली,” असं राहुल गांधी यांनी व्हिडीओ ट्विट करताना म्हटलं आहे.

०३ सप्टेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.