चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०३ ऑक्टोबर २०२०

Date : 3 October, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
मोबाइल फोन महागणार :
  • केंद्र सरकारकडून मोबाइल फोनसाठी वापरात येणाऱ्या प्रदर्शन काचपट्टीच्या अर्थात ‘डिस्प्ले’चे आयातशुल्क ३ टक्क्यांनी वाढवून ते १० टक्क्यांवर नेण्याचा विचार सुरू असून, त्यामुळे फोनच्या किमती वाढतील, असे ‘इंडियन सेल्युलर अँड इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशन (आयसीईए)’ या संघटनेने शुक्रवारी स्पष्ट केले.

  • आयसीईएचे राष्ट्रीय अध्यक्ष पंकज महिंद्रू यांच्या मते, मोबाइल फोनच्या किमती किमान दीड ते कमाल तीन टक्क्यांनी वाढू शकतील. मुख्यत्वे, अ‍ॅपल, हुआवे, शाओमी, विवो आणि विन्स्ट्रॉन या नाममुद्रांचे फोन महागण्याची शक्यता दिसून येते.

‘एच १ बी’ व्हिसा बंदी आदेशास अमेरिकी न्यायालयाची स्थगिती :
  • अमेरिकी न्यायालयाने एच १ बी व्हिसावर घालण्यात आलेल्या तात्पुरत्या बंदीच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली आहे. अध्यक्ष ट्रम्प यांनी हा आदेश जारी करताना त्यांच्या घटनात्मक अधिकारांचे उल्लंघन केले आहे, असे सांगून न्यायालयाने ट्रम्प प्रशासनाला चपराक दिली.

  • व्यापार व अंतर्गत सुरक्षा मंत्रालय यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर ‘नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट ऑफ कॅलिफोर्निया’चे न्यायाधीश जेफ्री व्हाइट यांनी हा निकाल दिला.  व्हीसा बंदीमुळे अनेकउत्पादक कंपन्यांना आर्थिक दुरवस्था असताना महत्त्वाची पदे भरणे कठीण झाले होते, असे राष्ट्रीय उत्पादक संघटनेने म्हटले आहे.

  • जूनमध्ये ट्रम्प यांनी एच १ बी व्हिसावर तात्पुरती बंदी घालणारा वटहुकूम जारी केला. अमेरिकेतील अनेक कंपन्या एच १ बी व्हिसावरील भारतीय व चिनी कर्मचाऱ्यांना नोकऱ्या देत असतात. त्यात अनेक नोकऱ्या या उच्च कौशल्यावर आधारित असतात.

  • एच २ व्हिसा हे कृषीतर हंगामी कामगारांना दिले जातात. तर जे व्हिसा हे सांस्कृतिक आदानप्रदानासाठी वापरले जातात. एल व्हिसा हे व्यवस्थापक व बहुराष्ट्रीय कंपन्यांतील व्यवस्थापक पदावरील कर्मचाऱ्यांसाठी वापरले जातात. या सर्व प्रकारच्या व्हिसांवर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षअखेरीपर्यंत बंदी घातली होती.

‘पीएनबी’प्रकरणी नवे आरोपपत्र :
  • जवळपास २.६३ कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता गोळा केल्याप्रकरणी सीबीआयने पंजाब नॅशनल बँकेचे (पीएनबी) निवृत्त उपव्यवस्थापक गोकुळनाथ शेट्टी आणि त्यांच्या पत्नीविरुद्ध नव्याने आरोपपत्र दाखल केले आहे, असे शुक्रवारी अधिकाऱ्यांनी सांगितले.

  • पीएनबी बँकेत १३ हजार कोटी रुपयांचा घोटाळा करणारे नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांना शेट्टी याने मदत केली होती.

  • शेट्टी आणि इंडियन बँकेत कारकून असलेली त्यांची पत्नी आशालता यांनी २०११ ते १७ या कालावधीत ४.२८ कोटींची मालमत्ता गोळा केली. याप्रकरणी सीबीआयने त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचे आरोप ठेवले. एकूण मालमत्तेपैकी २.६३ कोटींच्या मालमत्तेबाबत ते समाधानकारक स्पष्टीकरण देऊ शकले नाही, असे सीबीआयने म्हटले आहे.

ज्येष्ठ नाट्य समीक्षक, विचारवंत प्रा. पुष्पा भावे यांचे निधन :
  • ज्येष्ठ नाट्य समीक्षक, विचारवंत आणि प्रभावी वक्त्या प्रा. पुष्पा भावे यांचं आज (शनिवारी) मध्यरात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास दीर्घ आजाराने मुंबईत निधन झालं, त्या ८१ वर्षांच्या होत्या. शिवाजीपार्क स्माशानभूमीत त्यांच्यावर अंत्यंस्कार करण्यात येणार आहेत.

  • राष्ट्र सेवा दलाचे संस्कार आणि पुरोगामी विचारवंत असलेल्या पुष्पा भावे या मुंबईच्या रुईया महाविद्यालयातून प्राध्यापिका म्हणून निवृत्त झाल्या होत्या. नाट्य समीक्षक आणि परखड विचारसरणी असलेल्या भावे यांनी संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, दलित पँथर, देवदासी मुक्ती अशा चळवळींमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला होता.

  • प्रा. पुष्पा भावे यांच्या निधनामुळे खंबीर स्त्रीवादी कार्यकर्त्या आणि शोषितांचा आवाज शांत झाल्याची भावाना व्यक्त होत आहे.

भारतीय महिलांची तिसऱ्या स्थानावर झेप :
  • भारतीय महिला क्रिकेट संघाने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रमवारीत न्यूझीलंडला मागे टाकत तिसरं स्थान पटकावलं आहे. आयसीसीने शुक्रवारी महिला क्रिकेट संघांसाठी नवी क्रमवारी जाहीर केली. या क्रमवारीत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या संघाने आपलं पहिलं आणि दुसरं स्थान कायम राखलं आहे. ऑस्ट्रेलियन महिला संघाच्या खात्यात २९१ तर इंग्लंड महिला संघाच्या खात्यात २८० गुण जमा आहेत.

  • फेब्रुवारीत ऑस्ट्रेलियात झालेल्या महिला टी-२० विश्वचषकाची अंतिम फेरी गाठणारा भारतीय महिला संघ २७० गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. न्यूझीलंडचा संघ आणि भारताचा संघ यांच्यात फक्त एका गुणाचा फरक आहे.

  • भारतीय महिला संघाच्या खेळाडू सध्या युएईत महिला आयपीएल स्पर्धा खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. ४ ते ९ नोव्हेंबर या कालावधीत बीसीसीआय युएईत ३ संघांमध्ये ही स्पर्धा खेळवणार असल्याचं समजतंय.

०३ ऑक्टोबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.