चालू घडामोडी आणि दिनविशेष - 03 मे 2023

Date : 3 May, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
आशिया चषक तिरंदाजी स्पर्धा : भारतीय तिरंदाजांकडून चार पदके निश्चित
  • भारतीय तिरंदाजांनी जागतिक मानांकन फेरीचा दर्जा असलेल्या आशिया चषक तिरंदाजी स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात पहिल्याच दिवशी चार पदके निश्चित केली. रिकव्‍‌र्ह आणि कम्पाऊंड या दोन्ही प्रकारांत भारताच्या पुरुष व महिला संघांनी सांघिक स्पर्धा प्रकारात अंतिम फेरी गाठली.
  • रिकव्‍‌र्ह प्रकारात झालेल्या पुरुषांच्या सांघिक गटातील उपांत्य फेरीत अग्रमानांकित भारताच्या मृणाल चौहान, तुषार शेळके आणि जयंत तालुकदार या संघाने उझबेकिस्तानच्या चेन याओ युय, मिर्यालोल कोरोव, अमिरखान साडीकोव या संघाचा एकतर्फी लढतीत ६-० (५६-५४, ५७-५४, ५६-५३) असा पराभव केला. त्यापूर्वी, भारतीय संघाने किर्गिस्तानला ६-० अशाच फरकाने नमवले होते. सुवर्णपदकासाठी भारताची चीनशी गाठ पडणार आहे.
  • महिला विभागात संगीता, प्राची सिंग आणि तनिशा वर्मा या उदयोन्मुख भारतीय तिरंदाजांनी उझबेकिस्तानच्याच संघाचा संघर्षपूर्ण लढतीत ‘टायब्रेकर’मध्ये ५-४ असा पराभव केला. त्यापूर्वी उपांत्यपूर्व फेरीत भारतीय संघाने सौदी अरेबियाचे आव्हान ६-० असे संपुष्टात आणले होते. महिला संघही अंतिम लढतीत चीनशी खेळेल.
  • कम्पाऊंड विभागात भारताच्या पुरुष संघाला उपांत्य फेरीत पुढे चाल मिळाली. त्यापूर्वी अभिषेक वर्मा, कुशल दलाल, अमित गोटे यांच्या भारतीय संघाने सौदी अरेबियावर २३६-२३१ अशी मात केली होती. विजेतेपदासाठी भारताचा हाँगकाँगशी सामना होईल. परणीत कौर, प्रगती आणि रजनी मार्को या महिला संघाने कम्पाऊंड प्रकारात पात्रता फेरीत अव्वल क्रमांकासह यापूर्वीच अंतिम फेरी गाठली आहे. या स्पर्धेत बलाढय़ कोरियाने माघार घेतली असून, त्याचा फायदा भारतीय खेळाडूंनी अचूक उठवला. विशेष म्हणजे भारतानेही दुसऱ्या फळीचा संघ पाठवला आहे.
Reliance Jio ने लॉन्च केलं ‘हे’ डिव्हाईस, घरबसल्या घेता येणार IPL चा स्टेडियमसारखा आनंद; जाणून घ्या किंमत अन्…
  • Reliance Jio ने आपला एक नवीन VR हेडसेट लॉन्च केला आहे. जो ३६० डिग्री अँगलसह येतो. हा एक नवीन स्मार्टफोनवर आधारित असलेला बेस व्हर्च्युअल रिऍलिटी हेडसेट आहे. ज्याला Jiodrive VR हेसदेत असे नाव देण्यात आला आहे. जिओच्या वेबसाइटनुसार वापरकर्ते नवीन जिओ हेडसेटसह यावर्षी IPL चा आनंद घेऊ शकणार आहेत.
  • VR हेडसेटच्या मदतीने वापरकर्त्यांना आयपीएल पाहताना फोनवरच स्टेडियमसारखा अनुभव मिळणार आहे. जिओच्या स्पेशल जिओ सिनेमामध्ये VR हेडसेट स्पोर्टचे फिचर आहे. ज्यामुळे वापरकर्त्यांना वेगवेगळ्या कॅमेरा अँगलच्या मदतीने स्टेडियमसारखी मॅच पाहता येणार आहे.

JioDive VR चे फीचर्स

  • JioDive VR हा हेडसेट ६.७ इंच स्क्रीन असलेल्या स्मार्टफोनसह काम करेल. JioDive VR हेडसेट वाईड रेंज असलेल्या स्मार्टफोनशी कनेक्ट केला जाऊ शकतो. यामध्ये आयफोन आणि अँड्रॉइड स्मार्टफोनचा यांचा समावेश आहे. यामध्ये वापरकर्त्यांना ४.७ इंचाचे आणि ६.७ -इंचाचे स्मार्टफोन वापरता येणार आहेत. हा फोन Android 9 आणि त्यावरील व्हर्जनवर काम करेल. तसेच तो iOS 15 ला देखील सपोर्ट करेल.JioDive VR हेडसेट Samsung, Apple, OnePlus, Realme, Vivo, Xiaomi, Poco, Nokia या कंपन्यांच्या स्मार्टफोनला सपोर्ट करणार आहे. नवीन JioDive VR साठी, वापरकर्त्यांना jioImmerse अ‍ॅप डाउनलोड आणि इन्स्टॉल करणे आवश्यक आहे.

JioDive VR ची किंमत

  • Jio च्या नवीन JioDive VR हेडसेटची किंमत १,२९९ रुपये आहे. ग्राहकांना Jio VR हेडसेट ब्लॅक या रंगत खरेदी करता येणार आहे. हा हेडसेट Jio च्या अधिकृत वेबसाइट आणि JioMark वरून खरेदी केला जाऊ शकतो.
सुदानमधून आतापर्यंत १ लाख नागरिकांचे स्थलांतर
  • सुदानमधील अंतर्गत संघर्षांमुळे आतापर्यंत १ लाख स्थानिकांनी देशाबाहेर स्थलांतर केल्याची माहिती संयुक्त राष्ट्रांच्या अधिकाऱ्यांनी दिली. त्याशिवाय देशांतर्गत पातळीवर ३ लाख ३० हजारांपेक्षा जास्त नागिरकांनी आपापले घरदार सोडून दुसरीकडे आश्रय घेतला आहे. सुदानमधील हिंसाचारात आतापर्यंत किमान ४३६ सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला आहे आणि बाराशेपेक्षा जास्त जखमी झाले आहेत.
  • सुदानची सत्ता ताब्यात राखण्यासाठी जनरल अब्देल फताह अल-बुऱ्हान यांच्या नेतृत्वातील सैन्य (एसएएफ) आणि जनरल मोहम्मद हमदान दगालो यांच्या नेतृत्वाखालील निमलष्करी दल (आरएसएफ) या दोन गटांमध्ये १५ एप्रिलपासून हिंसक संघर्ष सुरू आहे. दोन्ही गटांनी शस्त्रविराम मान्य केला असला तरीही हिंसा थांबलेली नाही. राजधानी खार्तुम आणि इतर शहरांमध्ये बंदुकांचे आणि स्फोटांचे आवाज ऐकू येत असून त्यामुळे मदतकार्यात अडथळे येत असल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या मदतकार्य अधिकाऱ्यांनी सांगितले. खार्तुमचा बराचसा भाग निर्मनुष्य झाला आहे.
  • या हिंसाचाराचा सर्वाधिक फटका गरिबांना बसला आहे. सुदानमधील जवळपास दोनतृतीयांश नागरिक आधीपासूनच बाह्य मदतीवर अवलंबून आहेत. गेल्या दोन आठवडय़ांपासून सुरू असलेल्या हिंसेमुळे त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवण्यात अडथळे येत आहेत. सुदानमधून होणाऱ्या स्थलांतरामुळे शेजारील देशांवरही ताण येत असून यातून प्रादेशिक संकट निर्माण होणार असल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सर्वाधिक स्थलांतर इजिप्तमध्ये झाले असून ४० हजारांपेक्षा जास्त नागरिक तिकडे गेले आहेत.
आज जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन! जाणून घ्या या दिवसाचं महत्त्व आणि त्यामागचा नेमका इतिहास!
  • पत्रकारितेला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटले जाते. समाजात लोकशाही टिकून ठेवण्यात प्रसारमाध्यमांचा मोलाचा हात असतो, यासाठी प्रसारमाध्यमांना स्वातंत्र्य असणे गरजेचे आहे. पत्रकारिता हे जोखमीचे काम आहे. अनेकदा सत्य जगासमोर मांडण्यासाठी पत्रकारिता करत असताना पत्रकारांवर हल्ले होतात, अनेकदा काही पत्रकारांना आपला जीव गमावावा लागतो. याची अनेक उदाहरणे जगभरात आहेत.
  • पण तरीही आपली जबाबदारी चोखपणे पार पाडण्यासाठी पत्रकार आपला जीव धोक्यात घालण्यास मागेपुढे पाहत नाहीत. पण जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या पत्रकारांचा आवाज कोणतीही शक्ती दाबू नये म्हणून म्हणून त्यांना स्वातंत्र्य असणे अत्यंत गरजेचे आहे. तरचं ते चांगल्या प्रकारे आपले काम करु शकतील. याच उद्देशाने दरवर्षी ३ मे रोजी ‘जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन’ म्हणून पाळला जातो. यानिमित्ताने पत्रकारितेतील स्वातंत्र्य, अधिकार आणि प्रसारमाध्यमांचे कायदे, नियम अधोरिखित केले जातात. तसेच आपली जबाबदारी पार पडताना प्राण गमावलेल्या पत्रकारांचे स्मरण केले जाते.

कशी झाली ‘या’ दिवसाची सुरुवात

  • साल १९९१ मध्ये प्रथमच आफ्रिकन पत्रकारांनी वृत्तपत्र स्वातंत्र्यासाठी मोहीम सुरू केली. यावेळी ३ मे रोजी वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या तत्त्वांबद्दल एक विधान जारी केले गेले, त्याला डिक्लेरेशन ऑफ विंडहोक या नावाने ओळखले जाते. यानंतर दोन वर्षांनी १९९३ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने प्रथमच ‘जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन’ साजरा करण्याची घोषणा केली. तेव्हापासून ३ मे हा ‘जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन’ म्हणून पाळला केला जातो.
  • दरवर्षी ३ मे रोजी UNESCO मार्फत ‘Guillermo Cano World Press Freedom Prize’ दिले जाते. वृत्तपत्र स्वातंत्र्यासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेला हा पुरस्कार दिला जातो. या दिवशी शाळा, महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. पत्रकारितेशी संबंधित सर्व विषयांवर वाद-विवाद आणि चर्चसत्र होतात.

यंदाची थीम

  • दरवर्षी जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिनाची थीम निश्चित केली जाते. गेल्या वर्षी जागतिक पत्रकारिता दिनाची थीम ही ‘Journalism under digital siege’ यावर आधारित होती. या वर्षी जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिनाचा ३० वा वर्धापन दिन आहे. २०२३ ची जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिनाची थीम ‘Shaping a Future of Rights: Freedom of Expression as a Driver for all other human rights’ही आहे.

पत्रकारितेचे महत्व

  • पत्रकारिता ही एक मुक्त आणि स्वतंत्र्य संस्था आहे. जी लोकांना जगभरातील माहितीशी जोडण्यास मदत करते. यामुळे लोकांना निष्पक्ष निर्णय घेण्यास, नेत्यांना जबाबदार धरण्यास आणि त्यांचे ज्ञान वाढवण्यास मदत होते. पण माहितीचा प्रवाह राखण्यासाठी जनतेने प्रसार माध्यमांना पाठिंबा देणे आणि त्यावर विश्वास ठेवणे महत्वाचे आहे.

03 मे चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.