चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०३ मार्च २०२१

Date : 3 March, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
पंतप्रधानांचे कौतुक थांबवा :
  • पश्चिम बंगालमधील काँग्रेसच्या आघाडीवरून पक्षातील अंतर्गत मतभेद आणखी तीव्र झाले असून ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील स्तुतिसुमने बंद करा’, असा हल्लाबोल लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते व पश्चिम बंगालचे प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी मंगळवारी काँग्रेसमधील बंडखोर ‘जी-२३’ गटातील नेत्यांवर केला.

  • काँग्रेसने पश्चिम बंगालमध्ये डाव्या पक्षांशी युती केली असून त्यात आता मुस्लीम धर्मगुरू अब्बास सिद्दीकी यांचा इंडियन सेक्युलर फ्रंट (आयएसएफ) हा पक्षही सहभागी झाला आहे. प्रक्षोभक विधाने करून सिद्दीकी अनेकदा वादात सापडले आहेत. त्यांचा पश्चिम बंगालमधील मुस्लीम समुदायावर प्रभाव असला तरी त्यांच्या धर्मनिरपेक्ष भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे केले गेले होते.

  • ‘जी-२३’ गटातील नेते आनंद शर्मा यांनी हाच मुद्दा उपस्थित करून काँग्रेसच्या ‘आयएसएफ’ला सहभागी करून घेण्यावर आक्षेप घेतला. काँग्रेस सर्व प्रकारच्या धर्मांधतेविरोधात नेहमी लढत आला असल्याचे ट्वीट शर्मा यांनी केले होते. पश्चिम बंगालमध्ये आघाडी करण्यासंदर्भात कार्यकारी समितीत चर्चा करायला हवी होती, असाही मुद्दा शर्मा यांनी उपस्थित केला होता. त्यावरून काँग्रेसमध्ये गांधी निष्ठावान आणि बंडखोर नेत्यांमध्ये वाद सुरू आहे.

  • अधीर रंजन चौधरी यांनी मंगळवारी बंडखोर नेते हेच मोदींचे कौतुक करून धर्माध भाजपला बळ देत असल्याचा आरोप केला. राज्यसभेचे माजी विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी जम्मूमधील संमेलनात मोदींची स्तुती केली होती. त्यावर, ‘निवडक मान्यवर काँग्रेसवासींनो (जी-२३ गट) वैयक्तिक लाभाचा मोह सोडा आणि पंतप्रधानांवर स्तुतिसुमने उधळण्यात वेळ दवडू नका.

जागतिक आरोग्य संघटनेकडून भारताच्या लसनिर्मितीची प्रशंसा :
  • भारताने कोविड १९ विषाणू प्रतिबंधक लशीचा जागतिक दर्जाचा उत्पादक म्हणून मिळवलेली क्षमता व वेळोवेळी नवप्रवर्तनाचे केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत, अशा शब्दांत जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन यांनी कोविड काळातील भारताच्या कामगिरीची प्रशंसा केली आहे.

  • ग्लोबल बायो इंडिया २०२१ या कार्यक्रमात त्यांनी सांगितले की, करोना साथीविरोधातील लढाई आता महत्त्वाच्या टप्प्यात असून अचानक युरोप व अमेरिकेत रुग्ण पुन्हा वाढत आहेत.  अनेक अनिश्चिततांचे सावट असून विषाणूचे वेगवेगळ्या  उत्परिवर्तनाचा समावेश असलेले प्रकार सामोरे येत आहेत. भारताने कोविड १९ विषाणू विरोधात लस निर्मितीत जागतिक दर्जाचा उत्पादक म्हणून नाव कमावले आहे. त्यात नवप्रवर्तनाचेही दर्शन घडवले आहे.

  • लशींच्या परिणामांचा साकल्याने अभ्यास करण्याचीही गरज आहे.  किमान ३० कोविड १९ प्रतिबंधक लशी सध्या भारतात विविध टप्प्यावर असून कोव्हॅक्सिन ही स्वदेशी बनावटीची लस बायोटेकची आहे तर ऑक्सफर्ड अ‍ॅस्ट्राझेनेकाची लस सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया या पुण्यातील कंपनीने कोव्हिशिल्ड नावाने तयार केली आहे. झायडस कॅडिलाची एक लस असून रशियाच्या स्पुटनिक ५ लशीच्या चाचण्या तिसऱ्या टप्प्यात आहेत. ही लस रेड्डीज लॅबोरेटरी तयार करीत आहे. त्यांनी आपत्कालीन परवान्यासाठी भारताच्या महा औषध नियंत्रकांकडे अर्ज केला आहे.

  • भारताने वेगवेगळ्या देशांना लशीचा पुरवठा केला असून नीती आयोगाचे आरोग्य सदस्य विनोद पॉल यांनी वैज्ञानिक समुदायाने केलेल्या कामगिरीची प्रशंसा केली आहे. करोना विषाणूवर लशी तयार करण्यात भारताने तत्परता दाखवली असे त्यांनी म्हटले आहे.  आपण वेगाने लशी तयार करू शकतो व त्याचे वितरणही करू शकतो हे यातून स्पष्ट झाल्याचे त्यांनी सांगितले.

भारताचे १२ बॉक्सिंगपटू उपांत्यपूर्व फेरीत दाखल :
  • सहा वेळा जगज्जेतेपद पटकावणारी मेरी कोम तसेच आशियाई सुवर्णपदक विजेता अमित पांघल यांच्यासह भारताच्या १२ बॉक्सिंगपटूंनी एकही लढत न खेळता बोक्साम आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. पदकापासून ते फक्त एक विजय दूर आहेत.

  • भारताचे ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेले नऊ तसेच अन्य पाच बॉक्सिंगपटू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. गेल्या वर्षी ऑलिम्पिकसाठी पात्र ठरल्यानंतर मेरी कोम (५१ किलो) पहिल्यांदाच रिंगणात उतरत आहे. तिला सलामीच्या लढतीत इटलीच्या जिओर्डना सोरेन्टिनो हिच्याशी लढत द्यावी लागेल.

  • पांघलला (५२ किलो) सलामीच्या लढतीत पुढे चाल मिळाली असून त्याची उपांत्यपूर्व फेरीत स्पेनच्या गॅब्रियल इस्कोबारशी गाठ पडणार आहे. विकास कृष्णन (६९ किलो) याला उपांत्यपूर्व फेरीत इटलीच्या विन्सेन्झो मँगीआकॅप्रे याचा सामना करावा लागेल.

  • आशीष कुमार (७५ किलो) आणि सुमित संगवान (८१ किलो) हे उत्तेजक द्रव्य सेवनप्रकरणी बंदी भोगलेले बॉक्सिंगपटू पुनरागमन करत असून सतीश कुमार (९१ किलोवरील) व संजित (९१ किलो) यांनीही उपांत्यपूर्व फेरी गाठली.

होमगार्ड करणार राज्यातील कारागृहाचे रक्षण :
  • कायदा व सुव्यवस्था कायम राहावी, यासाठी अपुरे मानधन आणि सुविधांची कमतरता असतानाही पोलिसांच्या बरोबरीने कार्यरत असलेल्या गृहरक्षक दलाच्या जवानांवर (होमगार्ड) आता आणखी एक नवीन जबाबदारी पडणार आहे.  राज्यभरातील विविध कारागृहांत त्यांना बंदोबस्ताला तैनात केले जाणार आहे.

  • विविध  गुन्ह्यांत शिक्षा भोगत असलेले  कैदी, कुख्यात गँगस्टर व कच्या कैद्यांवर देखरेख ठेवण्याचे काम दिले जाणार आहे. होमगार्ड विभागाने दिलेल्या मानधनाच्या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखविला आहे. कारागृहातील शिपायांच्या रिक्त पदांमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे  वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. राज्यात ४० हजारांवर होमगार्ड कार्यरत असून, त्यांना प्रतिदिन एकूण सरासरी ७५० रुपये मानधन आहे.

  • राज्यात नऊ मध्यवर्ती कारागृहासह  एकूण ५४ जिल्हा, अ ते ड क्षेणीतील, खुली कारागृहे आहेत. त्यांची क्षमता २४  हजार इतकी असली तरी प्रत्यक्षात ३२ हजारांवर   न्यायालयीन व शिक्षा भोगत असलेले कैदी आहेत. त्यांच्यावर देखरेख व तुरुंगातील सुरक्षा व्यवस्था कायम ठेवण्यासाठी कारागृह शिपाई नेमण्यात आले आहेत. नवीन भरती रखडल्याने त्याचा परिणाम तुरुंगातील प्रशासनावर पडत आहे. त्यामुळे  जोपर्यंत पदे भरली जात नाहीत. तोपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात आवश्यकतेनुसार जेलमध्ये होमगार्डना ड्यूटी देण्याचा निर्णय घेण्यात आला.

  • राज्य सरकारने २०१४ मध्ये अशा प्रकारे ३०० जणांना देखभालीसाठी  नेमण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सध्याही आवश्यकतेनुसार त्यांना जेलमध्ये ड्यूटी दिली जाणार आहे. त्याबाबत होमगार्ड महासमादेशकाकडून प्रस्ताव मागविण्यात आला होता. त्यांनी जवानांना देण्याची तयारी दर्शविली असून, सध्या त्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधा देण्याची मागणी केली होती.

नाट्य परिषदेच्या पुढच्या अंकात नक्की काय :
  • अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे सध्याचे अध्यक्ष नक्की कोण, याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून त्यावर उलटसुलट चर्चा रंगली आहे. याबाबत सरळसरळ दोन गट पडल्याने, नाट्य परिषदेच्या पुढच्या अंकात नक्की काय घडेल आणि हा एकंदर वाद संपुष्टात तरी कधी येणार, याकडे नाट्यसृष्टीचे लक्ष लागले आहे. 

  • नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या काही सदस्यांनी याआधी घेतलेल्या विशेष बैठकीत, नाट्य परिषदेच्या पुढील कार्यवाहीसाठी अध्यक्ष म्हणून नरेश गडेकर यांची बहुमताने निवड केली. मात्र त्यानंतर ही बैठकच अवैध असल्याचे मत नाट्य परिषदेकडून व्यक्त करण्यात आले.

  • नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रसाद कांबळी हेच असल्याचे परिषदेच्या मंडळींचे म्हणणे आहे. तर, प्रमुख कार्यवाह या नात्याने शरद पोंक्षे यांनी, नरेश गडेकर यांच्या अध्यक्षपदाला हरकत घेणारे पत्रच त्यांना पाठवले. त्यामुळे, नाट्य परिषदेचे अध्यक्ष नक्की कोण, याचा फैसला सध्या अधांतरी आहे. या नाट्यात आता नाट्य परिषदेच्या विश्वस्तांपैकी एक असलेले शशी प्रभू यांच्या नावाचीही चर्चा सुरू झाल्याने, नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदाचे नाट्य अधिकच रंगले आहे.

गुजरातमध्ये भाजपला मोठे यश : 
  • गुजरातमधील स्थानिक निवडणुकीत सत्ताधारी भाजपने मोठा विजय मिळवला आहे. भाजपने सर्व ३१ जिल्हा परिषदांमध्ये बहुमत मिळवले आहे, तर २३१ पंचायत समित्यांपैकी १९६ ठिकाणी सत्ता मिळवली आहे. ८१ पैकी ७५ नगरपालिकांमध्ये यश मिळवले आहे. हे निकाल पाहता राज्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

  • काँग्रेसला केवळ ३३ पंचायत समित्या तसेच चार नगरपालिकांमध्ये सत्ता मिळवता आली आहे. अपक्ष व इतरांना दोन नगरपालिकांमध्ये यश मिळाले आहे. या निकालानंतर गुजरात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित छावडा तसेच विरोधी पक्षनेते परेश धनानी यांनी राजीनामा दिला आहे. हे निकाल अनपेक्षित असल्याची प्रतिक्रिया छावडा यांनी दिली आहे.  पुढील वर्षी राज्यात विधानसभा निवडणूक अपेक्षित आहे. त्यापूर्वी भाजपने राज्यातील आपले स्थान मजबूत केल्याचे मानले जात आहे.

  • पंतप्रधानांचे ट्वीट - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत पक्षाच्या कामगिरीबद्दल आनंद व्यक्त केला आहे. गुजराती नागरिक विकासाच्या बाजूने आहे. जनतेने हा जो विश्वास दाखविला त्याबद्दल नतमस्तक आहोत असे ट्वीट पंतप्रधानांनी केले आहे. गेल्याच आठवडय़ात भाजपने सहा महापालिका मोठय़ा मताधिक्याने जिंकल्या होत्या.

  • ‘आप’चा शिरकाव - सुरत महापालिका निवडणुकीत २७ जागाजिंकणाऱ्या आम आदमी पक्षाने नगरपालिका तसेच पंचायत निवडणुकीत काही जागा मिळवत राज्यात शिरकाव केला आहे. आपने नगरपालिकांमध्ये ९ तर पंचायत समित्यांमध्ये दोन जागा पटकावल्या आहेत.

०३ मार्च चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.