कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता भारतानं इराणी नागरिकांना दिलेले ई-व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. इराणमधील सर्वोच्च नेते अयातोला अली खामेनेई यांचे सल्लागार मोहम्मद मीरमोहम्मदी यांचा काही दिवसांपूर्वीच कोरोनामुळे मृत्यू जाला होता.
चीननंतर इराणमध्ये कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झालेल्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. तसंच इराणमध्ये कोरोनाचा प्रादुर्भावही वाढत आहे. इराणमध्ये आतापर्यंत या व्हायरसची लागण होऊन ६६ जणांचा मृत्यू झाला आहे तर १ हजार ५०१ नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचंही समोर आलं आहे.
इराणी नागरिक आणि १ फेब्रुवारीनंतर इराणचा दौरा करणाऱ्या नागरिकांना जारी करण्यात आलेले व्हिसा आणि ई-व्हिसा रद्द करण्यात आले आहेत.
ज्यांनी आतापर्यंत भारतात प्रवेश केला नाही, त्यांच्यासाठी हा निर्णय लागू आहे. हे नागरिक कोणत्याही मार्गानं भारतात प्रवेश करू शकत नाहीत, असं ब्यूरो ऑफ इमिग्रेशननं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
विमानात वायफाय सेवा पुरवण्यास भारत सरकारने परवानगी दिली असून हा निर्णय सोमवारी जाहीर करण्यात आला. २१ फेब्रुवारीच्या अधिसूचनेनुसार प्रवाशांना विमानात बसल्यानंतर वायफाय सेवेच्या माध्यमातून इंटरनेट साधने वापरता येतील.
विमानाचा प्रमुख वैमानिक हा प्रवाशांना इंटरनेट सेवा यापुढे उपलब्ध करून देऊ शकतो. ही सेवा वाय फाय ऑन बोर्ड पद्धतीची असून त्यावर लॅपटॉप, स्मार्टफोन, टॅबलेट, ई रीडर व पॉइंट ऑफ सेल मशीन चालू शकतात. त्यामुळे प्रवासी विमानातील खाद्यपदार्थ किंवा इतर काही वस्तूंचे पैसे तेथेच डेबिट क्रेडिट कार्डने अदा करू शकतील.
विस्तारा कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लेस्ली थँग यांनी बोइंग ७८७—९ या वायफाय सेवा असलेल्या विमानाची खरेदी स्वीकारली, तेव्हा त्यांनी सांगितले,की हे वायफाय सेवा असलेले पहिले विमान भारतात उपलब्ध झाले आहे. हवाई वाहतूक महासंचालनालयाच्या प्रमाणनानंतर ही वायफाय इंटरनेट सेवा वापरता येईल, त्यासाठी प्रक्रिया निश्चित केली आहे. विमानाची सर्व दारे बंद झाल्यानंतर वैमानिक त्याच्या कळफलकावरून ही सेवा सुरू करून देईल. विमानाची दारे विमानतळावर आल्यानंतर उघडली जातील तेव्हा ही सेवा बंद केली जाईल.
दिल्लीतील २०१२मधील सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील एका दोषीच्या दया याचिकेवर निर्णय होईपर्यंत आरोपींच्या फाशीची अंमलबजावणी दिल्ली न्यायालयाने सोमवारी पुढील आदेशापर्यंत लांबणीवर टाकली. त्यामुळे या प्रकरणातील आरोपींची फाशी तिसऱ्यांदा टळली आहे.
यापूर्वीच्या आदेशानुसार, चौघाही दोषींना आज, मंगळवारी सकाळी ६ वाजता फाशी दिले जाणार होते. या चौघांच्या फाशीची अंमलबजावणी आतापर्यंत तिसऱ्यांदा पुढे ढकलली गेली आहे. दोषी पवन गुप्ता याच्या दया याचिकेचा निर्णय लागेपर्यंत फाशीची अंमलबजावणी होऊ शकत नाही, असा निर्णय अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेद्र राणा यांनी दिला.
‘दोषीची दयेची याचिका निकाली निघेपर्यंत फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी केली जाऊ शकत नाही, असे एकूण चर्चेनंतर माझे मत आहे. त्यामुळे सर्व दोषींविरुद्धच्या ‘डेथ वॉरंट’ची अंमलबजावणी पुढील आदेशापर्यंत लांबणीवर टाकण्यात येत आहे’, असा निर्णय न्यायालयाने दिला. आपण सोमवारी राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला असल्यामुळे फाशीच्या अंमलबजावणीला स्थगिती द्यावी, अशी मागणी करणाऱ्या पवन गुप्ता याच्या याचिकेवर न्यायालयाने हा आदेश दिला.
चीनमध्ये करोना विषाणूने रविवारी ४२ बळी घेतले असून एकूण मृतांची संख्या आता २,९१२ झाली आहे. जगभरातील सत्तर देशांत प्रसार झालेल्या या विषाणूमुळे गेलेल्या बळींची संख्या आता तीन हजारांवर गेली असून ८८ हजार लोकांना संसर्ग झाला आहे.
चीनमध्ये हा विषाणू प्रथम संसर्गास कारण ठरला. गेल्यावर्षी डिसेंबरपासूनच या विषाणूचा संसर्ग चीनमध्ये सुरू झाला, त्यानंतर आतापर्यंत तो सत्तर देशात पसरला असून चीनमधील ८० हजार लोकांसह जगातील एकूण ८८ हजार लोकांना त्याचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने म्हटले आहे, की रविवारी २०२ नवीन रुग्ण आढळले असून एकूण संख्या ८०,०२६ झाली आहे. नवीन रुग्णांची संख्या २२ जानेवारीपासून प्रथमच कमी होताना दिसत आहे. चीनने वुहानसह इतर सतरा शहरातील लोकांना ते होते तेथेच जवळपास बंदिस्त केले होते. त्यांना बाहेर जाण्याची परवानगी दिली नव्हती. संसर्ग असलेल्या सर्व लोकोंना वेगळे ठेवण्याची व्यवस्था केली होती. त्यामुळे हा विषाणू पसरण्यास काही प्रमाणात अटकाव झाला. रविवारी एकूण ४२ जण मरण पावले असून ते सर्वच हुबेई व त्याची राजधानी वुहानमधील आहेत.
फिरकीपटू जॉर्जिआ वेरहॅमने (३/१७) केलेल्या अप्रतिम गोलंदाजीला सलामीवीर बेथ मूनीच्या (६०) अर्धशतकाची उत्तम साथ लाभल्यामुळे गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने सोमवारी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील अखेरच्या साखळी सामन्यात न्यूझीलंडवर चार धावांनी सरशी साधली. या विजयासह ऑस्ट्रेलिया ‘अ’ गटातून उपांत्य फेरी गाठणारा भारतानंतरचा दुसरा संघ ठरला.
प्रथम फलंदाजी करताना मूनीव्यतिरिक्त कर्णधार मेग लॅनिंग (२१) आणि एलिस पेरी (२१) यांनी उपयुक्त योगदान दिल्यामुळे ऑस्ट्रेलियाने २० षटकांत ५ बाद १५५ धावांपर्यंत मजल मारली. मूनीने ५० चेंडूंत सहा चौकार आणि दोन षटकारांसह ६० धावा केल्या.
प्रत्युत्तरात २० वर्षीय मनगटी फिरकीपटू वेरहॅमने अवघ्या १७ धावांत कर्णधार सोफी डिव्हाइन (३१), सूझी बेट्स (१४) आणि मॅडी ग्रीन (२८) या तिघींचे बळी मिळवून ऑस्ट्रेलियाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. अखेरच्या षटकात २० धावांची आवश्यकता असताना न्यूझीलंडला १५ धावाच करता आल्याने त्यांना एकूण ७ बाद १५१ धावांवर समाधान मानावे लागले.
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.