चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०३ डिसेंबर २०२१

Date : 3 December, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
दरवर्षी सप्टेंबरमध्ये पदभरतीचे मागणीपत्र सादर करणे आवश्यक ; राज्य शासनाच्या सर्व विभागांना सूचना :
  • राज्य शासनाच्या सेवेतील सरळसेवेच्या कोटय़ातील रिक्त पदे भरण्यासाठी प्रत्येक वर्षी सप्टेंबरमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला मागणीपत्रे सादर करणे आवश्यक आहे, अशा सूचना सर्व प्रशासकीय विभागांना देण्यात आल्या आहेत.

  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) कक्षेतील सरळसेवेची पदे भरण्यासाठीची कार्यपद्धती ठरविण्यात आली होती. ही पदे भरण्यासाठी लोकसेवा आयोगाला विहित कालावधीत मागणीपत्रे सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. परंतु दर वर्षी मागणीपत्रे पाठविली जात नसल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. मागणीपत्रे पाठविली जात नसल्यामुळे पदे दीर्घकाळ रिक्त राहून, त्याचा प्रशासकीय कामकाजावर विपरीत परिणाम होतो.

  • त्यामुळे या पुढे सरळसेवेच्या रिक्त पदांच्या भरतीची मागणीपत्रे प्रतिवर्षी सप्टेंबर महिन्यात म्हणजे पदोन्नत्तीच्या निवडसूचीच्या वर्षांच्या सुरुवातीस एमपीएससीला सादर करावीत, अशा सूचना राज्य शासनाने सर्व प्रशासकीय विभागांना दिल्या आहेत.

  • राज्य शासनाच्या सेवेतील सरळसेवेची पदे भरण्यासंदर्भात लोकसेवा आयोगाला सादर करावयाच्या मागणीपत्रांबाबतची सुधारित कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. सप्टेंबर ते ऑगस्ट या कालावधीत रिक्त पदांची गणना करणे, तसेच सरळसेवेच्या कोटय़ातील रिक्त पदांची संख्या निश्चित करून, त्यानुसार एमपीएससीला मागणीपत्रे सादर करायची आहेत. सेवानिवृत्ती आणि पदोन्नत्तीमुळे रिक्त होणारी पदेही विचारात घेणे आवश्यक आहे. सामाजिक व समांतर आरक्षण निश्चित करुन पदभरतीची मागणी पत्रे सादर करावयाची आहेत.

अंजू यांना अ‍ॅथलेटिक्समधील सर्वोत्कृष्ट महिलेचा पुरस्कार :
  • भारताच्या माजी लांबउडीपटू अंजू बॉबी जॉर्ज यांची जागतिक अ‍ॅथलेटिक्स संघटनेकडून वर्षांतील सर्वोत्कृष्ट महिला या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. देशभरात युवा पिढीला घडवण्याबरोबरच लिंग समानतेसाठी सातत्याने पुढाकार घेतल्याने ४४ वर्षीय अंजू यांना २०२१ या वर्षांतील सर्वोत्तम महिलेचा बहुमान मिळाला आहे.

  • अंजू यांनी २००३ मध्ये झालेल्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत ऐतिहासिक कांस्यपदकाची कमाई केली होती.

  • जागतिक स्पर्धेत पदक जिंकणाऱ्या त्या अद्यापही भारताच्या एकमेव अ‍ॅथलेटिक्सपटू आहेत. बुधवारी युरोपमधील मोनॅको शहरात झालेल्या आभासी पुरस्कार वितरण सोहळय़ात अंजू यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. अ‍ॅथलेटिक्ससाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या महिलांचा हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो.

  • ‘‘जागतिक अ‍ॅथलेटिक्स संघटनेने मला या पुरस्कारासाठी पात्र समजल्याने मी त्यांचे आभार मानते. ज्या क्षेत्राने आपली ओळख निर्माण केली. त्यासाठी योगदान देण्याचा आनंद निराळाच आहे. माझ्या कार्याची दखल घेऊन अनेक युवा मुलींना प्रेरणा दिल्याबद्दल धन्यवाद,’’ असे ‘ट्वीट’ अंजू यांनी केले. अंजू यांची गतवर्षी भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली.

एसटीचे ९ हजार कर्मचारी निलंबित :
  • एसटी महामंडळाने संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाई सुरूच ठेवली असून आतापर्यंत ९ हजार कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली. गुरुवारी ४९८ कर्मचाऱ्यांना निलंबित केले.

  • विलीनीकरणाच्या मागणीसाठी २९ ऑक्टोबरपासून एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. संप मिटत नसल्याने कठोर कारवाईचा बडगा उगारून संपावर गेलेल्या कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना महामंडळाने निलंबित केले.

  • आतापर्यंत ९ हजार १४१ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे तर रोजंदारीवरील ३६ कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली. एकूण १ हजार ९२८ कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती झाल्याची माहिती महामंडळाने दिली. ही कारवाईही यापुढे सुरू ठेवण्यात येणार आहे.

  •  गुरुवारी ९२ हजार २२६ पैकी १८ हजार ८८२ कर्मचारी हजर असल्याची नोंद झाली. उर्वरित कर्मचारी अद्यापही संपात सामील आहेत. त्यामुळे सायंकाळी सहापर्यंत १ हजार ३४८ गाडय़ाच धावू शकल्या. यात साध्या गाडय़ांची संख्या १ हजार १०५ आहे, तर उर्वरित शिवशाही व शिवनेरी गाडय़ा आहेत.

वाहतूक नियमांचे उल्लंघन महागात पडणार ; राज्यात नवीन केंद्रीय मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी :
  • वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या बेशिस्त वाहन चालकांना जरब बसविण्यासाठी भरमसाठ दंडाची तरतुद असलेल्या नवीन केंद्रीय मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी महाराष्ट्रातही करण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला असून अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.

  • या कायद्यानुसार वाहन चालविताना मोबाईलवर बोलल्यास दुचाकीस्वारांना एक हजार रुपये दंड, तर चार चाकी वाहन मालकांना दोन हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. तीन वर्षांच्या आत दुसऱ्यांदा किंवा त्यानंतरही गुन्हा घडल्यास प्रत्येक गुन्ह्यासाठी दहा हजार रुपये दंड आकारण्यात येईल. लायसन्स (अनुज्ञप्ती)नसताही वाहन चालविणाऱ्यांकडून पाच हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे.

  • केंद्र सरकारने मोटर वाहन कायद्यात बदल करुन नवीन कायदा आणला आणि त्यातील तरतुदींमुळे दंडाच्या रकमेत मोठी वाढ केली.  परंतु महाराष्ट्र सरकारने त्याला विरोध केला. तत्कालिन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी नवीन मोटर वाहन कायद्याल तुर्तास स्थगिती देत असल्याचे स्पष्ट केले होते. परंतु राज्यात वाहतुक नियमांचे होणारे उल्लंघन आणि वाढते अपघात पाहता परिवहन विभाग नवीन कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आग्रही होता.

  • त्यानुसार परिवहन विभागाने १ डिसेंबर २०२१ ला अधिसूचना जाहीर केली आहे. या अधिसूचनेनुसार बेदरकारपणे आणि धोकादायकरित्या वाहन चालविल्यास दुचाकीस्वाराला एक हजार रुपये, तर चार चाकी चालकाला तीन हजार रुपये आणि अन्य वाहनांच्या चालकाला चार हजार रुपये दंड आकारण्यात येईल. यापूर्वी दंडाची ही रक्कम ५०० रुपये होती. तीन वर्षांत दुसऱ्यांदा गुन्हा घडल्यास दहा हजार रुपये दंड होणार आहे.

RT-PCR, संस्थात्मक विलगीकरण आणि…; विमान प्रवासाबद्दल राज्य सरकारची नवी नियमावली जाहीर :
  • केंद्राने आणि राज्य सरकारने विमान प्रवासासंदर्भातली वेगवेगळी नियमावली जाहीर केल्यानंतर महाराष्ट्रात संभ्रम निर्माण झाला होता. नक्की कोणती नियमावली मानायला हवी, याबद्दल गोंधळ उडाला होता. मात्र आता राज्य सरकारने आपली नियमावली मागे घेत केंद्र सरकारच्या नियमावलीप्रमाणेच कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहे. परदेशातून आणि देशातल्या इतर राज्यांमधून आलेल्या प्रवाशांसाठी केंद्र सरकारची नियमावली आधार मानली जाईल, असं राज्य सरकारने स्पष्ट केलं आहे.

काय आहेत नवे नियम?

१. या परिसरातून येणाऱ्या प्रवाशांना RTPCR चाचणी बंधनकारक, ती पॉझिटिव्ह आल्यास उपचारासाठी कोविड रुग्णालयात दाखल करण्यात येईल.
२. या चाचणीनंतर ७ दिवस संस्थात्मक विलगीकरणात राहावं लागणार.
३. या ७ दिवसांनंतर पुन्हा चाचणी केली जाईल. ती निगेटिव्ह आल्यास पुढील सात दिवस गृहविलगीकरणात राहावं लागणार.
४. इतर राज्यांमधून येणाऱ्यांना लसीचे दोन्ही डोस अनिवार्य
५. लस घेतली नसेल तर ७२ तासांतला निगेटिव्ह RTPCR चाचणी अहवाल

प्रदूषण वाढल्याने दिल्लीतील शाळा पुन्हा बंद :
  • वायुप्रदूषणाच्या वाढलेल्या स्तराच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीतील शाळांचे प्रत्यक्ष वर्ग शुक्रवारपासून पुढील आदेशापर्यंत बंद ठेवले जातील, असे दिल्ली सरकारने गुरुवारी जाहीर केले. तथापि, बोर्डाच्या परीक्षा ठरल्याप्रमाणे सुरू राहतील आणि अध्ययन व अध्यापन ऑनलाइन केले जाईल, असेही स्पष्ट केले.

  • शहरात वायुप्रदूषण वाढले असतानाही शाळांचे वर्ग पुन्हा सुरू केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिल्ली सरकारची कानउघाडणी केल्यानंतर राज्य सरकारे हा निर्णय घेतला.

  • ‘हवेच्या गुणवत्तेत सुधारणा होईल हा हवामानविषयक अंदाज विचारात घेऊन आम्ही शाळा पुन्हा सुरू केल्या होत्या. तथापि, वायुप्रदूषणाचा स्तर पुन्हा वाढला असल्याने, शुक्रवारपासून पुढील आदेशापर्यंत शाळा बंद करण्याचे आम्ही ठरवले आहे,’ असे दिल्लीचे पर्यावरणमंत्री गोपाल राय यांनी सांगितले. तर, बोर्डाच्या सर्व परीक्षा वेळापत्रकानुसार घेतल्या जातील, अशी माहिती शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांनी दिली.

  • १३ नोव्हेंबरपासून बंद ठेवण्यात आलेले शाळा, महाविद्यालये व इतर शैक्षणिक संस्थांतील प्रत्यक्ष वर्ग सोमवारपासून पुन्हा सुरू झाले होते.

  • मेट्रो रेल्वे आणि बसगाडय़ा पूर्ण क्षमतेने चालवण्यासाठी सध्याची परिस्थिती योग्य नाही, असे राय यांनी करोनाच्या नव्या उपप्रकारामुळे निर्माण झालेल्या आव्हानांचा हवाला देऊन सांगितले.

०३ डिसेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.