चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०३ डिसेंबर २०२०

Date : 3 December, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
‘एमडीएच’ मसालेचे मालक धर्मपाल गुलाटी यांचं निधन :
  • मसाल्यांचा बादशाह म्हणून जाहिरातीतून प्रसिद्ध असलेले ‘एमडीएच’ मसाले कंपनीचे मालक महाशय धर्मपाल गुलाटी यांचं निधन झालं आहे. ते ९८ वर्षांचे होते. गुलाटी यांच्यावर दिल्लीतील रुग्णालयामध्ये मागील तीन आठवड्यांपासून उपचार सुरु होते. आज पहाटे वृद्धापकाळानं ह्रदय बंद पडून त्यांचं निधन झालं. गुलाटी यांच्या निधनामुळे भारताने एक अनुभवी आणि यशस्वी उद्योजक गमावल्याची भावना समाज माध्यमांवर उमटत आहे.

  • महाशय धर्मपाल गुलाटी यांचा जन्म पाकिस्तानमधील सियालकोट येथे झाला होता. फाळणीनंतर त्यांचे कुटुंब दिल्लीत स्थायिक झाले. त्यानंतर मसाल्यांचा उद्योग त्यांनी सुरु केला. आज भारतातच नव्हे तर जगभरात ‘एमडीएच’ मसाले हा एक मोठा नावाजलेला ब्रँड आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ‘महाशियां दी हट्टी’ ही मसाल्याच्या पदार्थांचे उत्पादन करणारी कंपनी ‘एमडीएच’ या नावाने प्रसिद्ध आहे.

  • चुन्नीलाल गुलाटी यांच्या अथक प्रयत्नांमुळे ‘एमडीएच’ कंपनीने मसाल्याच्या पदार्थांमध्ये बाजारात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. भारतात मसाल्यांच्या १५ कंपन्या आहेत. हजारच्या वर पुरवठादार आणि ४ लाख घाऊक विक्रेते एवढं मोठं जाळं एमडीएचने विस्तारलेलं आहे.

  • अमेरिका, कॅनडा, जपान, संयुक्त अरब अमिरात, इंग्लंड, युरोप, दक्षिण पूर्व आशिया, सौदी अरेबिया आदी देशांत ६२ हून अधिक उत्पादनांची विक्री होते. अवघ्या १५०० रुपयांत सुरु झालेला हा व्यवसाय आज कोट्यांची उलाढाल करतोय. महाशय धरमपाल गुलाटी यांचे पुत्र राजीव गुलाटी आता व्यवसायाचा हा पसारा समर्थपणे पुढे नेत आहेत.

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, “२०२४ ला मी पुन्हा येईन” :
  • अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये जो बायडन यांच्याकडून पराभूत झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसमधील आपल्या सामानाची आवराआवर करण्यास सुरुवात केली आहे.

  • मंगळवारी ट्रम्प यांनी एका हॉलीडे रिसेप्शनचं आयोजन केलं होतं. या वेळी बोलताना ट्रम्प यांनी केलेल्या वक्तव्यावरुन ते २०२४ ची निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले. या पार्टीमध्ये आलेल्या पाहुण्यांना संबोधित करताना ट्रम्प यांनी चार वर्षांनंतर पुन्हा मी तुमच्या भेटीला येईन असं म्हटलं. याच वाक्यामुळे ट्रम्प यांनी आता थेट २०२४ च्या निवडणुकीची तयारी सुरु केल्याचे बोलले जात आहे.

  • “ही चार वर्षे खूपच छान होती,” असं ट्रम्प यांनी आपल्या कार्यकाळाबद्दल बोलताना म्हटलं. या पार्टीमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय समितीमधील अनेक सदस्य उपस्थित होते. ट्रम्प यांनी याच सदस्यांना उद्देशून, “आम्ही प्रयत्न करत आहोत की आम्हाला आणखीन चार वर्षे सेवेसाठी मिळावेत. म्हणूनच मी तुम्हाला भेटीसाठी चार वर्षांनंतर पुन्हा येईन असंच आत्ता सांगू शकतो,” असं म्हणाले आहेत.

  • एनबीसी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार ट्रम्प हे २० जानेवारी २०२४ रोजी आपल्या निवडणूक प्रचाराला सुरुवात करणार आहे. यासंदर्भात ट्रम्प यांनी आपल्या जवळच्या सहकाऱ्यांसोबत चर्चाही केली आहे. मागील आठवड्यामध्ये ट्रम्प यांनी आपले वकील २०२० चे निकाल बदलू शकले नाहीत तर आपण २०२४ ची निवडणूक लढू असं म्हटलं होतं. जो बायडन राष्ट्राध्यक्ष झाले असले तरी पुढील काळात प्रसारमाध्यमांमध्ये ट्रम्प यांची चलती असेल असा ट्रम्प समर्थकांचा अंदाज आहे.

अक्साई चीनला दाखवलं चीनचा भाग, भारत सरकारचा विकिपीडियाला नकाशा हटवण्याचा आदेश :
  • ऑनलाइन एनसायक्लोपीडिया विकिपीडियाच्या साईटवरील नकाशामध्ये अक्साई चीनला चीनमध्ये दाखवण्यात आले आहे. भारत सरकारने यावर आक्षेप घेतला आहे. सरकारने विकिपीडियाला तो नकाशा हटवण्यास सांगितले आहे. सरकारने विकिपीडियाला पाठवलेल्या पत्रामध्ये अत्यंत कठोर शब्दांचा वापर केला आहे.

  • इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने आयटी कायद्याच्या कलम ६९ अ अंतर्गत विकिपीडियाला तो नकाशा हटवण्याचे निर्देश दिले आहेत. भारत-भूतान संबंधावरील विकिपीडियाच्या पानावर जम्मू-काश्मीरचा नकाशा चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आला आहे. एका टि्वटर युझरने विकिपीडियाच्या या चुकीकडे लक्ष वेधले. त्याने सरकारकडे कारवाई करण्याचीही विनंती केली.

  • या तक्रारीची दखल घेत मंत्रालयाने २७ नोव्हेंबरला विकिपीडियासाठी आदेश जारी केला. विकिपीडियाच्या साईटवरील चुकीचा नकाशा म्हणजे भारताच्या प्रादेशिक अखंडता आणि सार्वभौमत्वाचे उल्लंघन आहे. त्यामुळे तो नकाशा हटवण्यात यावा असे या आदेशात म्हटले होते. विकिपीडियाने ऐकले नाही, तर भारत सरकार कायदेशीर कारवाई करु शकते असे सूत्रांनी सांगितले.

जगाचे नेतृत्व करण्यास भारत सक्षम :
  • ‘‘विश्वकल्याणासाठी भारताचे विचार अधिक प्रभावी असून, जगाच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आमच्या परंपरेत आहेत. विविधतांना जोडणारा घटक फक्त भारताजवळच असून, आम्हाला तो जगाला द्यायचा आहे. त्यामुळे संपूर्ण जगाचे नेतृत्व करण्यासाठी भारत पूर्णपणे सक्षम आहे’’, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी दूरचित्रसंवाद यंत्रणेद्वारे झालेल्या कार्यक्रमात केले. ‘जागतिक परिप्रेक्ष्यात भारताची भूमिका’ या विषयावर ते बोलत होते.

  • भागवत म्हणाले की, ‘‘एकीकडे अमेरिका आणि दुसरीकडे रशिया असे दोन ध्रुव जगात निर्माण झाल्याचे आम्ही पाहिले आहे. दुसऱ्या महायुद्धात झालेली हानी पाहून हे देश आपल्या भूमीवर युद्ध करू इच्छित नव्हते. त्यामुळे त्यांनी इतर देशांना शस्त्रपुरवठा करून  युद्ध करणे सुरू केले. सोबतच त्यांनी आर्थिक क्षेत्रावरही नियंत्रणास सुरुवात केली. त्यामुळे ‘शीतयुद्ध’ नावाची नवी युद्धशैली आम्ही पाहिली. त्यात अमेरिका जिंकली आणि रशियाचा पराभव झाला. त्यामुळे अमेरिका ही एक महाशक्ती बनली. आता अमेरिकेच्या वर्चस्वाखालीच सर्व सूत्रे हलणार, असे सांगण्यात येऊ लागले. पण तसे झाले नाही.’’

  • ‘‘जगाला सुखी करण्याची गोष्ट तर दूरच, पण अमेरिका या जगाला एकत्रही ठेवू शकली नाहीत. कालौघात अनेक भाषा संपल्या, अनेक संस्कृतींचा अंत झाला, विविधतेची आणि पर्यावरणाची हानी झाली. संपूर्ण जगाच्या कल्याणाची इच्छा ‘मॅक्झिमम गुड्स, मॅक्झिमम पीपल’ पर्यंत मर्यादित आणि तीही काही मोजक्या देशांपुरती सिमीत राहिली’’,याकडे भागवत यांनी लक्ष वेधले. जगाच्या दक्षिण गोलार्धातील सारे देश नैसर्गिक साधन-संपत्तीने समृद्ध होते. विकसित देशांनी मोजक्या लोकसंख्येसाठी सारी साधने वापरली, असे भागवत यांनी सांगितले.

पदवीधर,शिक्षक मतदारसंघांत आज मतमोजणी :
  • मुंबई : पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांत कोणत्याही उमेदवाराला एकूण वैध मतांच्या ५१ टक्के मते मिळाली तरच उमेदवार पहिल्या फेरीत निकाल लागेल. अन्यथा बाद फेरीत मतमोजणी केली जाईल व त्यात कमी मते मिळणारे उमेदवारी क्रमाने बाद होतील. या किचकट प्रक्रियेमुळेच पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांतील आज होणाऱ्या मतमोजणीत निकाल लागण्यास विलंब लागण्याची चिन्हे आहेत.

  • पुणे पदवीधर मतदारसंघात ६२ उमेदवार रिंगणात असल्याने या मतदारसंघात कोणत्याही उमेदवाराने पहिल्या पसंतीच्या मतांचा कोटा पूर्ण न केल्यास निश्चित मतांचा कोटा पूर्ण होईपर्यंत दुसऱ्या, तिसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी करावी लागेल. यात सर्वात कमी मते मिळणारे उमेदवार उतरत्या क्रमाने एकापाठोपाठ बाद होतील. ही सारीच किचकट प्रक्रिया आहे.

  • पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांत यंदा विक्रमी मतदान झाल्याने साऱ्याच उमेदवारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

०३ डिसेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

 

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.