चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०३ एप्रिल २०२१

Date : 3 April, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
सामूहिक लसीकरणाची केजरीवाल यांची सूचना :
  • करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी युद्धपातळीवर लसीकरण करावे लागणार असून त्यासाठी सामूहिक लसीकरण हाच योग्य पर्याय आहे. त्यामुळे केंद्र सरकारने ४५ वर्षांची अट काढून टाकली पाहिजे तसेच, बिगर आरोग्यकेंद्रांवरही लसीकरणाची प्रक्रिया राबवली गेली पाहिजे, अशी सूचना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी केली. दिल्लीत रुग्णसंख्या वाढत असली तरी टाळेबंदीची शक्यता मात्र केजरीवाल यांनी फेटाळली.

  • देशभर करोनाची दुसरी लाट आल्याचे मानले जात असून केंद्र सरकारनेही राज्यांना लसीकरणाला वेग देण्याची तसेच  मध्यमवयीन व्यक्तींच्या लसीकरणावर भर देण्याची सूचना केली आहे. शिवाय, सर्वाधिक करोनाबाधित जिल्ह्याापार्श्वत दोन आठवड्यांमध्ये ७५ टक्के लोकांचे लसीकरण करण्याचाही सल्ला दिलेला आहे. या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांनी सामूहिक लसीकरणाची मागणी केली आहे.

  • लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात ४५ वर्षांपेक्षा कमी वयोगटातील लोकांचा लसीकरणासाठी समावेश करण्यात आलेला नाही. मात्र, तरुण व मध्यमवयीन लोकांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव अधिक होत असल्याचे आढळल्याने ४५ वर्षांची अट शिथिल करून सर्व वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण केले तर करोना आटोक्यात आणता येईल, असा युक्तिवाद केजरीवाल यांनी केला.

राज्यात लवकरच दररोज अडीच लाख चाचण्या केल्या जाणार - मुख्यमंत्री :
  • राज्यात मागील काही दिवसांपासून करोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. दररोज मोठ्यासंख्येने नवीन करोनाबाधित आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही मोठी भर पडत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून कडक निर्बंधांची अंमलबजावणी केली जात आहे, मात्र तरी देखील रूग्णसंख्या अटोक्यात येत नसल्याने आता राज्यात पुन्हा एकदा लॉकडाउन लागतो की काय? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • या पार्शअवभूमीवर आज राज्यातील करोना परिस्थितीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला ऑनलाईन संबोधित केलं. यावेळी त्यांनी राज्यातील चाचण्यांची संख्या वाढवून दररोज अडीच लाख चाचण्या सुरू केल्या जाणार असल्याचे सांगितले.

  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले,“ हा विषाणू वेगवेगळे अवतार धारण करून आपल्याला संकटात टाकतो आहे आणि आपली परीक्षा बघतो आहे. आपल्या सर्वांना धैर्याने लढण्याची आवश्यकता आहे. लॉकडाउन करणार का? या प्रश्नाचं मी अजूनही उत्तर देत नाही. पण साधारण आताची परिस्थिती काय आहे, याची कल्पना आपल्याला देण्याची मला पुन्हा एकदा गरज वाटते.”

भारतीय संघात परदेशी फुटबॉलपटू :
  • राष्ट्रीय फुटबॉल संघात भविष्यात भारतीय वंशाच्या परदेशातील खेळाडूंचा समावेश करणार असल्याचे संकेत भारतीय फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक इगोर स्टिमॅच यांनी दिले आहेत.

  • अलीकडेच दुबईमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण फुटबॉल सामन्यात भारताला संयुक्त अरब अमिरातीकडून ०-६ असा मानहानीजनक पराभव पत्करावा लागला. ‘‘अफगाणिस्तान आणि बांगलादेशसारख्या प्रतिस्पर्धी संघांनी परदेशातील खेळाडूंचा समावेश करण्यास परवानगी दिली आहे. अफगाणिस्तान संघात सध्या युरोपियन लीगमध्ये खेळत असलेले १३ खेळाडू राष्ट्रीय संघाकडून खेळत आहेत. जर्मनी, पोलंड, फिनलँड, नेदरलँड्स आणि स्वीडन या देशांमध्ये ते लीग फुटबॉल खेळत आहेत,’’ याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

  • ‘‘इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) चमक न दाखवलेल्या एकही खेळाडूला आम्ही संधी दिली नाही. तसेच आजारपण, दुखापती आणि खराब कामगिरीमुळे आम्ही राहुल भेके, सेरिटन फर्नांडेस, आशीष राय, ब्रँडन फर्नांडेस, अब्दुल सहल, उदांता सिंग आणि कर्णधार सुनील छेत्री यांच्यावर विसंबून राहिलो नाही. प्रत्येक खेळाडूला त्यांच्या आवडत्या ठिकाणी खेळण्याची आम्ही संधी दिली,’’ असेही स्टिमॅच यांनी स्पष्ट केले.

पाचशे रुपयांत होणार आरटीपीसीआर चाचणी :
  • खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणाऱ्या कोरोना चाचण्यांचे दर पुन्हा सुधारित करण्यात आले असून, आता कोरोना निदानासाठी आरटी-पीसीआर चाचणीसाठी ५०० रुपये आकारण्यात येणार आहेत. याबरोबरच रॅपिड अँटिजेन अँटिबॉडीज तपासणीचे दरदेखील कमी करण्यात आले असून, अँटिजेन टेस्ट १५० रुपये करण्यात आले आहेत. प्रयोगशाळेने याहून अधिक दर आकारल्यास साथरोग प्रतिबंध कायदा व महाराष्ट्र कोविड-१९ उपाययोजना नियम २०२० अन्वये कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिला आहे.

  • राज्य शासनाकडून खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणाऱ्या कोरोना चाचणीचे दर आतापर्यंत किमान पाच ते सहा वेळा  सुधारित करण्यात आले. त्यामुळे ४५०० रुपयांवरून दर कमी करीत करीत आता नव्या सुधारित दरानुसार केवळ ५००  रुपयांत ही चाचणी करणे खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक करण्यात आले आहे.

  • यापूर्वी राज्य शासनाने सप्टेंबर, ऑक्टोबर आणि डिसेंबर या महिन्यांमध्ये सातत्याने कोरोना चाचण्यांच्या दरांमध्ये सुधारणा करीत अनुक्रमे १२००, ९८० आणि ७०० रुपये असे दर केले होते.

  • संकलन केंद्रावरून नमुना घेऊन त्याची वाहतूक आणि अहवाल देणे या सर्व बाबींसाठी रुग्णाकडून  ५०० रुपये  आकारले जातील. रुग्णालय, कोविड केअर सेंटर, क्वारंटाईन सेंटरमधील प्रयोगशाळा येथून नमुना तपासणी आणि अहवाल यासाठी ६०० रुपये, तर रुग्णाच्या निवासस्थानावरून नमुना घेऊन त्याचा अहवाल देणे यासाठी ८०० रुपये आकारण्यात येणार आहेत. कोणत्याही खासगी प्रयोगशाळेला या कमाल मर्यादेपेक्षा जास्त दर आकारता येणार नाही, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

०३ एप्रिल चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.