राज्य शिक्षक पुरस्कारांची घोषणा; 108 शिक्षक मानकरी
- शालेय शिक्षण विभागातर्फे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले. त्यानुसार राज्यातील विविध विभागांतील १०८ शिक्षक पुरस्काराचे मानकरी ठरले असून, शिक्षक दिनी (५ सप्टेंबर) पुरस्कार प्रदान कार्यक्रम मुंबईत होणार आहे.
- शिक्षक पुरस्कारांची घोषणा शिक्षण विभागाने शासन निर्णयाद्वारे शुक्रवारी केली. शिक्षण क्षेत्रात निष्ठेने काम करणाऱ्या शिक्षकांचा गौरव पुरस्काराच्या रुपात १९६२-६३पासून करण्यात येतो.
- या पुरस्कारांसाठी राज्य समितीची बैठक २५ ऑगस्टला झाली. त्यानंतर विभागनिहाय निवडयादी शिक्षण विभागाला सादर करण्यात आली. त्यानुसार प्राथमिक विभागात ३७, माध्यमिक विभागात ३९, आदिवासी क्षेत्रातील उत्कृष्ट कामासाठी १९, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कारासाठी ८, विशेष कला-क्रीडा विभागात दोन, अपंग विद्यार्थ्यांच्या शाळेतील शिक्षक विभागात एक, स्काऊट गाईड विभागात दोन असे एकूण १०८ शिक्षक पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.
दहावीच्या पुरवणी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाची संधी; पाचव्या विशेष फेरीतील अर्ज करण्यासाठी ४ ते ८ सप्टेंबरची मुदत
- राज्य मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या पुरवणी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत संधी मिळणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना ४ ते ८ सप्टेंबर या कालावधीत अर्ज करावा लागणार असून, प्रवेशासाठी गुणवत्ता यादी ११ सप्टेंबरला जाहीर होणार आहे.
- शिक्षण विभागाने ही माहिती दिली. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत प्रवेश प्रक्रियेत तीन नियमित, चार विशेष फेऱ्या राबवण्यात आल्या आहेत.
- पाचव्या विशेष फेरीत पुरवणी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना संधी दिली जाणार आहे. त्यात उत्तीर्ण विद्यार्थ्यांना केंद्रीभूत प्रवेश, कोट्यातील जागांसाठी ४ ते ८ सप्टेंबर या कालावधीत अर्ज करावा लागेल. त्यानंतर ११ सप्टेंबरला गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना ११ ते १५ सप्टेंबर या कालावधीत प्रवेश निश्चित करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.
भारताची आज सूर्याकडे झेप; ‘आदित्य एल१’चे सकाळी ११.५० वाजता प्रक्षेपण
- चांद्रमोहिमेच्या यशानंतर भारताची सूर्याभ्यास मोहीम आज, शनिवारपासून सुरू होत असून भारतीय अंतराळ संशोधन संघटनेचे (इस्रो) ‘आदित्य एल१’ हे यान सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी सूर्याकडे झेपावेल. त्याचा अचूक कक्षेपर्यंतचा हा प्रवास सुमारे १२५ दिवसांचा असेल.
- ‘पीएसएलव्ही सी५७’ हा शक्तिशाली वाहक ‘आदित्य एल१’ यानाला घेऊन अंतराळात झेपावणार आहे. त्याची उलटगणती सुरू झाल्याचे ‘इस्रो’ने शुक्रवारी सांगितले. ‘आदित्य एल१’ला अचूक कक्षा (एल १ लॅग्रॅन्जिअन पॉईंट) गाठण्यासाठी १२५ दिवसांचा कालावधी लागेल, असे ‘इस्रो’चे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी सांगितले.
- पृथ्वीपासून सुमारे १५ लाख किलोमीटरवरील ‘एल१’ (सूर्य-पृथ्वी लॅग्रॅन्जिअन पॉइंट) येथील सौर वारे आणि सूर्याचे प्रभामंडल यांचे दूरस्थ निरीक्षण करण्यासाठी ‘आदित्य एल१’ची रचना करण्यात आली आहे. पृथ्वी आणि सूर्य यांचे गुरुत्वीय बल संतुलित राहतील असे पाच बिंदू (लॅग्रॅन्जिअन पॉइंट) आहेत. त्या बिंदूंवरून सूर्याचा अभ्यास करणे विशेष व महत्त्वाचे असते. त्यातील ‘एल १’ या बिंदूचा वापर ‘आदित्य एल १’ या मोहिमेत केला जाणार आहे. ‘एल१’बिंदूवरून सूर्याचे विनाअडथळा (ग्रहणाविना) निरीक्षण करण्याची मोठी संधी ‘आदित्य एल१’ला मिळणार आहे.
- सूर्य हा सर्वात जवळचा तारा असल्यामुळे इतरांच्या तुलनेत त्याचा सखोल अभ्यास केला जाऊ शकतो, असे ‘इस्रो’ने या गुंतागुंतीच्या मोहिमेची माहिती देताना सांगितले. सूर्याच्या अभ्यासाद्वारे आकाशगंगेतील तसेच इतर विविध आकाशगंगांमधील ताऱ्यांबद्दल बरीच माहिती मिळवता येईल, असेही ‘इस्रो’ने स्पष्ट केले.
- सूर्यामुळे उद्रेकाच्या अनेक घटना घडतात. तो सौर मंडळामध्ये प्रचंड प्रमाणात ऊर्जा उत्सर्जित करतो. अशा प्रकारच्या स्फोटक सौर घटना घडल्या तर पृथ्वीजवळच्या अवकाशात विविध प्रकारचे परिणाम संभवतात, असे संशोधकांचे म्हणणे आहे.
त्रिशूळ संग्रहालयातून लष्करी पर्यटनाची मुहूर्तमेढ; भारत-चीन संघर्षांच्या इतिहासाची मांडणी, महाराष्ट्राचा पुढाकार, लेहमध्ये उद्या भूमीपूजन
- एकिकडे चीन तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानला भिडणाऱ्या सीमेची जबाबदारी सांभाळणाऱ्या भारतीय लष्कराच्या ‘त्रिशूळ विभागाने’ने प्रत्येक मोहिमेत देदीप्यमान कामगिरी केली आहे. गलवान खोऱ्यातील संघर्षांत याच विभागाच्या जवानांनी घुसखोरी करणाऱ्या चिनी सैनिकांवर मात केली होती. या धुमश्चक्रीत २० अधिकारी आणि जवान शहीद झाले होते. अतिशय संघर्षमय आणि गौरवशाली इतिहास लाभलेल्या विभागाच्या कामगिरीचा पट महाराष्ट्र सरकारच्या पुढाकारातून साकारण्यात येणाऱ्या त्रिशूळ युद्ध संग्रहालयातून उलगडणार आहे. विशेष म्हणजे हे संग्रहालय लेह, लडाखच्या लष्करी पर्यटनास बळ देणार आहे.
- लेहच्या करू भागात या युद्ध संग्रहालयाचे भूमिपूजन रविवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. देशाच्या सीमेवर तैनात भारतीय सैन्याच्या अतुलनीय शौर्याची गाथा या संग्रहालयातून अनुभवण्यास मिळणार आहे. लेह-मनाली रस्त्यावरील करू हे ठिकाण १२ हजार फूट उंचीवर आहे.
- भारतीय सैन्यदलाच्या उपक्रमात एखाद्या राज्याने या प्रकारे सहभाग नोंदविण्याची ही पहिलीच वेळ आहे. भाजपचे आमदार श्रीकांत भारतीय यांनी देशासाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांच्या सन्मानार्थ लेहच्या त्रिशूळ संग्रहालय उभारणीत महाराष्ट्राच्या योगदानाची संकल्पना मांडली होती. महाराष्ट्र सरकारने त्यासाठी तत्काळ तीन कोटींचा निधी उपलब्ध केला. या कामात समन्वयाची जबाबदारी आमदार भारतीय यांच्यावर सोपविली. त्यांच्या पथकातील अॅड. मीनल वाघ-भोसले यांचे या उपक्रमात सहकार्य मिळत आहे.
‘एक देश- एक निवडणूक’ संकल्पनेवर विरोधकांची टीका; ‘देशाच्या संघराज्य संरचनेला धोका’
- देशभरात एकत्र निवडणूक घेण्यासाठी ‘एक देश, एक निवडणूक’ संकल्पनेची व्यवहार्यता पडताळून पाहण्यासाठी केंद्र सरकारने समिती स्थापन करण्याच्या निर्णयावर विरोधी पक्षांनी शुक्रवारी जोरदार टीका केली. सरकारचे हे पाऊल म्हणजे देशाच्या संघराज्य संरचनेला धोका निर्माण करण्याचा प्रकार आहे, अशी टीका विरोधकांनी केली.
- इंडिया आघाडीच्या बैठकीमुळे सत्ताधारी भाजप अस्वस्थ झाला असून त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याची व्यवहार्यता तपासण्यासाठी समिती स्थापन केल्याची टीका विरोधकांनी केली. तर एक देश, एक निवडणूक याची शक्यता तपासून पाहण्यासाठी केंद्र सरकारने समिती स्थापन केल्याची चिंता नाही अशी प्रतिक्रिया ओडिशामधील सत्ताधारी पक्ष बिजू जनता दलाने व्यक्त केली.
‘एकत्र निवडणुका इष्ट, पण अंमलबजावणी कठीण’ माजी निवडणूक आयुक्तांचे मत
- नवी दिल्ली : लोकसभा आणि सर्व राज्यांच्या विधानसभा निवडणुका एकत्र घेणे इष्ट आहे आणि निवडणूक खर्च कमी होण्यासारखे त्याचे अनेक फायदे आहेत, मात्र त्याची अंमलबजावणी करणे हे व्यावहारिकदृष्टय़ा कठीण आहे, असे मत माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी एस कृष्णमूर्ती यांनी व्यक्त केले. मात्र, एकत्र निवडणुका घेऊन पैसे आणि वेळ वाचवण्यास त्यांनी अनुकूलता दर्शवली.
02 सप्टेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)