चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०२ सप्टेंबर २०२१

Date : 2 September, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
परराष्ट्रमंत्री तीन युरोपीय देशांच्या दौऱ्यावर :
  • परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हे गुरुवारपासून चार दिवसांच्या युरोप दौऱ्यावर जात असून ते स्लोव्हेनिया, क्रोएशिया व डेन्मार्क या देशांना भेट देणार आहेत. या देशांशी द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी ते प्रयत्न करतील. तसेच युरोपीय समुदाय आणि भारत यांच्यातील संबंध सुधारण्यावरही त्यांचा भर असणार आहे.

  • जयशंकर हे प्रथम स्लोव्हेनियाला जाणार असून तेथे ते युरोपीय समुदायातील देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी एका परिसंवादात सहभागी होणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, स्लोव्हेनियाचे समपदस्थ अँझे लॉग यांच्याशी जयशंकर संवाद साधतील. स्लोव्हेनिया सध्या युरोपीय समुदायाचा अध्यक्ष आहे. त्यांनी जयशंकर यांना परराष्ट्र मंत्र्यांच्या अनौपचारिक परिषदेसाठी आमंत्रित केले होते. स्लोव्हेनियातील ब्लेड स्ट्रॅटेजिक फोरम कार्यक्रमात ते सहभागी होणार असून आणखी एका विषयावरील परिसंवादात त्यांचे भाषण होणार आहे.

  • अफगाणिस्तानातील बदलती परिस्थिती चर्चेचा प्रमुख विषय - युरोपातील बैठकांमध्ये अफगाणिस्तानातील बदलती परिस्थिती हा चर्चेचा प्रमुख विषय आहे. ३ सप्टेंबरला ते क्रोएशियाला जाणार असून तेथे त्यांची परराष्ट्र मंत्री गॉर्डन ग्रिलिक रॅडमन यांच्याशी व क्रोएशियाच्या प्रमुखांशी चर्चा होईल. ४ ते ५ सप्टेंबरला ते डेन्मार्कला जाणार असून भारत- डेन्मार्क गोलमेज परिषदेत सहभागी होतील. डॅनिश परराष्ट्र मंत्री जेपी कोफॉड यांच्यासमवेत ते एका संयुक्त आयोगाच्या बैठकीत सहभागी होणार आहेत.

देशातील अनेक राज्यांतील शाळा सुरू :
  • करोनाविषयक परिस्थितीत लक्षणीय सुधारणा झाल्याच्या पार्श्वभूमीवर देशातील अनेक राज्यांमधील शाळांची दारे बुधवारपासून उघडली. मात्र करोनाचा संसर्ग वाढण्याचे हे कारण ठरू नये म्हणून करोनाबाबतच्या निर्बंधांचे पालन करण्याची खबरदारी सर्वच राज्यांतील प्रशासनांनी घेतली आहे.

  • दिल्लीत मुसळधार पाऊस पडत असतानाच, मुखपट्ट्या घातलेले आणि छत्र्या घेतलेले नववी ते बारावीचे विद्यार्थी शाळांमध्ये परतले. काही शिक्षण संस्थांनी मात्र ‘बघा आणि वाट पाहा’ धोरण स्वीकारले असून, विद्यार्थ्यांना काही आठवड्यांनंतरच वर्गातील प्रत्यक्ष उपस्थितीसाठी बोलावले आहे.

  • दिल्लीतील करोनाविषयक परिस्थितीत सुधारणा झाल्याने नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा, महाविद्यालये आणि शिकवणी वर्ग १ सप्टेंबरपासून पुन्हा सुरू होतील असे दिल्ली सरकारने शुक्रवारी जाहीर केले होते. मात्र कुठल्याही विद्याथ्र्यावर प्रत्यक्ष उपस्थितीसाठी सक्ती राहणार नाही आणि पालकांची संमती अनिवार्य असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. प्रत्येक वर्गात ५० टक्के उपस्थितीच्या मर्यादेसह मध्य प्रदेशात सहावी ते बारावीचे वर्ग बुधवारी सुरू झाले.

  • मध्य प्रदेश सरकारने यापूर्वी नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ५० टक्के उपस्थितीच्या मर्यादेसह जुलैच्या शेवटच्या आठवड्यात वर्ग सुरू केले होते; मात्र हे वर्ग आठवड्यातील ठरावीक दिवशी होत होते. बुधवारी पहिल्या दिवशी शाळांमध्ये उपस्थिती कमी होती, मात्र जवळजवळ १७ महिन्यांनंतर वर्गात प्रत्यक्ष उपस्थित राहता आल्याबद्दल विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला.

‘अफगाणिस्तानातील माघारीनंतर भारत-अमेरिका सहकार्याची गरज’ :
  • अमेरिकेने अफगाणिस्तानातून सैन्य माघारी घेतल्यानंतर आता अमेरिका व भारत यांच्या सहकार्याची मोठ्या प्रमाणात गरज आहे, असे प्रतिपादन भारतीय अमेरिकी काँग्रेस सदस्य राजा कृष्णमूर्ती यांनी केले आहे.

  • ते म्हणाले, अमेरिकेने अफगाणिस्तानातील दहशतवाद विरोधी लढा थांबवू नये. कारण तसे केले तर अल कायदा व आयसिस यांना मोकळे रान मिळू शकते. भारत व अमेरिका हे अनेक मार्गांनी अफगाणिस्तानातील परिस्थिती हाताळण्यासाठी एकमेकांना मदत करू शकतात. त्यात गुप्तचर माहितीची देवाणघेवाण महत्त्वाची असून दहशतवाद्यांचे प्रयत्न हाणून पाडण्यात ते एकमेकांना मदत करू शकतात.

  • तीन वेळा इलिनॉइसचे प्रतिनिधी असलेल्या कृष्णमूर्ती यांनी म्हटले आहे, की आपण दहशतवादाविरोधात प्रयत्न चालूच ठेवले पाहिजेत. भारत व अमेरिका तसेच मित्र देश व भागीदार यांनीही दहशतवाद हाणून पाडण्यासाठी एकमेकांना सहकार्य करणे गरजेचे आहे. वीस वर्षे संघर्षात घालवल्यानंतर तेथून सैन्य माघारी घेणे महत्त्वाचे होते.  असे असले तरी अमेरिकेने ज्या पद्धतीने माघार घेतली त्याची चौकशी झाली पाहिजे कारण ही परिस्थिती यापेक्षा चांगल्या पद्धतीने हाताळता आली असती.

  • अमेरिकेने यानंतरही दहशतवाद विरोधी कारवाई अफगाणिस्तानात सुरू ठेवावी. आयसिस व अल कायदा यांना मोकळे रान देणे परवडणारे नाही. गुप्तचर समितीचा सदस्य या नात्याने मी असे सांगू इच्छितो की, अफगाणिस्तान हे दहशतवाद्यांचे आश्रयस्थान होणार नाही याची जबाबदारी तालिबान सरकार व अमेरिका यांच्यावर असणार आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये उभारणार भारतरत्न राजीव गांधी विज्ञान अविष्कार नगरी :
  • पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात भारतरत्न राजीव गांधी विज्ञान अविष्कार नगरी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे, भविष्यातील वैज्ञानिक घडविणे यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात ८ एकर जागा उपलब्ध असून त्यापैकी एक एकर जागेत यापूर्वी तेथे विभागीय पातळीचे विज्ञान केंद्र उभारण्यात आले आहे तर उर्वरित ७ एकर क्षेत्रफळावर जागतिक दर्जाची, विज्ञानातील विविध संकल्पनांवर आधारित भारतरत्न राजीव गांधी विज्ञान अविष्कार नगरी पुढील पाच वर्षात उभारण्यात येईल. केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत यासाठी १९१ कोटीच्या खर्चास मान्यता देण्यात आली.

  • एकविसाव्या शतकातील भारत घडविण्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञानाची गरज ओळखून भारताला समृद्ध  बनविण्याचे स्वप्न पूर्ण करणे, हे परिवर्तन करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करणे, या अनुषंगिक जिज्ञासा निर्माण करणे, तंत्रज्ञानाचा सामाजिक विकासासाठी उपयोग करणे, आनंददायी पद्धतीने विज्ञान शिकवणे, अनुभवात्मक शिक्षण, विज्ञानावर आधारित विविध संकल्पनांचे सादरीकरण, प्रदर्शन आदी बाबी विचारात घेऊन त्याची माहिती आणि ज्ञान विद्यार्थ्यांना देण्यासाठी राज्यात जागतिक दर्जाच्या भारतरत्न राजीव गांधी विज्ञान अविष्कार नगरीची स्थापना करण्यात येणार आहे.

  • राज्यात ४८८ शासकीय शाळा होणार आदर्श शाळा - शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी राज्यातील ४८८ शासकीय शाळा आदर्श शाळा म्हणून विकसित करण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. आज मंजूरी देण्यात आलेल्या ४८८ “आदर्श शाळा” च्या विकासासाठी ४९४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल.

भारतीय स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी विविध समित्या स्थापण करणार :
  • राज्यात भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आयोजित करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत राज्यात अमृत महोत्सव आयोजित करण्यात येईल. यासाठी विविध समित्या देखील स्थापन करण्यात येत आहेत. अशी माहिती सांस्कृतिक कार्य विभागाने आज झालेल्या बैठकीत दिली.

  • या महोत्सवाची आखणी, नियोजन व प्रभावी अंमलबजावणी याकरिता राज्यस्तरीय समिती, कोअर समिती, अंमलबजावणी समिती, जिल्हास्तर समिती, पंचायत व ग्रामस्तर समिती अशा विविध समित्या स्थापन करण्यात येतील. सांस्कृतिक कार्य विभाग हा या महोत्सवाचे समन्वयन करेल. या विभागाच्या अधिपत्याखाली एकछत्र योजना तयार करण्यात येऊन विविध विभागांकडून प्रस्ताव प्राप्त करून घेण्यात येतील व त्यास मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील अंमलबजावणी समिती मंजुरी देण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला.

  • मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी राज्यातील ४८८ शासकीय शाळा आदर्श शाळा म्हणून विकसित करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत झाला. तसेच  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहअध्यक्षतेखाली राज्य वातावरणीय बदल परिषदेची स्थापना करण्याचे देखील ठरले आहे.

वैद्यकीय महाविद्यालयांबाबत राज्य मंत्रिमंडळ बैठकीत ‘हा’ महत्त्वाचा निर्णय :
  • शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अतिविशेषोपचार रुग्णालय स्थापनेसाठी सार्वजनिक खाजगी भागीदारी धोरण निश्चित (वैद्यकीय शिक्षण विभाग)

  • भारतरत्न राजीव गांधी यांच्या ७५ व्या जयंतीनिमित्त राजीव गांधी आविष्कार नगरी उभारण्याचा निर्णय (शालेय शिक्षण विभाग)

  • आदर्श शाळा बांधकामाबाबत निर्णय (शालेय शिक्षण विभाग)

  • भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त राज्यात विविध कार्यक्रमांच्या आयोजनाचा निर्णय (सांस्कृतिक कार्य विभाग)

  • आयपीसीसी या संयुक्त राष्ट्रांच्या संस्थेने वातावरणीय बदलांच्या अनुषंगाने ऑगस्ट २०२१ मध्ये सादर केलेल्या अहवालाचे सादरीकरण (पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग).

‘स्टारगॅझिंग: द प्लेयर्स इन माय लाइफ’ रवी शास्त्री यांच्या पुस्तकाचे प्रकाशन :
  • क्रिकेट विश्वातील दिग्गज, समालोचक आणि टीम इंडियाचे सर्वात यशस्वी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी ‘स्टारगॅझिंग: द प्लेयर्स इन माय लाइफ’ नावाचे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा लंडनमध्ये पार पडला. यावेळी कर्णधार विराट कोहलीसह संपूर्ण भारतीय क्रिकेट संघ त्यांच्या प्रशिक्षकाला पाठिंबा देण्यासाठी पोहोचला.

  • दरम्यान, विराट कोहलीने आपला सर्वात संस्मरणीय अनुभव रवी शास्त्रींसोबत शेअर केला. पुस्तकाच्या लोकार्पण सोहळ्यात विराटने खोलीत उपस्थित असलेल्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आणि प्रशिक्षक शास्त्री यांना त्यांच्या पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशनाबद्दल अभिनंदन केले.

  • विराट कोहली म्हणाला, प्रशिक्षक रवी शास्त्री खूप लिहू शकतात. कारण त्यांच्याकडे जगाला सांगण्यासारखे बरेच काही आहे. त्याच्या अमूल्य क्षणाबद्दल सांगताना विराट म्हणाला की, २०१४ च्या दरम्यान, जेव्हा संघ खडतर परिस्थितीतून जात होता, तेव्हा रवी शास्त्रींच्या भाषणाने त्यांना प्रेरणा दिली आणि सकारात्मक दृष्टिकोण तयार झाला.

०२ सप्टेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.