चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०२ सप्टेंबर २०२०

Date : 2 September, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
कामगार कायद्याची अंमलबजावणी; महाराष्ट्र, दिल्ली सरकारवर सर्वोच्च न्यायालय नाराज :
  • स्थलांतरित कामगारांना मदत करण्यासंदर्भातील कायद्याची अमलबजावणी करण्याबद्दल महाराष्ट्र व दिल्ली सरकार इच्छुक दिसत नाही, अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली. स्थलांतरित कामगारांना मदत करण्याच्या उद्देशान तीन अधिनियमांच्या अंमलबजावणीबद्दल सर्वोच्च न्यायालयानं राज्यांकडे विचारणा केली होती. मात्र, महाराष्ट्र व दिल्ली सरकारनं शपथपत्र दाखल न केल्यानं न्यायालयानं राज्याच्या भूमिकांवर नाराजी व्यक्त केली.

  • करोना व लॉकडाउनमुळे देशभरातील स्थलांतरित मजुरांना प्रचंड फटका बसला आहे. ऐन लॉकडाउनच्या काळात स्थलांतरित मजुरांचा प्रश्न ऐरणीवर आला होता. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखालील न्यायमूर्ती आर.एस. रेड्डी व एम शाह यांचा समावेश असलेल्या खंठपीठासमोर सुनावणी सुरू आहे.

  • दरम्यान, सुनावणी करताना न्यायालयानं महाराष्ट्र व दिल्ली सरकारनं शपथपत्र दाखल न केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. “शपथपत्र दाखल न करणं यातून हे स्पष्टपणे सूचित होत आहे की राज्ये स्थलांतरित कामगारांना मदत करण्यासंदर्भातील तीन अधिनियमांची अंमलबजावणी करण्यास इच्छुक नाहीत.”

IPL संदर्भात युएईच्या क्रिकेट बोर्डाकडून महत्त्वाची अपडेट :
  • बहुप्रतिक्षित IPL 2020ची अधिकृत घोषणा BCCIने ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीलाच केली. युएईमध्ये १९ सप्टेंबरपासून स्पर्धेची सुरुवात होणार आहे. तर स्पर्धेचा अंतिम सामना १० नोव्हेंबरला खेळवण्यात येणार आहे हेदेखील स्पष्ट करण्यात आले. ड्रीम ११ला यंदाचे टायटल स्पॉन्सर्स जाहीर करण्यात आले. २० ऑगस्टपासून सर्व संघांना युएईला जाण्याची परवानगी देण्यात आली. त्यानुसार सर्व संघ आणि खेळाडू युएईमध्ये दाखलही झाले. त्यानंतर आज एमिरेट्स क्रिकेट बोर्डाने एक महत्त्वाची अपडेट दिली आहे.

  • “दुबई, अबु धाबी आणि शारजा अशा तीन ठिकाणी IPLचे सामने आयोजित करण्यासाठी आम्ही आवश्यक त्या परवानगी मिळवल्या आहेत. या स्टेडियमशी संबंधित असलेले स्थानिक प्रशासन या संबंधीचे नियम आणि प्रोटोकॉल तयार करणार आहे. त्यामुळे खेळाडूंना प्रत्येक वेळी दुसऱ्या ठिकाणी गेल्यावर क्वारंटाइन न करता थेट खेळाच्या ठिकाणी ते हॉटेलमध्ये येणे-जाणे सुकर होणार आहे”, अशी माहिती एमिरेट्स क्रिकेट बोर्डाने दिली.

  • “या सर्व प्रवासांदरम्यान सर्व संघ हे BCCIच्या मार्गदर्शक तत्वानुसार जैव-सुरक्षित बबलमध्ये राहतील. परदेशातून किंवा जैव-सुरक्षित बबलच्या बाहेरून येणाऱ्यांना स्पर्धेसाठी दाखल झाल्यावर क्वारंटाइन व्हावं लागणार आहे. पण जे बबलमध्ये आहेत त्यांना सामन्यांसाठी प्रवास करताना चिंता करण्याची गरज नाही. त्यांना सारखं-सारखं क्वारंटाइन केलं जाणार नाही”, असं बोर्डाने स्पष्ट केलं.

सर्वाधिक चाचण्या करणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचाही समावेश :
  • जगभरात थैमान घालत असलेल्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव एकीकडे देशात झपाट्याने वाढत असताना, करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे. देशात चोवीस तासांत ६९ हजार ९२१ करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असताना, दुसरीकडे मागील चोवीस तासांत ६५ हजार ८१ जण करोनामुक्त झाले असल्याची माहिती समोर आली आहे. तर, ज्या राज्यांमध्ये करोनाच्या सर्वाधिक चाचण्या होत आहेत, त्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा देखील समावेश आहे.

  • राज्यात करोनाबाधित रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणातही अंशतः वाढ झालेली असून हा आकडा आता ७२.०४ वरुन ७२.३७ टक्क्यांवर येऊन ठेपला आहे.

  • देशात करोना चाचण्यांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत ४.३ कोटी पेक्षा जास्त चाचण्या झाल्या आहेत. मागील दोन आठवड्यांमध्ये १ कोटी २२ लाख ५१४ चाचण्या झाल्या आहेत. ज्या राज्यांमध्ये करोनाच्या सर्वाधिक चाचण्या होत आहेत, त्यामध्ये तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र ही तीन राज्यं अग्रस्थानी आहेत. देशभरात मागील चोवीस तासांमध्ये दहा लाखांपेक्षा जास्त चाचण्या झाल्या आहेत.

“आम्ही करुन दाखवलं”, करोना लसीसंबंधी डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा :
  • करोना संकट अद्यापही टळलं नसताना सध्या सर्वांचं लक्ष करोनाचं लस कधी उपलब्ध होईल याकडे लागलं आहे. यादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी AstraZeneca ची लस वैद्यकीय चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात पोहोचली असून चाचणी पूर्ण होण्याच्या अगदी जवळ पोहोचली असल्याचं सांगितलं आहे. AstraZeneca ची लस करोनाविरोधात वापरण्यासाठी परवानगी मिळेल असा विश्वासही डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे. व्हाइट हाऊसमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पीटीआयने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

  • “मला तुम्हा सर्वांना सांगताना आनंद होत आहे की, AstraZeneca ची लस तिसऱ्या वैद्यकीय चाचणीत पोहोचली आहे,” असं डोनाल्ड ट्रम्प यांनी यावेळी बोलताना सांगितलं. करोना लस तयार करणाऱ्यांमध्ये AstraZeneca आघाडीवर आहे. यासोबतच Moderna आणि Pfizer यांची लसही तिसऱ्या टप्प्यात आहे.

  • पत्रकारांशी बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं की, अमेरिकेने काही महिन्यातच करोना लसीच्या बाबतीत प्रगती केली आहे. अन्यथा यासाठी कित्येक महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता होती. “अमेरिकेत आम्ही अशा गोष्टी करत आहोत ज्याचा इतर कोणी विचारही केला नव्हता. ही एक अशी प्रक्रिया आहे ज्याच्यासाठी कित्येक वर्ष लागली असती पण आम्ही काही महिन्यातच करुन दाखवलं,” असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

श्रीनगरमध्ये पहिल्यांदाच सीआरपीएफच्या दहशतवादविरोधी मोहिमेची सूत्रं IPS महिलेच्या हाती :
  • श्रीगरमधील दहशतवाद्यी कारवायांच्या बिमोड करण्यासाठी आता सीआरपीएफने प्रथमच एका महिला अधिकाऱ्याकडे दहशतवाद विरोधी अभियानाचे नेतृत्व करण्याची संधी दिली आहे. सन १९९६ च्या बॅचमधील तेलंगण केडरच्या आयपीएस अधिकारी चारू सिन्हा आता श्रीनगर सेक्टरमध्ये सीआरपीएफच्या महानिरीक्षक (आयजी) म्हणून काम पाहणार आहेत.

  • या अगोदर देखील चारू सिन्हा यांना अशाचप्रकारच्या कठीण कामासाठी जबाबदारी देण्यात आलेली आहे. सीआरपीएफच्या आयजी म्हणून त्यांनी बिहारमध्ये नक्षलवाद्या अभियानाचे नेतृत्व करत, नक्षलवाद्याचा बिमोड केला आहे. त्यांच्या नेतृत्वात नक्षलवादाविरोधात अनेक अभियान यशस्वीरित्या राबवले गेले आहेत. त्यानंतर त्यांची बदली जम्मू येथे बीएसएफच्या आयजी म्हणून झाली. या ठिकाणी देखील त्यांनी यशस्वीपणे कामगिरी पार पाडली.

  • त्यांच्या कामगिरी पाहून आता त्यांना दहशतवाद्याचा बिमोड करण्यासाठी श्रीनगर सेक्टरच्या आयजी पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या अगोदर श्रीनगर सेक्टरच्या आयजी पदाची जबाबदारी एपी माहेश्वरी यांच्याकडे होती.

ई-पास रद्द केल्यानंतर महाराष्ट्रात राज्यांतर्गत रेल्वे प्रवासाला परवानगी; उद्यापासून बुकिंग सुरु :
  • लॉकडाउन शिथिलीकरणाच्या चौथ्या टप्प्यात राज्यातील आंतरजिल्हा प्रवासासाठीची ई-पास सक्ती रद्द करण्यात आल्यानंतर आता मध्य रेल्वेनेही राज्यांतर्गत प्रवासी वाहतूक सुरु करण्याला परवानगी दिली आहे. राज्यांतर्गत रेल्वे बुकिंग उद्यापासून (२ सप्टेंबर २०२० पासून) सुरू होत असल्याचे मध्य रेल्वेने जाहीर केलं आहे. यासंदर्भातील एक पत्रक मध्य रेल्वेने जारी केलं आहे.

  • पॅसेंजर रिझर्व्हेशन सिस्टीम म्हणजेच आरक्षण पद्धतीने २ सप्टेंबरपासून राज्यांतर्गत प्रवासी वाहतूक सुरु होणार असल्याचे रेल्वेने या पत्रकामध्ये स्पष्ट केलं आहे. सर्व प्रवाशांना राज्यांतर्गत प्रवासासाठी २ सप्टेंबरपासून तिकीट बुकींग करता येणार आहे असंही रेल्वेनं म्हटलं आहे. देशभरामध्ये मार्च महिन्यात लॉकडाउन सुरु झाल्यानंतर प्रवासी रेल्वे वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले होते.

  • लॉकडाउनदरम्यान परराज्यातील कामगारांसाठी विशेष श्रमिक ट्रेन्स चालवण्यात आल्या. दुसरीकडे मुंबईतील अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणाऱ्यांसाठी विशेष मर्यादित लोकल गाड्यांची वाहतूक सुरु आहे. मुंबई लोकलबद्दल अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. यादरम्यान मध्य रेल्वेने परिपत्रक प्रसिद्ध करत आंतरजिल्हा प्रवासासाठी परवानगी देण्यात आल्याची माहिती दिली आहे.

०२ सप्टेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.