चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०२ नोव्हेंबर २०२१

Date : 2 November, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
देशात २४८ दिवसांतील सर्वात कमी उपचाराधीन रुग्णसंख्या :
  • देशातील उपचाराधीन रुग्णांत सातत्याने घट होत आहे. गेल्या २४८ दिवसांतील सर्वात कमी उपचाराधीन रुग्णसंख्या रविवारी नोंदली गेली आहे. १ लाख ५८ हजार ८१७ रुग्णसंख्या नोंदली गेली असून ही संख्या एकूण रुग्णसंख्येच्या ०.४६ टक्के इतकी आहे.

  • ही टक्केवारी मार्च २०२० नंतर इतकी कमी नोंदली गेली आहे. तर करोनामुक्त होण्याची टक्केवारी देखील ९८.२० इतकी झाली असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी जाहीर केले आहे.

  • गेल्या २४ तासांत १२,५१४ रुग्णांची नोंद झाली तर २५१जणांचा मृत्यू झाला आहे. सलग २४ दिवसांपासून दैनंदिन रुग्णसंख्या ही २० हजारांखाली तर सलग १२७ दिवसांपासून ५० हजारांखाली नोंदल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीत म्हटले आहे.

जागतिक पुरुष बॉक्सिंग स्पर्धा - निशांत, संजीत उपांत्यपूर्व फेरीत : 
  • भारताच्या निशांत देव (७१ किलो) आणि संजीत (९२ किलो) यांनी पुरुषांच्या जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. अन्य तीन भारतीय बॉक्सिंगपटूंचे आव्हान मात्र संपुष्टात आले.

  • निशांतने मेक्सिकोच्या मार्को अल्वारेझ व्हेर्देवर ३-२ अशी मात केली. पुढील फेरीत त्याचा रशियाच्या व्हादीम मुसाएव्हशी सामना होईल. आशियाई विजेत्या संजीतने जॉर्जियाच्या गिओर्गीला ४-१ अशी धूळ चारत अंतिम आठमध्ये प्रवेश निश्चित केला. आता त्याच्यापुढे इटलीच्या अझीझ अब्बास मौहिदिनचे आव्हान असेल.

  • अन्य उपउपांत्यपूर्व लढतींत, रोहित मोरला (५७ किलो) कझाकस्तानच्या सेरीक तेमिर्झानोव्हने १-४ असे, आकाश सांगवानला (६७ किलो) क्युबाच्या केव्हिन ब्राऊन बझैनने ०-५ असे, तर सुमित कुंडूला (७५ किलो) योएनलिस हर्नांडेझने ०-५ असे पराभूत केले.

२०७० पर्यंत शून्य कर्बउत्सर्जनाचे लक्ष्य :
  • भारत २०७० पर्यंत शून्य कर्बउत्सर्जनाचे लक्ष्य गाठेल, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्लासगो येथील संयुक्त राष्ट्रांच्या ‘सीओपी-२६’ या जागतिक हवामान परिषदेत सोमवारी दिली. भारत आपली गैर-जीवाश्म ऊर्जा क्षमता ५०० गिगावॅटपर्यंत वाढवेल आणि २०३० पर्यंत अक्षय ऊर्जेद्वारे आपली ५० टक्के ऊर्जेची गरज पूर्ण करेल, असा विश्वास मोदी यांनी जागतिक नेत्यांना आश्वस्त करताना व्यक्त केला. 

  • पुढील पिढीला जागरूक करण्यासाठी हवामान बदलाबाबतच्या धोरणांचा समावेश शालेय अभ्यासक्रमात करण्याची गरजही मोदी यांनी व्यक्त केली.

  • ‘सीओपी-२६’ परिषदेत सहभागी जागतिक नेत्यांपुढे पंतप्रधान मोदी यांनी भाषण केले. ते म्हणाले, आपल्याला परिस्थितीनुसार बदल हा विकास धोरणांचा आणि योजनांचा मुख्य भाग बनवावा लागेल. भारतात, नल से जल, क्लीन इंडिया मिशन आणि उज्ज्वला योजनांनी नागरिकांना फायदा झालाच, परंतु त्यांचे जीवनमानही उंचावले.

ऑक्टोबरमध्ये १.३० लाख कोटींहून अधिक जीएसटी संकलन :
  • सणोत्सवाच्या काळातील खरेदी हंगामाचा सुपरिणाम दिसू लागला असून वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संकलनाचा वेग कायम आहे. सरलेल्या ऑक्टोबरमध्ये या करापोटी १.३० लाख कोटी रुपये सरकारकडे जमा झाले आहेत. सलग चौथ्या महिन्यात जीएसटी संकलनाने एक लाख कोटींचा टप्पा ओलांडला.

  •  केंद्रीय अर्थमंत्रालयाने सोमवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, जीएसटी करप्रणाली १ जुलै २०१७ पासून लागू झाल्यापासूनचे हे दुसरे सर्वोच्च कर संकलन आहे. चालू वर्षात एप्रिलमध्ये सर्वाधिक १.४१ लाख कोटी रुपयांचे कर संकलन झाले होते. सणोत्सवाचा काळ असल्याने देशभर वस्तू आणि सेवांची मागणी वाढली आहे. त्याचेच प्रतिबिंब वाढलेल्या कर महसुलात उमटले आहे. वाहननिर्मिती क्षेत्रामध्ये सेमीकंडक्टरच्या पुरवठ्यात व्यत्यय आल्याने चारचाकी वाहने आणि इतर उत्पादनांच्या विक्रीवर परिणाम झाला नसता तर कर महसुलात आणखी भर पडली असती. 

  • सरकारचे महसुली उत्पन्न प्रत्येक महिन्याला वाढत असून सप्टेंबरच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये वाढीव जीएसटी संकलन झाले. सप्टेंबरमध्ये जीएसटीच्या माध्यमातून सरकारी तिजोरीत १.१७ लाख कोटी रुपये जमा झाले होते.

  • ते प्रमाण ऑक्टोबरमध्ये १,३०,१२७ लाख कोटी रुपयांवर पोहोचले असून, अर्थचक्र गतिमान झाल्याचे आणि मागणीत वृद्धी झाल्याचे हे निदर्शक असल्याचे अर्थमंत्रालयाने स्पष्ट केले. गेल्या वर्षी ऑक्टोबरच्या तुलनेत यंदा जीएसटीत २४ टक्के वाढ झाली. ऑक्टोबरमधील  महसुलात केंद्रीय  वाटा २३,८६१ कोटी रुपये, तर राज्यांनी वसूल केलेल्या जीएसटीचा वाटा ३०,४२१ कोटी रु पये आहे.

‘कोव्हॅक्सिन’ला ऑस्ट्रेलियाची मंजुरी; WHO चा निर्णय आज :
  • ऑस्ट्रेलियाने भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ या भारतीय बनावटीच्या करोना लशीच्या वापरास सोमवारी मंजुरी दिली. प्रवाशांचे लसीकरण झाल्याचे निश्चित करण्यासाठी ऑस्ट्रेलियात कोव्हॅक्सिनला मंजुरी देण्यात आल्याचे ऑस्ट्रेलियन सरकारने स्पष्ट केले.  

  • कोव्हॅक्सिन ही लस हैदराबाद येथील भारत बायोटेकने विकसित आणि उत्पादित केली आहे. भारतात कोव्हॅक्सिन आणि अ‍ॅस्ट्राझेनेका-ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेली कोव्हिशिल्ड या दोन लशींचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. कोव्हिशिल्डला ऑस्ट्रेलियाने यापूर्वीच मंजुरी दिली आहे.

  • ऑस्ट्रेलियाने कोव्हॅक्सिनबरोबरच ‘बीबीआयबीपी-कोरव्ही’ या सिनोफार्म कंपनीने विकसित केलेल्या चिनी लशीलाही मंजुरी दिली. १२ वर्षांपुढील प्रवाशांनी कोव्हॅक्सिन आणि १८ ते ६० वयोगटातील प्रवाशांनी ‘बीबीआयबीपी-कोरव्ही’ लस घेतली असल्यास त्यांचे लसीकरण झाल्याचे मानण्यात येईल, असे ऑस्ट्रेलियाच्या रोगनिवारक वस्तू प्रशासनाने (टीजीए) स्पष्ट केले.

०२ नोव्हेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.