चालू घडामोडी आणि दिनविशेष - 02 मार्च 2023

Date : 2 March, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :

सुनियोजित शहरे देशाचे भवितव्य : मोदी

  • ‘‘सुनियोजित भारतीय शहरे देशाचे भवितव्य ठरवतील. स्वातंत्र्यानंतर ७५ नियोजित शहरे विकसित केली असती तर आज भारताचे जगात वेगळे स्थान झाले असते,’’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सांगितले. अर्थसंकल्पानंतर आयोजित ‘वेबिनार’ मालिकेतील ‘शहरी नियोजन, विकास आणि स्वच्छता’ या विषयावरील चर्चेदरम्यान ते म्हणाले की, भारताच्या स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांत देशात केवळ एक किंवा दोनच नियोजित शहरे विकसित झाली आहेत.
  • मोदी म्हणाले, की भारतात झपाटय़ाने होत असलेल्या शहरीकरणामुळे पायाभूत सुविधा निर्माण करणेही महत्त्वाचे आहे. भारतातील सुनियोजित शहरेच देशाचे भवितव्य ठरवतील. जेव्हा नियोजन चांगले असेल तेव्हा आपली शहरे हवामानास अनुकूल व पुरेशा पाण्याची उपलब्धता असणारे सुसह्य ठिकाणे होतील.
  • मोदींनी यावेळी शहरी नियोजन आणि विकासासाठी विशेष लक्ष द्यावयाच्या तीन क्षेत्रांचा उल्लेख केला. त्यानुसार राज्यांत शहरी नियोजन परिसंस्था तंत्र मजबूत कसे करावे, शहरी नियोजनासाठी खासगी क्षेत्रात उपलब्ध असलेल्या कौशल्याचा अधिक चांगल्या प्रकारे उपयोग कसा करता येईल व शहरी नियोजनास नव्या उंचीवर घेऊन जातील अशा उत्कृष्ट केंद्रांचा विकास कसा करता येईल, यावर मोदींनी भर दिला.

‘भारत संशोधनाचे केंद्र होऊ शकतो’,करोना साथीचा आरोग्य यंत्रणेला फटका – बिल गेट्स

  • जागतिक आरोग्याच्या क्षेत्रात गेल्या २५ वर्षांत झालेली सुधारणा करोना साथीच्या पहिल्या २५ आठवडय़ांनी नष्ट केली. आता तीन वर्षांनंतरही अनेक देशांच्या आरोग्य यंत्रणा अद्याप पूर्णत: रुळावर आलेल्या नाहीत, असे प्रतिपादन बिल गेट्स यांनी बुधवारी केले. ही महासाथ भारतातील आरोग्य क्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोगांसाठी उत्प्रेरक ठरल्याचेही ते म्हणाले.
  • लस निर्मितीमधील विक्रमी कामगिरी आणि सार्वजनिक क्षेत्रात डिजिटल प्रणालीच्या प्रभावी वापरामुळे ‘सृजनशीलता आणि कल्पकता’ याचे जागतिक केंद्र होण्याची क्षमता भारताने सिद्ध केली असून गंभीर समस्यांचा सामना करण्यासाठी नव्या जागतिक सहकार्य युगाचा दूत भारत होऊ शकतो, असे गेट्स म्हणाले. पाचव्या ‘रामनाथ गोएंका स्मृती व्याख्याना’मध्ये ते बोलत होते.
  • जगाला विभाजित करणाऱ्या घटनांमधला दुवा होण्यासाठी नाविन्याची गरज आणि त्यात भारताची भूमिका विषद करताना गेट्स म्हणाले, की मी मायक्रोसॉफ्टमध्ये असताना १९९८ साली आम्ही येथे एक विकासकेंद्र स्थापण्याचा निर्णय घेतला. आम्ही हे केले, कारण भारत आगामी काळात मोठी भूमिका बजावणार आहे आणि केवळ नव्या शोधांचे लाभार्थी म्हणून नव्हे, तर स्वत: संशोधन हे आम्हाला माहिती होते.
  • चांगल्या दर्जाच्या आणि तरीही सर्वाना परवडण्याजोगी निर्मिती आणि त्याचा जलदगतीने स्वीकार भारत करू शकतो आणि लसी हे त्याचे सर्वात मोठे उदाहरण आहे. वातारवण बदल, आरोग्य यासारख्या जागतिक आव्हानांमध्ये भारताला मोठी भूमिका बजावायची असल्याचे गेट्स यांनी नमूद केले. यासाठी भारतात संशोधन झालेले आणि जगभरात प्रभावी ठरलेली रोटाव्हायरस लस, जैवइंधन आणि खतांमधील संशोधन त्यांनी अधोरेखित केले.

बोर्डाच्या परीक्षेला आज होणार सुरुवात, परीक्षेला जाण्यापूर्वी जाणून घ्या ‘ही’ मार्गदर्शक तत्त्वे

  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे (MSBSHSE) २०२२-२३ शैक्षणिक वर्षातील इयत्ता दहावीच्या परीक्षेची सुरुवात उद्या (२ मार्च २०२२) पासून होणार आहे. या परीक्षेची सुरुवात प्राथमिक भाषेच्या पेपरने होणार आहे. उद्या महाराष्ट्र राज्यामध्ये मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती, कन्नड, तमिळ, तेलगू, मल्याळम, सिंधी, बंगाली, पंजाबी या भाषांमध्ये हजारो विद्यार्थी पेपर देणार आहेत. तसेच जर्मन, फ्रेंच या विषयांसाठी द्वितीय किंवा तृतीय भाषेची परीक्षाही उद्याच होणार आहे. २ मार्च ते २५ मार्च असा या परीक्षेतचा कालावधी आहे. दहावीचे वर्ष प्रत्येक विद्यार्थ्यासाठी महत्त्वपूर्ण असते.  या परीक्षेच्या निकालावर विद्यार्थ्यांचे भविष्य अवलंबून असते. 
  • महाराष्ट्र राज्य बोर्डाची दहावीची परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेण्यात येणार आहेत. यानुसार SSCची परीक्षा देणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थी सकाळी ११ वाजता पेपर देतील, तर उरलेले विद्यार्थी दुपारी ३ वाजता परीक्षेला बसणार आहेत. विद्यार्थ्यांनी परीक्षा सुरु होण्याच्या ३० मिनिटांपूर्वी परीक्षा केंद्रात हजर राहणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांकडे शाळेचे ओळखपत्र आणि  MSBSHE दहावीचे प्रवेशपत्र अनिवार्य आहे. याशिवाय त्यांना परीक्षेला बसता येणार नाही. तीन तासांच्या परीक्षेच्या कालावधीमध्ये अधिक दहा मिनिटे जोडण्यात आली आहेत. परीक्षा देणाऱ्यांनी प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी शिक्षण मंडळाने या दहा मिनिटांमध्ये वेळ दिला आहे. 
  • यंदाची एसएससीची परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी शिक्षण मंडळाने काही योजना आखल्या आहेत. कॉपीमुक्त परीक्षा या मोहिमेअंतर्गत, दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांच्या काळात परीक्षा केंद्रांच्या ५० मीटरच्या परिसरातील फोटोकॉपीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय गैरप्रकार घडू नये म्हणून केंद्रांभोवती पोलिस बंदोबस्त वाढवण्यात येणार आहे अशी माहिती समोर आली आहे.

बीआरएसने महाराष्ट्रात सहा विभागीय समन्वयक नेमले

  • तेलंगना राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखरराव यांच्या भारत राष्ट्र समिती अर्थात बीआरएसने महाराष्ट्रात सहा विभागीय समन्वयक नेमले आहेत, अशी माहिती चेन्नुरचे आ.बी. सुमन यांनी दिली. या समन्वयकांच्या माध्यमातून महाराष्ट्रभर भारत राष्ट्र समितीने जाळे विणन्याचे काम करावे, अशी सूचना पक्षाच्यावतीने देण्यात आली आहे.
  • भारत राष्ट्र समितीच्या हैद्राबाद येथील मुख्य कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, बीआरएसने नाशिक विभागाच्या समन्वयकपदी दशरथ सावंत (अहमदनगर), पुणे विभागाच्या समन्वयकपदी बाळासाहेब जयराम देशमुख (पुणे), मुंबई विभागाच्या समन्वयकपदी विजय तानाजी मोहिते (रायगड), औरंगाबाद विभागाच्या समन्वयकपदाची जबाबदारी अहमदनगरचे सोमनाथ थोरात यांच्यावर सोपविण्यात आली आहे. तसेच अमरावती विभागाचे समन्वयक म्हणून निखील देशमुख (अमरावती) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  • भारत राष्ट्र समितीचे संस्थापक अध्यक्ष तथा तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखरराव यांच्या स्वाक्षरीनिशी महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, मुंंबई, औरंगाबाद, नागपूर व अमरावती या विभागातील समन्वयकांची घोषणा करण्यात आली आहे. जहिराबादचे खा. बी.बी.पाटील, चेन्नूरचे आ.बलकासुमन, बोधनचे आ.शकिल,भारत राष्ट्र समितीचे किसान सेल महाराष्ट्र अध्यक्ष माणिक कदम यांच्यासह इतरांनी समन्वयक निवडीसाठी मोलाची भूमिका घेतली.

मुंबई इंडियन्सच्या महिला संघाचे हरमनप्रीत कौरकडे नेतृत्व

महिला प्रीमियर लीग (डब्ल्यूपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या पहिल्या हंगामासाठी भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरकडे मुंबई इंडियन्स संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे.हरमनप्रीतने नुकतेच १५० आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० सामने पूर्ण केले. गेल्या दशकभरात भारतीय संघाने मिळवलेल्या यशात हरमनप्रीतने महत्त्वाचे योगदान दिले आहे. अर्जुन पुरस्कारप्राप्त हरमनप्रीतच्या नावे महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत एका सामन्यात सर्वाधिक नाबाद १७१ धावांचा विक्रमही आहे.

 

 

चालू घडामोडी आणि दिनविशेष - 02 मार्च 2022

 

विश्वचषक नेमबाजी स्पर्धा - सौरभ चौधरीला सुवर्ण :
  • सौरभ चौधरीने पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदकाची कमाई करताना पहिल्या ‘आयएसएसएफ’ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत मंगळवारी भारताचे खाते उघडले.

  • आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या सौरभने १६ अचूक लक्ष्यवेध करताना प्रथम क्रमांक पटकावला, तर जर्मनीच्या मायके शिवाल्डने (६) दुसरा क्रमांक पटकावला. रशियाच्या आर्टिम शेरनॉसोव्हने कांस्यपदक पटकावले.

  • मात्र हे पदक युक्रेनवरील हल्ल्यामुळे रशियाच्या खात्यावर जमा होणार नाही. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये प्रतिनिधित्व करणाऱ्या युवा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या १९ वर्षीय सौरभने पात्रता फेरीत ५८४ गुण कमावले. अंतिम फेरीसाठी पात्र ठरलेल्या आठ नेमबाजांपैकी त्याची कामगिरी तिसऱ्या क्रमांकाची ठरली.

राज्यातील वस्तू आणि सेवा कराच्या संकलनात घट :
  • राज्यातील वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) संकलनात जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारी महिन्यात सुमारे १३०० कोटींनी घट झाली आहे. ओमायक्रॉनच्या लाटेत लादण्यात आलेल्या निर्बंधांमुळे संकलनावर काही प्रमाणात परिणाम झाल्याचे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

  • फेब्रुवारी महिन्यात राज्यात वस्तू आणि सेवा कराचे १९ हजार ४२३ कोटींचे संकलन झाले. जानेवारी महिन्यात राज्यात २० हजार ७०४ कोटींचे संकलन झाले होते. जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारी महिन्यात संकलनात १२८२ कोटींची घट आली. राष्ट्रीय पातळीवर जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारीत ५.६ टक्के घट झाली. महाराष्ट्रातही हा कल कायम राहिला.

  • फेब्रुवारीत २८ दिवस असल्याने जानेवारीच्या तुलनेत संकलन कमीच होते. पण याबरोबरच ओमायक्रॉनच्या लाटेमुळे जानेवारीअखेरीस व फेब्रुवारीत लागू करण्यात आलेले निर्बंध तसेच रात्रीची संचारबंदी याचा संकलनावर परिणाम झाल्याचे वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. डिसेंबर व जानेवारी या दोन महिन्यांची तुलना केल्यास फेब्रुवारीतील संकलन घटले आहे.

युनायटेड वेस्टर्न बँकेचे माजी अध्यक्ष पी. एन. जोशी यांचे निधन :
  • ज्येष्ठ बँकिंग तज्ज्ञ व सातारा येथील युनायटेड वेस्टर्न बँकेचे माजी अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर नारायण ऊर्फ पी. एन. जोशी (वय ९०) यांचे साताऱ्यात अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे एक मुलगा व एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. संगम माहुलीतील कैलास स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

  • बँकिंग आणि आर्थिक क्षेत्रातील नामवंत जाणकार म्हणून त्यांची देशभर ओळख होती. त्यांनी रिझव्‍‌र्ह बँक, सारस्वत बँक, बँक ऑफ इंडियात विविध पदांवर काम केले. सातारच्या युनायटेड वेस्टर्न बँकेचे अध्यक्ष म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली होती. निवृत्तीनंतर ते साताऱ्यात स्थायिक झाले होते. सातारच्या सामाजिक, सांस्कृतिक व इतर कामांत त्यांचा मोठा सहभाग होता.

  • बँकिंग आणि आर्थिक क्षेत्रातील सरकारच्या धोरणांवर त्यांनी वेळोवेळी लोकसत्ता आणि विविध माध्यमांतून लिखाण केले. त्यांची ‘माय मेमरीज-गिलीम्सेस ऑफ चेंजिंग बँकिंग सिनॅरिओ’, ‘बँकिंग आणि वित्त धोरण – एक परामर्श’, ‘बदलत्या बँकिंगच्या छटा - माझ्या आठवणी’ (मराठी) व ‘नॅशनल बँकिंग पॉलिसी फॉर इनक्लुसिव्ह डेव्हलपमेंट’ ही पुस्तकं गाजली. खासगी बँक संघटनेचे ते पहिले अध्यक्ष होते. त्यांचे आध्यात्मिक, सामाजिक, सांस्कृतिक व अर्थशास्त्रात नियमित वाचन होते. बँकिंग साक्षरतेसाठी त्यांनी राज्यभर लोकजागृती करण्याचे मोठे काम केले.

महाराष्ट्रातील पर्यटन भारतीय नकाशावर ; पर्यटन क्षेत्रांच्या राष्ट्रीय प्रसिद्धीसाठी विविध उपक्रम :
  • करोनानंतर आता विविध निर्बंध दूर होत असताना पर्यटन क्षेत्रेही खुली होत असून महाराष्ट्रातील पर्यटन क्षेत्राला राष्ट्रीय नकाशावर आणण्यासाठी अमर्याद महाराष्ट्र (महाराष्ट्र अनलिमिटेड) ही मोहीम राबवण्यात येणार असून समुद्रकिनाऱ्यांपासून ते थंड हवेची ठिकाणे व जंगलांपर्यंत तुम्ही नाव घ्या आमच्याकडे ते आहे या संकल्पनेभोवती ही मोहीम आखण्यात आली आहे.

  • महाराष्ट्रातील पर्यटन क्षेत्रांची राष्ट्रीय पातळीवर चांगली प्रसिद्धी व्हावी यासाठी दिल्ली, बंगळुरू, अहमदाबाद, जयपूरसारख्या शहरांतील पर्यटनावर लेखन-यूटय़ूबसह विविध समाजमाध्यमांवरून कार्यक्रम करणारे ब्लॉगलेखक-प्रवासी-खवय्ये आदींसाठी महाराष्ट्रातील पर्यटन क्षेत्रांचा दौरा ९ मार्चपासून आयोजित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर देशातील विविध ९ शहरांत-राज्यांमध्ये महाराष्ट्राच्या पर्यटनाची प्रसिद्धी करणारे रोड शो ९ मार्चपासून होणार आहेत.

  • त्याचबरोबर जुन्नर द्राक्ष महोत्सवसह १८ ते २० फेब्रुवारी या काळात पार पडला. त्याचधर्तीवर नंदुरबार, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, वाई, पन्हाळा महोत्सव असे जवळपास २० महोत्सव आयोजित करण्यात येत आहेत. या महोत्सवांच्या माध्यमातून राज्यस्तरीय प्रसिद्धीबरोबरच स्थानिकांना रोजगार व उत्पन्न मिळण्याची सोय उपलब्ध व्हावी असा विचार आहे. तसेच ५ वाहिन्या, मुद्रित माध्यमे, १० एअर इंडियाची विमाने, ५०० टक्सी आदी विविध माध्यमांद्वारे महाराष्ट्र पर्यटनाची प्रसिद्धी करण्यात येणार आहे, अशी माहिती पर्यटन संचालनालयाने दिली.

अन्सारींचा ‘राजकीय वारसा’ नव्या पिढीला देणारी निवडणूक :
  • ‘‘अब्बास विधानसभेत गेल्यावर मुख्तार अन्सारी विधान परिषदेच्या सदस्यत्वासाठी प्रयत्न करतील. मग, पिता-पुत्र दोघेही उत्तर प्रदेशच्या विधिमंडळात दिसतील’’, असे खुरहाट गावातील एका शाळा व्यवस्थापकाचे म्हणणे होते.

  • उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाने ओमप्रकाश राजभर यांच्या सुहेलदेव भारतीय समाज पक्षाशी (एसबीएसपी) आघाडी केली आहे. माफिया व आमदार मुख्तार अन्सारी यांचे पुत्र अब्बास हे ‘एसबीएसपी’च्या चिन्हावर मऊ-शहर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

  • ‘बसप’च्या सर्वेसर्वा मायावती यांनी मुख्तार अन्सारी यांची पक्षातून हकालपट्टी केल्यावर ते ‘सप’मध्ये गेले. पण, त्यांना ‘एसबीएसपी’च्या चिन्हावर उमेदवारी दिली गेली. ऐनवेळी मुख्तार यांनी उमेदवारी अर्ज मागे घेऊन पुत्र अब्बास यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. मऊचा ‘राजकीय वारसा’ अब्बास यांच्याकडे दिला तर मुलगा राजकारणात जम बसवेल, असे मुख्तार अन्सारींना वाटते.

  • ‘’पंचवीस वर्षे काहींनी स्वत:चा विकास करून घेतला, आम्हाला काय मिळाले? अखिलेश-राजभर यांची आघाडी झाली नसती तर अन्सारींचे वर्चस्व संपले असते’’, अशी खंत मऊमधील मध्यमवयीन विणकर इमाम उल्ल हक यांनी व्यक्त केली.

  • मऊ-शहर विधानसभा मतदारसंघात माफिया व आमदार मुख्तार अन्सारी यांचा मुलगा अब्बास अन्सारी, भाजपचे अशोक सिंह आणि ‘बसप’चे प्रदेशाध्यक्ष भीम राजभर यांच्यामध्ये संघर्ष रंगलेला आहे. मऊ शहरात साडेचार लाख मतदार आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत बहुजन समाज पक्षाकडून लढणाऱ्या मुख्तार अन्सारी यांना ९६ हजार, भाजप आणि ओम प्रकाश राजभर यांच्या ‘एसबीएसपी’ युतीचे उमेदवार महेंद्र राजभर यांना ८८ हजार आणि सपचे उमेदवार अल्ताफ अन्सारी यांना ७२ हजार मते मिळाली होती.

  • अन्सारी यांना ८ हजारांच्या मताधिक्याने विजय मिळाला होता. पण, या वेळी ओम प्रकाश राजभर यांनी भाजपशी काडीमोड घेऊन अखिलेश यादव यांच्याशी युती केली आहे. मऊ-शहरात सुमारे ५० हजार राजभर मतदार आहेत. दीड लाख मुस्लीम मतदार असून या वेळी मुस्लीम ‘सप’कडे वळले आहेत. त्यामुळे ‘एसबीएसपी’च्या चिन्हावर उभ्या असलेल्या अब्बास अन्सारी यांचा पराभव करणे कठीण असल्याचे सांगितले जाते.

०२ मार्च चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.