चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०२ मार्च २०२१

Date : 2 March, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
देशात लस नोंदणी ‘पोर्टल’च्या माध्यमातून :
  • देशात एक मार्चपासून कोविड १९ प्रतिबंधक लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झाला असून पात्र व्यक्तींनी त्यांची नावनोंदणी को-विन २.० उपयोजनावर करायची नसून पोर्टलच्या माध्यमातून करायची आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले. को-विन अ‍ॅप हे प्ले स्टोअरवर उपलब्ध असून ते फक्त प्रशासकांसाठी आहे. लस घेण्यास पात्र व्यक्तींनी पोर्टलच्या माध्यमातून नावनोंदणी करायची आहे.

  • मंत्रालयाने  ट्विट संदेशात म्हटले आहे, की लसीकरण नोंदणी व वेळेची नोंदणी कोविन पोर्टल ‘डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू कोविन डॉट गव्ह डॉट इन’ येथे लसीकरणासाठी नोंदणी करायची आहे. प्लेस्टोअरवरील उपयोजन हे प्रशासकांसाठी आहे. सरकारने बुधवारी असे जाहीर केले होत, की तिसऱ्या टप्प्यात १ मार्चपासून साठीवरील  व्यक्ती तसेच ४५ वर्षे व त्यावरील वयोगटातील सह आजाराच्या व्यक्तींना लस देण्यात येईल. त्यासाठी आता कोविन पोर्टल ‘डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू डॉट कोविन डॉट गव्ह’ उपलब्ध करण्यात आले आहे.

  • आरोग्य सेतूच्या माध्यमातूनही लसीकरणासाठी नोंदणी करता येणार आहे.  लाभार्थी थेट लसीकरण केंद्रात येऊन ओळख पटवून लस घेऊ शकतात. पात्र व्यक्ती त्यांच्या पसंतीचे ठिकाण  व वेळ उपलब्धतेनुसार निवडू शकतात. साठ वर्षे वयावरील सर्व नागरिक लसीकरणास पात्र आहेत. या शिवाय वीस सहआजार असलेले ४५ ते ५९ वयोगटातील व्यक्तीही लसीकरणास पात्र आहेत.

  • नागरिकांनी कोविन पोर्टलवर नोंदणी करायची असून ती मोबाईल क्रमांकाच्या मदतीने करता येईल. या वेळी वन टाइम पासवर्ड दिला  जाईल. कोविनवर खाते सुरू करून मोबाइल क्रमांकाच्या मदतीने नोंदणी व वेळ घेता येणार आहे. लाभार्थीना आयडी कार्डचा प्रकार व क्रमांक दिला जाईल.

फास्टॅगमुळे वार्षिक २० हजार कोटींची बचत :
  • महामार्गावर फास्टॅग बंधनकारक करण्यात आल्याने इंधनावर दरवर्षी २० हजार कोटी रुपयांची बचत होण्यास मदत होणार आहे आणि महसुलात जवळपास १० हजार कोटी रुपयांची वाढ होणार आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी येथे सांगितले.

  • फास्टॅग बंधनकारक केल्याने टोल नाक्यांवर होणाऱ्या विलंबामध्ये लक्षणीय कपात झाली आहे, इंधनाच्या खर्चावर दरवर्षी त्यामुळे २० हजार कोटी रुपयांची बचतही झाली आहे.

  • इतकेच नव्हे तर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने टोलवसुली केल्याने महसुलामध्ये दरवर्षी १० हजार कोटी रुपयांची वाढ होणार आहे, असेही त्यांनी सांगितले. फास्टॅगमार्फत दररोजची टोलवसुली १०४ कोटी रुपयांवर पोहोचली आहे, असे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे सांगण्यात आले.

भारतातील शाळकरी विद्यार्थ्यांकडून १८ लघुग्रहांचा शोध :
  • भारतीय विद्यार्थ्यांच्या चमूने एका वैज्ञानिक प्रकल्पात अठरा नवीन लघुग्रहांचा शोध लावला असल्याचे आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघटनेने (आयएयू) म्हटले आहे.

  • भारतातील विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय लघुग्रह शोध प्रकल्पात भाग घेतला होता. स्टेम व स्पेस या संस्थांनी आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय संशोधन आघाडीच्या मदतीने नासा नागरी विज्ञान प्रकल्पाचा भाग म्हणून ही मोहीम हाती घेतली होती. गेल्या दोन वर्षांत भारतातील दीडशे विद्यार्थी यात सहभागी झाले. त्यात एकूण १८ नवे लघुग्रह शोधण्यात आले आहेत.

  • स्टेम अँड स्पेसच्या प्रमुख मिला मित्रा यांनी सांगितले की, हा सर्वात मोठा प्रकल्प होता.  या प्रकल्पात भारतातील तसेच जगातील विद्यार्थ्यांनी खगोलशास्त्रीय माहितीचा अभ्यास केला. ही माहिती आंतरराष्ट्रीय खगोल संशोधन आघाडीने पुरवली होती. त्यात विद्यार्थ्यांनी लघुग्रह व पृथ्वी निकटचे घटक शोधून काढणे अपेक्षित होते. पृथ्वी निकटचे घटक हे मंगळ ते गुरू या पट्टय़ात फिरत असतात, पण ते काही वेळा पृथ्वीवर आदळण्याचा धोका असतो.

  • मित्रा व त्यांच्या पथकाने म्हटले आहे की, विद्यार्थ्यांनी सॉफ्टवेअर व खगोलीय माहिती विश्लेषण यातून रोज दोन-तीन तास काम करून लघुग्रह शोधले आहेत. सुरुवातीला प्राथमिक निरीक्षणात ३७२ लघुग्रह ओळखण्यात आले. त्यानंतर १८ हंगामी लघुग्रह म्हणून मान्य करण्यात आले. याचा अर्थ अजून त्यांच्यावर अंतिम शिक्कामोर्तब बाकी आहे.

जीएसटी मधून केंद्र सरकारची घसघशीत कमाई, सलग तिसर्‍या महिन्यात एक ट्रिलियन जमा :
  • फेब्रुवारी महिन्यात वस्तू व सेवा कर (जीएसटी) वसुलीने एक ट्रिलियन रुपयांचा टप्पा ओलांडला कोविड-१९ या साथीच्या रोगानंतर सलग पाचव्या महिन्यासाठी आणि सलग तिसर्‍यांदा १.१ ट्रिलियन रुपयांची वसुली केली, अशी माहिती सरकारने सोमवारी दिली.

  • फेब्रुवारीमध्ये जमा झालेला जीएसटी महसूल १.१३ ट्रिलियन रुपये होता, जो मागील वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत ७ टक्क्यांनी वाढला आहे.

  • “गेल्या पाच महिन्यांतील जीएसटीच्या उत्पन्नातील वसुलीच्या अनुषंगाने फेब्रुवारी २०२१ या महिन्यातील महसूल मागील वर्षातील याच महिन्यात जीएसटीच्या उत्पन्नाच्या तुलनेत ७ टक्क्यांनी अधिक आहे,” असे सरकारने सांगितले.

  • एकूण जमा झाल्यापैकी केंद्रीय जीएसटी (सीजीएसटी) सुमारे २१,०९२ कोटी रुपये, राज्य जीएसटी (एसजीएसटी) २७,२७३ कोटी रुपये आहे. दरम्यान, एकात्मिक जीएसटी (आयजीएसटी) संकलन ५५,२५३ कोटी रुपये (वस्तूंच्या आयातीवर जमा झालेले २४,३८२ कोटी रुपये) आणि सेस ९,५२५ कोटी (वस्तूंच्या आयातीवर जमा झालेल्या ६६० कोटी रुपयांचा समावेश आहे) आहे.

  • सरकारने सीजीएसटीला २२, ३९८ कोटी रुपये आणि आयजीएसटीकडून १७.५३४ कोटी रुपये नियमित सेटलमेंट म्हणून घेतले आहेत. या व्यतिरिक्त, केंद्र व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील ५०:५० च्या गुणोत्तरानुसार आयजीएसटीमध्ये तात्पुरता म्हणून केंद्रानेही ,४८,००० कोटी रुपयांचा तोडगा काढला आहे.

जगातली सर्वात जुनी भाषा न शिकल्याचे दु:ख मोदींनी केले व्यक्त :
  • तमिळ ही जगातील सर्वात जुनी भाषा आणि ती न शिकणे ही आपल्या दीर्घकालीन राजकीय कारकिर्दीतील खूप मोठी खंत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा सांगितले. आपल्या ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमात त्यांनी तमिळ साहित्य आणि कवितांचे कौतुक केले आहे.

  • या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींना अपर्णा रेड्डी यांनी विचारले होते की, मुख्यमंत्री व पंतप्रधान या राजकारणातील दोन महत्वाच्या भूमिका निभावतानाच्या दीर्घ प्रवासात कोणत्या गोष्टी करायचे राहून गेले असे आपल्याला वाटते आहे?

  • “मी या प्रश्नाबद्दल विचार केला आणि मला असे वाटते की – जगातील सर्वात जुनी भाषा तमिळ मी शिकू शकलो नाही ही खेदाची गोष्ट आहे. ही एक सुंदर भाषा आहे आणि जगभरात लोकप्रिय आहे. बर्‍याच लोकांनी मला तमिळ साहित्य, तमिळ कवितांबद्दल आणि त्याच्या गुणांबद्दल सांगितले आहे”, असे पंतप्रधान म्हणाले.

  • पंतप्रधान मोदींनी अलीकडच्या काळात आपल्या भाषणांमध्ये तमिळ भाषेचा वापर केला होता आणि संसदेत तमिळ श्लोकांचा वापरही केला होता. २०१८ मध्येही त्यांनी जाहीरपणे तमिळ बोलू न शकल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली होती. २०१९ मध्ये संयुक्त राष्ट्राला संबोधित करताना त्यांनी तमिळ तत्त्ववेत्ता-कवी कानियान पुंगुंद्रनार यांचे विचार नमूद केले होते.

भारतीय विद्यार्थ्यांनी शोधले १८ नवीन लघुग्रह :
  • आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघ ही संस्था, अवकाशातील ग्रह, गोलांना अधिकृत नावे व पद देण्याचे काम करते. या संस्थेने जागतिक विज्ञान कार्यक्रमाचा भाग म्हणून भारतीय विद्यार्थ्यांनी १८ नवीन लघुग्रह शोधल्याची माहिती नुकतीच दिली आहे.

  • नासाच्या नागरिक विज्ञान प्रकल्पाचा एक भाग म्हणून आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि अंतराळ विज्ञानाच्या अभ्यासानुसार एसटीईएम अँड स्पेस या संस्थेने आंतरराष्ट्रीय लघुग्रह शोध प्रकल्प आयोजित केला होता.एसटीईएम अँड स्पेस या संस्थेचे सह-संस्थापक आणि शैक्षणिक प्रमुख, मिला मित्रा यांनी पीटीएआयला सांगितले की, गेल्या दोन वर्षात, संपूर्ण भारतातून १५० विद्यार्थ्यांनी लघुग्रह शोधण्यासाठी दोन महिन्यांच्या या मोहिमेमध्ये भाग घेतला होता.

  • लहान मुलांसाठी लघुग्रह आणि नियर अर्थ ऑब्जेक्ट्स (एनईओ) शोधण्यासाठी हा एक ऑनलाइन वैज्ञानिक प्रकल्प आहे. या प्रकल्पात भारत आणि जगभरातील विद्यार्थ्यांनी आयएएससीद्वारे प्रदान केलेल्या उच्च गुणवत्तेच्या खगोलशास्त्रीय माहितीचे विश्लेषण केले.

  • एनईओ म्हणजे मंगळ आणि बृहस्पति यांच्या दरम्यान असलेल्या कक्षामध्ये आढळून येणाऱ्या खडकाळ वस्तू आहेत, ते त्यांच्या कक्षापासून विचलित होऊ शकतात आणि ज्यांमुळे पृथ्वीला एक प्रकारचे आव्हान निर्माण होवून परिणामी त्याचा धोका उत्पन्न होवू शकतो.

‘एमपीएससी’ने उमेदवारांसाठी सुरू केली नवीन सुविधा :
  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून आयोजित विविध भरतीप्रक्रियेच्या अनुषंगाने ऑनलाईन अर्जप्रणाली अथवा सर्वसाधारण प्रकारच्या अडचणी/शंका निवारणासाठी आयोगाकडून १८००-१२३४-२७५ आणि १८००-२६७३-८८९ या टोल फ्री क्रमांकावर मदत केंद्र(हेल्प डेस्क/कॉल सेंटर)ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आयोगाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे याबाबत माहिती दिली आहे.

  • या टोल फ्री क्रमांकावर सद्यस्थितीत ऑनलाईन अर्जप्रणाली अथवा सर्वसाधारण स्वरुपाच्या अडचणी/शंकाचे निवारण होईल. तसेच, ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या अनुषंगाने तांत्रिक/सर्वसाधारण पात्रता अथवा अर्ज भरण्याच्या प्रक्रियेबाबतच्या अडचणींचे निवारण देखील केले जाणार आहे.

  • वरील टोल फ्री क्रमांकावर प्राप्त होणारे दूरध्वनी संभाषणाचे (टेलिफोन कॉल्स) आयोगाच्या कार्यालयाकडून संनियंत्रण व विश्लेषण केले जाणार आहे.

  • हे टोल फ्री क्रमांक २ मार्च २०२१ पासून सोमवार ते शुक्रवार सकाळी ९ ते रात्री ८ आणि शनिवार व रविवारी सकाळी ९.३० ते सायंकाळी ६.३० कार्यान्वित राहणार असल्याचे आयोगाकडून सांगण्यात आलेले आहे. तसेच टोल फ्री क्रमांकाच्या सुविधेव्यतिरिक्त उमेदवारांना [email protected] या ईमेल आयडीवर तांत्रिक बाबींच्या अनुषंगाने संपर्क साधता येणार आहे.

०२ मार्च चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.