चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०२ जून २०२१

Updated On : Jun 02, 2021 | Category : Current Affairs


‘सीरम’मध्ये कोव्होव्हॅक्सची प्रायोगिक निर्मिती :
 • पुण्याच्या सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया या कंपनीने जोखीम घेत कोव्होव्हॅक्स या नवीन लशीचे उत्पादन चाचणी स्तरावर सुरू केले आहे. या लशीला आपत्कालीन मान्यता मिळण्यासाठी कंपनी प्रयत्नशील आहे. ही लस प्रथिनांवर आधारित  आहे.

 • पुण्याची सीरम इन्स्टिटय़ूट कोव्होव्हॅक्स लस तयार करण्यासाठी  प्रयत्न करीत असून ही लस नोव्होव्हॅक्सची आवृती आहे. अमेरिकेने संरक्षण उत्पादन कायदा लागू करून लशीला लागणारे घटक निर्यात करण्यावर निर्बंध लागू केल्याने या लशीची निर्मिती शक्य झालेली नव्हती. आता कंपनीत कोव्होव्हॅक्सचे चाचणी उत्पादन अगदी कमी प्रमाणात सुरू झाले असून काही प्रमाणात कच्चे घटकही मिळाले आहेत.

 • अमेरिकेकडून आणखी लस घटक मिळण्याची शक्यता आहे. त्यावर लशीचे भवितव्य अवलंबून आहे. अमेरिकी सरकारशी याबाबत चर्चा सुरू आहे, असे या घडामोडींशी परिचित व्यक्तींचे म्हणणे आहे.

 • कोव्होव्हॅक्स ही नोव्होव्हॅक्स लशीची प्रगत आवृत्ती असून त्याला अजून देशात मान्यता मिळालेली नाही. नोव्होव्हॅक्सने त्यांच्या लशीच्या चाचण्या  युरोप, ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया या देशांत घेण्याचे ठरवले असून जुलै ते सप्टेंबरदरम्यान या लशीच्या आपत्कालीन परवान्यासाठी अर्ज केला जाण्याची शक्यता आहे.

सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा अखेर रद्द! केंद्र सरकारचा मोठा निर्णय :
 • गेल्या काही दिवसांपासून देशात सुरू असलेल्या सीबीएसई बोर्डाच्या परीक्षांबाबत सुरू असलेल्या चर्चेवर अखेर पडदा पडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात मंगळवारी घेतलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशात निर्माण झालेल्या करोनाच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

 • सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा देखील करोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्याची मागणी केली जात होती. करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या काळामध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा आणि सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भिती देखील वर्तवली जात होती. या पार्श्वभूमीवर अखेर पंतप्रधानांनी घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 • परीक्षा होणार नसल्यामुळे आता १२वीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचा प्रश्न निर्माण होणार असून त्यासंदर्भात सीबीएसई निश्चित अशा मानकांच्या आधारे नियोजित वेळ ठरवून त्यानुसार मूल्यमापन करून निकाल जाहीर करेल, असं देखील स्पष्ट करण्यात आलं आहे. यासोबतच, गेल्या वर्षीप्रमाणेच याहीवर्षी ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायची असेल, त्यांना जेव्हा परिस्थिती सामान्य होईल, तेव्हा परीक्षा देण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला जाईल, असं देखील स्पष्ट करण्यात आलं आहे.

जाणून घ्या - कोणत्या रुग्णांना देता येईल ‘DRDO’चे ‘2-DG’ हे औषध :
 • संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) विकसित केलेल्या ‘२ डीऑक्सी-डी-ग्लुकोज’ (२-डीजी) या कोविड-१९ प्रतिबंधक औषधाला भारताच्या औषध महानियंत्रकांनी (डीसीजीआय) आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिल्यानंतर सोमवारी याचे अनावरण करण्यात आले. हे औषध करोनाची सौम्य ते तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांवर सहायक उपचार पद्धती म्हणून वापरले जाईल.

 • २-डीजी हे औषध रुग्णालयात असलेल्या रुग्णांना लवकर बरे होण्यात मदत करत असल्याचे, तसेच प्राणवायूच्या अतिरिक्त पुरवठ्यावरील त्यांचे वापर कमी करत असल्याचे प्राथमिक चाचण्यांमध्ये आढळून आले आहे, असे संरक्षण मंत्रालयाने सांगितले होते.

 • संरक्षण अनुसंधान आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) करोना रुग्णांवरील उपचारासाठी २ डीजी (2-DG) नावाचं औषध तयार केलं आहे. हे औषध कोणत्या रुग्णांना द्यावे आणि कोणत्या नाही, याबाबत जाणून घेऊ या…

 • केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी या अँटी-कोविड औषध २-डीजीचे पहिल्या बॅचचे अनावरण केले होते. त्यानंतर आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी दिल्ली एम्सचे संचालक डॉ रणदीप गुलेरिया यांच्याकडे औषधाचा साठा सुपूर्द केला होता.

भारतीय खेळाडूंच्या कुटुंबीयांना इंग्लंडला जाण्याची परवानगी :
 • भारतीय पुरुष आणि महिला क्रिकेट संघातील खेळाडूंना आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी कुटुंबातील सदस्यांनाही सोबत घेऊन जाण्याची परवानगी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मंगळवारी दिली. मात्र इंग्लंडमधील विलगीकरणाच्या कठोर निर्बंधांमुळे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम लढतीसाठी बीसीसीआयचा एकही पदाधिकारी उपस्थित राहणार नसल्याचे समजते.

 • भारत-न्यूझीलंड यांच्यात १८ जूनपासून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी रंगणार असून त्यानंतर ऑगस्टमध्ये भारत-इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. या प्रदीर्घ दोन ते तीन महिन्यांच्या दौऱ्यासाठी भारतीय खेळाडू बुधवार, २ जून रोजी इंग्लंडला रवाना होणार आहेत. या काळात जैव-सुरक्षित वातावरणात राहताना कुटुंबीयांसह वेळ घालवण्याची मुभा द्यावी, अशी मागणी खेळाडूंनी केली होती.

 • ‘‘जैव-सुरक्षित वातावरणात राहणे किती आव्हानात्मक असते, हे खेळाडूच जाणतात. अशा वेळी कुटुंबातील सदस्य सोबतीला असणे मानसिकदृष्टय़ा गरजेचे असते. त्यामुळे भारतीय पुरुष तसेच महिला संघातील सर्व खेळाडूंना आपापल्या कुटुंबीयांसह इंग्लंडला जाण्याची परवानगी देण्यात आली आहे,’’ असे ‘बीसीसीआय’च्या पदाधिकाऱ्याने सांगितले.

०२ जून चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

टिप्पणी करा (Comment Below)