चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०२ जून २०२०

Date : 2 June, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
करोना रुग्णसंख्येत भारत सातव्या क्रमांकावर :
  • देशातील करोनाचे रुग्ण सलग दुसऱ्या दिवशी आठ हजारांहून अधिक संख्येने वाढले. गेल्या चोवीस तासांमध्ये ८,३९२ रुग्णांची नोंद झाल्याने एकूण रुग्णांची संख्या एक लाख ९० हजार ५३५ वर पोहोचली आहे. करोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेल्या दहा देशांमध्ये भारत सातव्या क्रमांकावर आहे.

  • करोनाबाधितांच्या संख्येत आठवडय़ापूर्वी भारत नवव्या क्रमांकावर होता. आता मात्र देशातील रुग्णांची संख्या फ्रान्समधील रुग्णांपेक्षा जास्त झाली आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये ४,८३५ रुग्ण बरे झाले असून एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या ९१,८१९ इतकी झाली आहे.

  • रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४८.१९ टक्क्यांवर पोहोचले आहे. १८ मे रोजी हे प्रमाण ३८.२९ टक्के होते.आतापर्यंत ३८ लाख ३७,२०७ नमुना चाचण्या झाल्या असून दररोज एक लाख चाचण्या करता येणे शक्य झाले आहे. देशभरातील एकूण मृत्यूची संख्या ५,३९४ वर पोहोचली आहे.

देशाचं नाव ‘इंडिया’ऐवजी ‘भारत’ करा, सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी :
  • भारतीय राज्यघटनेतून ‘इंडिया’ शब्द काढून टाकावा आणि केवळ ‘भारत’ हे नाव ठेवावे अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. आज या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

  • घटनेतील कलम १ मध्ये सुधारणा करून इंडिया हा शब्द हटवावा, असं याचिकाकर्त्याचं म्हणणं आहे. संविधानाच्या अनुच्छेद १ मध्ये सुधारणा करण्याचे आदेश देण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. हा अनुच्छेद देशाच्या नावाशी संबंधित आहे. यामध्ये बदल करून इंडिया या इंग्रजी नावाऐवजी भारत नाव वापरावं, अशी मागणी याचिकेमध्ये आहे.

  • दिल्लीतील एका व्यक्तीने ही याचिका केली आहे. यापूर्वी, शुक्रवारी या याचिकेवर सुनावणी घेण्यात येणार होती. मात्र, सरन्यायाधीश शरद बोबडे अनुपस्थित असल्यानं सुनावणी यादीतून हे प्रकरण वगळण्यात आलं. त्यानंतर आज (दि.२) सरन्यायाधीश शरद बोबडे , न्या. ए.एस. बोपन्ना आणि न्या. ऋषिकेश रॉय यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी होणार आहे. करोना व्हायरसमुळे लॉकडाउन असल्याने सध्या सर्वोच्च न्यायालयात केवळ तातडीच्या याचिकांवर सुनावणी सुरु आहे.

राज्यसभेच्या १८ जागांसाठी १९ जून रोजी निवडणुका; त्याच दिवशी जाहीर होणार निकाल :
  • देशातील राज्यसभेच्या १८ जागांसाठी होणाऱ्या निवडणुका करोना व्हायरच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आल्या होत्या. परंतु आता या निवडणुका १९ जून रोजी पार पडणार असल्याची माहिती निवडणूक आयोगानं दिली आहे. त्याच दिवशी संध्याकाळी पाच वाजता मतमोजणीही करण्यात येणार आहे. करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर २६ मार्च रोजी होणाऱ्या या निवडणुकांना तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती.

  • राज्यसभेच्या ५५ जागांसाठी २६ मार्च रोजी निवडणुका पार पडणार होत्या. ५५ पैकी ३७ उमेदवार हे बिनविरोध निवडून आले आहोत. परंतु १८ जागांवर निवडणूक प्रक्रिया पार पडणार होती. उर्वरित जागा या जागा आंध्र प्रदेश, झारखंड, मध्यप्रदेश, मणिपूर, राज्यस्थान, गुजरात आणि मेघालय या राज्यांच्या कोट्यातील आहेत.

  • राज्यसभेच्या १८ जागांसाठी १९ मे रोजी निवडणुका घेण्यात येणार आहे. तसंच त्याच दिवशी या निवडणुकांचे निकालही घोषित करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी दिली. आंध्र प्रदेशच्या ४, झारखंडच्या २, मध्यप्रदेशातील ३, मणीपूरच्या एक, मेघालयच्या एक, राजस्थानच्या ३ आणि गुजरातच्या चार जागांसाठी ही निवडणुक प्रक्रिया पार पडणार आहे. १९ जून रोजी सकाळी ९ वाजल्यापासून मतदानाला सुरूवात होणार आहे.

रशियाने बनवलं नवीन औषध, चार दिवसात रुग्ण करोनामुक्त झाल्याचा निष्कर्ष :
  • रशियाने करोना व्हायरसवर प्रभावी ठरणारे एक औषध विकसित केले आहे. पुढच्या आठवडयापासून रशियामध्ये करोनाची लागण झालेल्या रुग्णांवर या औषधाचा वापर सुरु होणार आहे. रशियाच्या आरोग्य यंत्रणेने हे औषध वापरण्यास मंजुरी दिली आहे. रॉयटर्सने हे वृत्त दिले आहे. या नव्या औषधामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होईल तसेच विस्कटलेली आर्थिक घ़डी रुळावर येऊन सर्वसामान्य जीवन हळूहळू पूर्वपदावर येईल अशी अपेक्षा आहे.

  • एविफेविर या नावाने औषधाची नोंदणी झाली आहे. पुढच्या आठवडयापासून म्हणजे ११ जूनपासून रशियन रुग्णालयांमध्ये करोना रुग्णांवर या अँटीव्हायरल औषधाने उपचार सुरु होणार आहेत. रशियाच्या आरडीआयएफ प्रमुखाने रॉयटर्सला ही माहिती दिली. एविफेविर औषध बनवणारी कंपनी महिन्याला ६० हजार रुग्णांवर उपचार करता येतील, इतक्या प्रमाणात औषध बनवणार आहे.

  • करोना व्हायरसचा फैलाव रोखणारी सध्या कुठलीही लस उपलब्ध नाहीय. आधीपासूनच अस्तित्वात असलेल्या काही औषधांच्या चाचण्या सुरु असून काही औषध प्रभाव सुद्धा ठरत आहेत. अमेरिकेतील गिलीयड सायन्सेस या कंपनीने बनवलेले रेमडेसिविर हे अँटीव्हायरल औषधही करोनावरील उपचारांमध्ये प्रभावी ठरत आहे.

०२ जून चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.