चालू घडामोडी आणि दिनविशेष - 02 जानेवारी 2024

Date : 2 January, 2024 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
अयोध्येतल्या राम मंदिरातील रामाची मूर्ती साकारणारे मूर्तीकार अरुण योगीराज कोण आहेत?
  • अयोध्येतल्या राम मंदिरात २२ जानेवारी या दिवशी रामाची मूर्ती स्थापन करुन प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. रामलल्लाची म्हणजेच बाल रुपातील रामाची मूर्ती मंदिरात असणार आहेच. याशिवाय राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान यांचीही मूर्ती मंदिरात असणार आहे. प्रसिद्ध मूर्तीकार अरुण योगीराज यांनी साकारलेली मूर्ती या मंदिरातल्या गाभाऱ्यात प्राणप्रतिष्ठा करुन ठेवली जाणार आहे. अरुण योगीराज यांनी साकारलेल्या मूर्तीची निवड झाल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली आहे. आपण जाणून घेऊ हे मूर्तीकार अरुण योगीराज कोण आहेत?
  • कोण आहेत अरुण योगीराज?
  • अरूण योगीराज हे कर्नाटकमधल्या मैसूरचे आहेत. त्यांचं घराणंच मूर्तीकारांचं आहे. कारण गेल्या पाच पिढ्यांपासून त्यांच्या घरात मूर्ती तयार करण्याचं काम होतं. अरुण योगीराज हे फक्त कर्नाटकातच नाहीत तर देशभरातल्या प्रसिद्ध मूर्तीकारांमधले एक प्रतिथयश मूर्तीकार म्हणून त्यांची गणना होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अरुण योगीराज यांच्या कामाचं कौतुक केलं आहे. अरुण यांना मूर्ती साकारण्याचा वारसा आपल्या घरातूनच मिळाला आहे.

लहानपणापासून मूर्तीकलेची आवड

  • अरुण योगीराज यांना लहानपणापासूनच मूर्तीकलेची आवड होती. त्यांनी MBA केलं. त्यानंतर ते एका खासगी कंपनीत कामही करत होते. मात्र मूर्तीकला ते विसरले नाहीत. २००८ मध्ये नोकरी सोडून त्यांनी मूर्ती साकारण्याच्या आपल्या पिढीजात व्यवसायातच काम करण्याचा निर्णय घेतला. अल्पावधीतच ते लोकप्रिय मूर्तीकार झाले.
  • अरुण योगीराज यांनी इंडिया गेट या ठिकाणी बसवण्यात आलेला नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा ३० फूट उंचीचा पुतळा साकारला आहे. ही पुतळा नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंतीच्या दिवशी दिल्लीतल्या इंडिया गेट या ठिकाणी बसवण्यात आला आहे.

अरुण योगीराज यांनी काय शिल्पं साकारली आहेत?

  • अरुण योगीराज यांनी केदारनाथ या ठिकाणी आदी शंकराचार्यांचा १२ फूट उंचीचा पुतळाही साकारला आहे. मैसूर या ठिकाणी स्वामी रामकृष्ण परमहंस यांची मूर्तीही त्यांनी साकारली आहे. मैसूरच्या राजाचा १४ फुटांचा पुतळाही त्यांनी तयार केला आहे. तर मैसूर या ठिकाणीच त्यांच्या हातातून निर्मिलेली हनुमानाची २१ फुटांची मूर्तीही बसवण्यात आली आहे. तर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांचा १५ फूट उंचीचा पुतळाही त्यांनी तयार केला आहे. त्यांची ही कला संपूर्ण देशात पोहचली आहे. देशातल्या नामांकित मूर्तीकारांमध्ये आणि शिल्पकारांमध्ये त्यांचा समावेश होतो.
अयोध्येच्या राम मंदिरात स्थापन होणारी मूर्ती ठरली; मूर्तीकार अरूण योगीराज यांनी साकारलं प्रभू श्रीरामाचं लोभस रूप
  • अयोध्येत २२ जानेवारी या दिवशी प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या सोहळ्याचा उत्साह देशभरात सुरु आहे. तसंच विविध प्रकारे तयारीही केली जाते आहे. राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी विविध मान्यवरांना, राजकारण्यांना निमंत्रणंही पाठवण्यात आलं आहे. राम मंदिराचा हा उद्घाटन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडणार आहे. अयोध्येत रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे, ती मूर्ती ठरल्याचं केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितलं आहे. त्याचप्रमाणे एक फोटोही त्यांनी पोस्ट केला आहे. ज्याची चर्चा होते आहे.

प्रसिद्ध मूर्तीकार योगीराज अरुण यांनी घडवली रामाची मूर्ती

  • अयोध्येतील मंदिरात जी रामाची मूर्ती असणार आहे ती प्रसिद्ध मूर्तीकार योगीराज अरुण यांनी घडवली आहे. अरुण योगीराज हे प्रसिद्ध मूर्तीकार आहेत. प्रसिद्ध मूर्तीकार योगीराज शिल्पी यांचे पुत्र आहेत. अरुण यांचे आजोबा वाडियार घराण्यातल्या महालांना सुंदर रुप द्यायचे. २००८ मध्ये अरुण यांनी एमबीए केलं. त्यांना मूर्तीकार व्हायचं नव्हतं. पण त्यांच्या आजोबांनी सांगितलं होतं की अरुण मूर्तीकार होईल. एका खासगी कंपनीत काम केल्यानंतर अरुण यांनी मूर्तीकाम करण्यास सुरुवात केली आणि त्यांच्या आजोबांनी सांगितल्याप्रमाणे प्रसिद्ध मूर्तीकार झाले.

समोर आलेल्या फोटोत काय?

  • ANI च्या वृत्तानुसार केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी रामाच्या मंदिरात प्राणप्रतिष्ठेसाठी मूर्ती ठरली असं म्हटलं आहे. “अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या अभिषेकासाठी मूर्तीची निवड निश्चित झाली आहे. आपल्या देशातील प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगी यांनी तयार केलेल्या रामाच्या मूर्तीची अयोध्येत स्थापना केली जाणार आहे.” असंही त्यांनी म्हटलं आहे. तसंच जो फोटो पोस्ट करण्यात आला आहे त्यात मूर्तीकार अरुण योगीराज रामाच्या मूर्तीसह दिसत आहेत. राम, लक्ष्मण आणि सीता तसंच त्यांच्या पायाशी हनुमान अशी ही मूर्ती आहे. या मूर्तीचं रुप अत्यंत देखणं आणि खास आहे.
  • केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. मात्र या मूर्तीची राम मंदिरात प्रतिष्ठापना केली जाणार की नाही, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती मिळालेली नाही. अरुण योगीराजांच्या मूर्तीची केवळ निवड करण्यात आली आहे.

मूर्तीवर पडणार सूर्याची किरणे

  • राम मंदिराच्या गाभाऱ्यात रामलल्लाच्या दोन मूर्ती असतील. एक प्रभू श्रीरामाच्या बालपणातील रामलल्लाची असेल. तर दुसरी मूर्ती राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान अशी असेल. दरवर्षी रामनवमीच्या दिवशी दुपारी बारा वाजता सूर्याची किरणे श्रीरामाच्या मूर्तीवर पडतील अशा पद्धतीने मंदिराचे बांधकाम करण्यात येत आहे. यासाठी रुरकी आणि पुणे येथील संस्थांमधील शास्त्रज्ञांचे पथक कार्यरत आहे.
‘एक्सपोसॅट’चे यशस्वी प्रक्षेपण; नव्या अध्यायाच्या प्रारंभाने ‘इस्रो’कडून नववर्षांचे स्वागत!
  • भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) सोमवारी आपल्या मोहिमांचा नवा अध्याय सुरू करत नवीन वर्षांचे उत्साहात स्वागत केले. ‘इस्रो’ने पहिल्या ‘एक्स-रे पोलरिमीटर उपग्रहा’चे (एक्सपोसॅट) यशस्वी प्रक्षेपण केले. या उपग्रहाद्वारे कृष्णविवरांचा अभ्यास करून त्यामागचे रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या मोहिमेद्वारे अशा खगोलीय घटकांचा अभ्यास करणारा भारत हा अमेरिकेनंतरचा दुसराच देश ठरणार आहे.
  • चेन्नईपासून सुमारे १३५ किलोमीटरवरील अवकाश केंद्रातून ‘पीएसएलव्ही’चे सकाळी नऊ वाजून दहा मिनिटांनी अवकाश केंद्रातून प्रक्षेपण झाले. प्रक्षेपणासाठीची २५ तासांची उलटगणती संपल्यानंतर, ४४.४ मीटर लांबीचा प्रक्षेपकाने उड्डाण केले. ही घटना पाहण्यासाठी मोठय़ा संख्येने आलेल्या नागरिकांनी यावेळी जल्लोष करत टाळय़ांचा कडकडाट केला. ‘इस्रो’ने एप्रिल २०२३ मध्ये ‘पीओएएम-२’चा वापर करून असाच एक वैज्ञानिक प्रयोग केला होता.
  • या मोहिमेत ‘इस्रो’च्या अतिशय भरवशाचा ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाने (पीएसएलव्ही) -‘सी ५८’ आपल्या साठाव्या मोहिमेत प्रमुख अभ्यास उपग्रह ‘एक्सपोसॅट’सह अन्य अवकाशीय अभ्यासाची उपकरणे (पेलोड) अवकाशात प्रक्षेपित केली. एका उपकरणाची निर्मिती महिलांनी केली आहे.
  • प्रक्षेपकाने प्रमुख उपग्रह ‘एक्सपोसॅट’ ६५० किलोमीटरवरील पृथ्वीच्या निम्न कक्षेत प्रस्थापित केले. नंतर शास्त्रज्ञांनी ‘पीएसएलव्ही ऑर्बिटल एक्सपरिमेंटल मॉडय़ूल’सह (पीओएएम) प्रयोग करण्यासाठी उपग्रहाची कक्षा ३५० किलोमीटपर्यंत घटवली. या बिंदूपासून ‘पीएसएलव्ही’च्या चौथ्या टप्प्याची कक्षा निम्न कक्षेत बदलेल. जिथे ‘पीओएएम’ नावाचा ‘पीएसएलव्ही’चा वरचा टप्पा ‘पेलोड’सह प्रयोग करेल आणि त्यासाठी काही वेळ लागेल. ‘एक्सपोसॅट’ खगोलीय क्ष-किरण स्त्रोताचे रहस्य उलगडण्यात आणि कृष्णविवरांच्या रहस्यमय बाबींचा अभ्यास करण्यात मदत करेल. असा अभ्यास करणारा इस्रोचा हा पहिलाच समर्पित वैज्ञानिक उपग्रह आहे.
६०० पोलिसांची पदोन्नती रखडली,८४ अधिकाऱ्यांची ‘मॅट’मध्ये धाव
  • राज्य पोलीस दलातील ८४ पोलीस अधिकाऱ्यांनी ज्येष्ठता यादीत वर असलेल्या तुकडीपूर्वी पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नती मिळवण्यासाठी ‘मॅट’मध्ये प्रकरण दाखल केले. त्यामुळे राज्यभरातील ६०० पोलीस उपनिरीक्षक ते पोलीस निरीक्षक दर्जाच्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांच्या पदोन्नती प्रक्रियेवर परिणाम झाला.
  • महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) घेतलेल्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेच्या निकालाची तारीखच मानीव दिनांक असल्याचा दावा करीत काही अधिकाऱ्यांनी ‘मॅट’मध्ये धाव घेतली होती. ‘मॅट’ने त्यांच्या मागणीला ग्राह्य धरून सकारात्मक निर्णय दिला. त्यामुळे राज्य पोलीस दलात पदोन्नतीसंदर्भात संभ्रम निर्माण झाला. ८४ सहायक पोलीस निरीक्षकांनी पदोन्नती मिळवण्यासाठी दावा ‘मॅट’मध्ये सादर केल्यामुळे राज्यभरातील पोलीस उपनिरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक आणि पोलीस निरीक्षक दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीला खीळ बसली आहे.
  • सूत्रांच्या माहितीनुसार, राज्य पोलीस दलातील १०४, १०५, १०६, १०७ आणि १०९ व्या तुकडीतील ८४ सहायक पोलीस निरीक्षकांनी न्यायालयात धाव घेतली असून त्यांनी वरिष्ठ असलेल्या तुकडीपूर्वी मानीव देण्याचा दावा केला आहे. यापैकी १०४ व त्यावरील तुकडीतील (डीडी बॅच) ४१ अधिकाऱ्यांनी ‘पीएसआय’ पदावर झालेल्या निवडीच्या आधारावर १०३ तुकडीपूर्वी मानीव दिनांक मागितला आहे. तर उर्वरित ४३ जणांनी १०६ तुकडीपूर्वी मानीव दिनांक देण्याचा दावा केला आहे. दोन्ही तुकडीतील अधिकाऱ्यांची मागणी रास्त असल्याचा निर्णय ‘मॅट’ने दिल्यामुळे पोलीस महासंचालक कार्यालयाला पदोन्नती करण्यास पेच पडला आहे. गेल्या दोन वर्षांपासून ‘पीएसआय’ ते ‘पीआय’ दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या पदोन्नत्या रखडल्या आहेत. पोलीस महासंचालक कार्यालयही प्रकरण न्यायाधीन असल्याचे सांगून पदोन्नतीसंदर्भात कोणताच निर्णय घेत नाही. केवळ ८४ अधिकाऱ्यांमुळे राज्यातील जवळपास ६०० अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीला खीळ बसल्याची चर्चा आहे. या संदर्भात आस्थापना विभाग प्रमुख संजीवकुमार सिंघल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
नवीन करोना उपप्रकाराला रोखण्यासाठी वर्धक मात्रेची गरज आहे का?
  • राज्यामध्ये करोनाच्या रुग्णांमध्ये महिनाभरात लक्षणीय वाढ झाली आहे. डिसेंबरमध्ये राज्यात करोनाचे तब्बल ९०० पेक्षा जास्त रुग्ण आढळले. त्याचबरोबर जेएन.१ या ओमायक्रॉनच्या नव्या उपप्रकाराचे रुग्णही आढळू लागले आहेत. अवघ्या आठवडाभरात राज्यात जेएन.१चे २९ रुग्ण सापडले तर करोनाचे ९०० पेक्षा अधिक रुग्ण सापडले. वाढते करोना रुग्ण आणि जेएन.१ चा वाढता प्रादुर्भाव यामुळे पुन्हा एकदा धास्तीचे वातावरण पसरले आहे. नव्या प्रकाराच्या प्रसाराला लसीकरण आवर घालणार का, वर्धक मात्रा गरजेची आहे का, अशा मुद्द्यांचा आढावा

राज्यातील लसीकरणाची स्थिती काय?

  • देशात १६ जानेवारी २०२१ पासून करोना लसीकरणाला सुरुवात झाली. प्रथम करोनाच्या साथीच्या काळात विविध सेवा-सुविधा पुरवणारे कर्मचारी, वैद्यकीय कर्मचारी यांना लस देण्यात आली. त्यानंतर ज्येष्ठ व सहव्याधी असलेल्या नागरिकांना प्राधान्य देण्यात आले. राज्यात दोन्ही मात्रा व वर्धक मात्रा अशा एकूण १७ काेटी ७९ लाख ८१ हजार ४०५ मात्रा देण्यात आल्या. त्यात १८ वर्षांवरील ८ लाख ४६ हजार ६५ हजार ८२२ नागरिकांनी करोनाची पहिली मात्रा घेतली. १५ ते १८ वयोगटातील ४१ लाख १९ हजार १६४ नागरिकांनी पहिली मात्रा घेतली तर १२ ते १४ वयोगटातील २८ लाख ९१ हजार २९९ जणांनी पहिली मात्रा घेतली आहे. १८ ते ५९ वयोगटातील ५१ लाख ९० हजार ६२४ नागरिकांनी वर्धक मात्रा घेतली. ६० वर्षांवरील आणि करोना योद्धा असलेल्या ४४ लाख ८४ हजार ९८ नागरिकांनी वर्धक मात्रा घेतली आहे. पहिली मात्रा घेतलेल्या नागरिकांच्या तुलनेत दुसरी मात्रा घेतलेल्या नागरिकांचे प्रमाण कमी आहे. वर्धक मात्रा घेतल्यांचे प्रमाण तर फारच कमी आहे. नागरिकांचा लसीकरणाकडील ओढा कमी झाल्याने अनेक मात्रा या वाया गेल्या. वर्ष २०२३ मध्ये करोना लस घेण्याकडे नागरिकांचा कल कमी झाल्याने सरकारनेही लशींचा साठा आवश्यक तेवढाच प्रमाणात ठेवण्यास सुरुवात केली.
  • लशीमध्ये होत असलेल्या संशोधनामुळे काही महिन्यांमध्ये नाकावाटे देण्यात येणारी इन्कोव्हॅक लसही बाजारात आली. ही लस १ नोव्हेंबर २०२३ पासून १८ वर्षांवरील नागरिकांना वर्धक मात्रा म्हणून देण्यास सुरुवात करण्यात आली. मात्र या लशीलाही नागरिकांकडून अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.

 

रोनाल्डो नव्या वर्षांपासून सौदी अरेबियात खेळणार :
  • आधुनिक फुटबॉलमधील तारांकित खेळाडू पोर्तुगालचा ख्रिस्तिआनो रोनाल्डो नव्या वर्षांत सौदी अरेबियातील अल नासर क्लबकडून खेळणार आहे. फुटबॉल विश्वातील त्यातही मध्य आशियातील ही सर्वात मोठी घटना मानली जाते. अल नासर क्लबने आपल्या क्लबची जर्सी घेतलेल्या रोनाल्डोचे छायाचित्र समाज माध्यमावर टाकून या घडामोडीची माहिती जाहीर केली. रोनाल्डोचा हा करार सर्वात मोठा मानला जात असला, तरी कराराची रक्कम अजूनही गुलदस्त्यातच ठेवण्यात आली आहे.

  • या नव्या करारामुळे युरोपातील एक आघाडीचा खेळाडू प्रथमच आशियातून खेळताना दिसणार असून, रोनाल्डोचा हा करार २०२५ पर्यंत असेल. रोनाल्डोशी झालेल्या करारामुळे केवळ आमच्या क्लबलाच यश मिळणार नाही, तर स्थानिक लीग आणि देशातील फुटबॉलपटूंना सर्वोत्तम कामगिरी करण्याची प्रेरणा मिळेल, असे क्लबच्या वतीने सांगण्यात आले आहे.

  • पाच  बॅलन डी’ओर पुरस्काराचा मानकरी ३७ वर्षीय रोनाल्डोचा हा कारकीर्दीमधील अखेरचा करार मानला जात आहे. कराराची नेमकी रक्कम गुलदस्त्यात ठेवण्यात आली असली, तरी प्रसार माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार प्रति वर्षी तब्बल २० कोटी डॉलर (१७ अरब रुपये) इतकी घसघशीत असेल. यामुळे आता रोनाल्डो फुटबॉल विश्वातील सर्वाधिक मानधन घेणारा खेळाडू ठरेल.

  • फुटबॉल विश्वातील एका नव्या देशात खेळण्यासाठी आपण उत्सुक आहोत, असे रोनाल्डोने म्हटले आहे. मला जे काही मिळवायचे होते, ते मी युरोपमध्ये खेळताना मिळविले. त्यामुळे आता वेगळा विचार करण्याची वेळ आली आहे. त्यामुळेच मी आशियात खेळण्याचा निर्णय घेतला असेही रोनाल्डो म्हणाला. कतार विश्वचषक स्पर्धेत रोनाल्डोची कामगिरी निराशाजनक राहिली होती. बाद फेरीत तर त्याला राखीव खेळाडूंत बसविण्यात आले होते.

महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धा आजपासून :
  • महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बहुउद्देशीय महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धाना सोमवारपासून (२ जानेवारी) सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा १२ जानेवारीपर्यंत राज्यातील विविध आठ केंद्रांवर पार पडेल.

  • महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना गेली २३ वर्षे या स्पर्धेसाठी प्रयत्नशील होती. अखेर या स्पर्धेला मुहूर्त सापडला असून, राज्यातील १० हजार ४५६ खेळाडू, प्रशिक्षक, व्यवस्थापक या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. एकूण ३९ क्रीडा प्रकारांचा स्पर्धेत समावेश असून, राज्यातील खेळाडूंना अधिकाधिक स्पर्धा खेळण्याचा अनुभव मिळावा यासाठी हे व्यासपीठ उभे करण्यात आल्याचे पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या वेळी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे सरचिटणीस नामदेव शिरगावकर, राज्याचे क्रीडा आयुक्त सुहास दिवसे उपस्थित होते.

  • स्पर्धेत राज्यातील सर्वोत्तम आठ संघ सांघिक, तर सर्वोत्तम आठ खेळाडू वैयक्तिक प्रकारात सहभागी होतील. स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ५ जानेवारीला म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात होणार आहे. या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्य क्रीडामंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार उपस्थित राहणार आहेत. या वेळी विविध आठ केंद्रांवरून आलेल्या क्रीडा ज्योत एकत्र करून मुख्य मैदानावरील ज्योत प्रज्वलित करण्यात येईल.

  • या स्पर्धेसाठी महाराष्ट्र शासन मुख्य प्रायोजक असून एकूण १९ कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे. त्याचबरोबर आयोजनात कमतरता राहू नये यासाठी आवश्यकतेनुसार निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही सरकारने दिली आहे.

नोटबंदीचा निर्णय योग्य की अयोग्य? सर्वोच्च न्यायालय आज देणार निकाल; जाणून घ्या १० महत्वाचे मुद्दे :
  • केंद्र सरकारने २०१६ साली केलेल्या नोटबंदीच्या निर्णयावरील आव्हान याचिकेवर सर्वोच्च न्यायालय आज निर्णय देण्याची शक्यता आहे. २०१६ सालातील नोव्हेंबर महिन्यात केंद्र सरकारने १००० व ५०० रुपयांच्या नोटांवर बंदी घातली होती. या निर्णयानंतर रातोरात १० लाख कोटी रुपये चलनातून बाद करण्यात आले होते.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी जनतेला संबोधित करत नोटबंदीचा निर्णय जाहीर केला होता. या निर्णयाद्वारे एका झटक्यात ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा व्यवहारातून बाद करण्यात आल्या होत्या.

  • या निर्णयानंतर देशभरात नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता. नोटा बदलण्यासाठी नागरिकांना आपली कामे सोडून रांगेत उभे राहावे लागले होते. रांगेत उभे राहिल्यानंतर काही लोकांचा मृत्यू झाल्याचेही वृत्त तेव्हा समोर आले होते.

  • याच कारणामुळे मोदी सरकारच्या या निर्णयाला विरोधकांनी कडाडून विरोध केला होता. मोदी सरकारच्या याच निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय आज निर्णय देणार आहे. त्यामुळे न्यायालय काय निर्णय देणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

जीएसटी संकलनात डिसेंबरमध्ये १५ टक्के वाढ; १.४९ लाख कोटी जमा :
  • वस्तू आणि सेवा करापोटी (जीएसटी) डिसेंबर २०२२ मधील महसूल संकलन १५ टक्क्यांनी वाढून १.४९ लाख कोटींवर पोहोचले. सुधारित उत्पादनाचे सुधारित प्रमाण आणि विनियोग मागणीतील वाढीचे हे निदर्शक आहे. तसेच हे या करविषयक नियमांचे चांगल्या अनुपालनाचेही निदर्शक आहे.

  • या करसंकलनापोटी महसूल १.४० लाख कोटींवर राहण्याचा डिसेंबर हा सलग दहावा महिना आहे. नोव्हेंबरमधील कर संकलन सुमारे १.४६ लाख कोटी होते.

  • अर्थ मंत्रालयाने या संदर्भात दिलेल्या निवेदनात नमूद केले, की डिसेंबर २०२२ मध्ये ‘जीएसटी’चा एकूण महसूल १,४९,५०७ कोटी संकलित झाला. यात केंद्रीय ‘जीएसटी’ (सीजीएसटी) २६ हजार ७११ कोटी, राज्याचा ‘जीएसटी’ (एसजीएसटी) ३३ हजार ३५७ कोटी, एकात्मिक वस्तू आणि सेवा कर (आजीएसटी) ७८ हजार ४३४ कोटी (आयातीवर संकलित ४० हजार २६३ कोटींसह) आणि उपकरापोटी ११ हजार ५ कोटी (आयातीवर संकलित ८५० कोटींसह) एवढा महसूल संकलित झाला.

  • डिसेंबर २०२२ चा महसूल मागील वर्षी याच महिन्यात झालेल्या ‘जीएसटी’ संकलनापेक्षा १५ टक्के जास्त आहे, मागील वर्षी हा महसूल १.३० लाख कोटींच्या आसपास होता. या महिन्यात आयातीतून मिळणारा महसूल आठ टक्क्यांनी अधिक होता आणि देशांतर्गत व्यवहारापोटीचा महसूल (सेवांच्या आयातीसह) हा गेल्या वर्षीच्या याच महिन्यात या स्रोतांमधून मिळालेल्या महसुलापेक्षा १८ टक्क्यांनी अधिक आहे. नोव्हेंबर २०२२ मध्ये ७.९ कोटी ‘ई वे बिले’ झाली. ऑक्टोबर २०२२ मध्ये जारी केलेल्या ७.६ कोटी ‘ई-वे बिलां’च्या तुलनेत लक्षणीय होती.

  • एप्रिलमध्ये ‘जीएसटी’पोटी सुमारे १.६८ लाख कोटींचे विक्रमी महसूल संकलन झाले होते. मेमध्ये सुमारे १.४१ लाख कोटी, जून (१.४५ लाख कोटी), जुलै (१.४९ लाख कोटी), ऑगस्ट (१.४४ लाख कोटी), सप्टेंबर (१.४८ लाख कोटी), ऑक्टोबर (१.५२ लाख कोटी) ), नोव्हेंबर (१.४६ लाख कोटी) आणि डिसेंबर (१.४९ लाख कोटी) एवढे संकलन झाले आहे.

पॅलेस्टाईन-इस्रायल प्रश्नावरील ठरावावर भारत तटस्थ :
  • इस्रायलने पॅलेस्टाईनच्या भूभागाचा दीर्घकाळपर्यंत ठेवलेला ताबा आणि विलिनीकरणाच्या कायदेशीर परिणामांवर आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मत मागण्याच्या संयुक्त राष्ट्र आमसभेतील ठरावावर भारत तटस्थ राहिला. अमेरिका आणि इस्रायलने ठरावाच्या विरोधात मतदान केले. भारतासह ब्राझील, जपान, म्यानमार, फ्रान्स आदी देश तटस्थ राहिले.

  • ‘पूर्व जेरुसलेमसह इस्रायलव्याप्त पॅलेस्टिनी प्रदेशातील पॅलेस्टिनी नागरिकांच्या मानवी हक्कांवर परिणाम करणाऱ्या इस्रायली आचरणाची पद्धत’ या ठरावाचा मसुदा शुक्रवारी ८७ विरुद्ध २६ मतांनी मंजूर झाला. भारतासह ५३ देश तटस्थ राहिले. या ठरावाद्वारे आंतरराष्ट्रीय न्यायालयास विनंतीचा निर्णय घेण्यात आला. १९६७ पासून पॅलेस्टाईनच्या भूप्रदेशावर इस्रायलचा ताबा, आक्रमणामुळे पॅलेस्टिनी नागरिकांच्या स्वयंनिर्णयाच्या अधिकारांच्या उल्लंघनाचे कायदेशीर परिणाम काय होतील, याबाबत सल्ला देण्याची विनंती या न्यायालयाला करण्यात येणार आहे.

  • तसेच जेरुसलेम या पवित्र शहराची लोकसंख्यानिहाय रचना, वैशिष्टय़े व स्थिती बदल, येथे लागू केलेले पक्षपाती कायदे याबाबत कायदेशीर उपाययोजना सुचवण्याचीही विनंती करण्यात येणार आहे. त्याच बरोबर इस्रायलची धोरणे व कार्यपद्धतीमुळे येथील कायदेशीर ताब्याच्या वैधतेवर कोणते परिणाम होत आहेत, तसेच इतर देश व संयुक्त राष्ट्रांना यामुळे कोणत्या कायदेशीर परिणामांना तोंड द्यावे लागेल, याबाबतही न्यायालयाने सल्ला देण्याची विनंती या ठरावाद्वारे केली गेली आहे.

02 जानेवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

 

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.