चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०२ जानेवारी २०२१

Date : 2 January, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वाधिक ‘स्वीकारार्ह’ नेते, ‘मॉर्निंग कन्सल्ट’च्या सर्वेक्षणाचा दावा :
  • २०२१ चा पहिला दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या हितचिंतकांसाठी चांगला ठरला. कारण, जागतिक नेत्यांच्या कार्यकाळातील स्वीकृतीवर नजर ठेवणाऱ्या डाटा फर्म ‘मॉर्निंग कन्सल्ट’च्या सर्वेक्षणामध्ये, नरेंद्र मोदी जगातील सर्वात ‘स्वीकारार्ह’ नेते ठरल्याचा दावा करण्यात आला आहे. नरेंद्र मोदींचे ‘अप्रूव्हल रेटिंग’ सर्वाधिक राहिले आहे. ५५ टक्के स्वीकृती रेटिंगसह नरेंद्र मोदी जागतिक नेत्यांमध्ये अव्वल ठरलेत.

  • मॉर्निंग कन्सल्टच्या सर्वेक्षणानुसार, ७५ टक्के लोकांनी मोदींना पाठिंबा दिला आहे. तर २० टक्के लोकांनी मोदींना विरोध केला. त्यामुळे त्यांची एकूण स्वीकृती रेटिंग ५५ टक्के राहिली. जगातील इतर देशांच्या नेत्यांच्या तुलनेत मोदींची रेटिंग सर्वाधिक ठरली. संकेतस्थळानुसार, या सर्वेक्षणासाठी भारतात नमुन्यांचा आकडा २ हजार १२६ होता. तर, यामध्ये त्रुटीची शक्यता २.२ टक्के आहे.

  • या सर्वेक्षणात ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांची स्वीकृत रेटिंग नकारात्मक राहिली. म्हणजेच बोरिस जॉन्सन यांना पाठिंबा देणाऱ्यांपेक्षा त्यांचा विरोध करणाऱ्यांची संख्या अधिक होती. याशिवाय जर्मनीच्या लोकप्रिय चान्सलर एंजेला मार्केल यांची स्वीकृती रेटिंग २४ राहिली.

देशभरात आज ‘ड्राय रन’; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा समावेश :
  • भारतात करोना वॅक्सीनची तयारी पूर्ण झाली आहे. आता प्रत्यक्ष लसीकरण सुरू होण्याच्या तारखेची घोषणा होण्या अगोदर, सर्व आवश्यक तयारी झाले आहे का नाही? याची पडताळणी करण्यासाठी केंद्र सरकारकडून आजपासून (२ जानेवारी) देशातील प्रत्येक राज्यात करोना वॅक्सीनच्या पार्श्वभूमीवर ‘ड्राय रन’ (सराव फेरी) घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानुसार आज संपूर्ण देशभरात हा ‘ड्राय रन’ होत आहे.

  • महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांची या ‘ड्राय रन’साठी निवड केली गेली आहे. ज्यामध्ये पुणे, नागपूर, नंदुरबार व जालना या जिल्ह्यांचा समावेश आहे.

  • केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने सांगितल्यानुसार, सर्व राज्य, केंद्रशासित प्रदेशांच्या एकूण ११६ जिल्ह्यांमध्ये २५९ जागांवर आज COVID-19 वॅक्सीनसाठी ‘ड्राय रन’ घेण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी माहिती देताना सांगितले की, ‘ड्राय रन’साठी संपूर्ण तयारी झालेली आहे. यासाठी विविध पथकांची निर्मिती केली गेली आहे.

भारतीय खलाशांना तातडीने मदत करा - चीनकडे मागणी :
  • चीनच्या सागरी हद्दीत दोन जहाजे अडकून पडली असून त्यातील ३९ भारतीय खलाशांना तातडीने मदत देण्याची मागणी भारताने केली आहे.

  • या जहाजातील खलाशांची स्थिती बिकट असल्याचे सांगून परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी सांगितले, की भारताचे एमव्ही जगआनंद हे मालवाहू जहाज चीनच्या हेबेई प्रांतात जिंगटांग बंदरावर नांगर टाकून उभे आहे.

  • १३ जूनपासून हे जहाज तेथे अडकून पडले असून त्यात २३ भारतीय खलाशी आहेत तर एमव्ही अनास्ताशिया हे जहाद चीनमध्ये वीस सप्टेंबरपासून कॅफोडियन बंदरावर अडकून पडले आहे. दोन्ही जहाजे सुटकेच्या प्रतीक्षेत असून खलाशांवर प्रचंड मानसिक ताण आहे. त्यामुळे या जहाजावरील कर्मचाऱ्यांची आम्हाला चिंता वाटते, त्यामुळे या दोन्ही जहाजांची सुटका करावी, असे भारताने स्पष्ट केले.

  • भारत याबाबत बीजिंग, हेबेई व तियानजिन येथील अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून पाठपुरावा करीत आहे. तातडीने तोडग्यासाठी चिनी दूतावासाशीही संपर्क साधण्यात आला आहे. चीनच्या अधिकाऱ्यांनी मदत करण्याची तयारी ही दर्शवली आहे पण ती तातडीने व कालबद्ध असायला हवी, असे भारताने म्हटले आहे.

भारत-ब्रिटन विमानसेवा सुरु होणार ८ जानेवारीपासून :
  • भारत आणि ब्रिटनमधील विमानांच्या उड्डाणांची तात्पुरती स्थगिती उठवण्यात आली आहे. ८ जानेवारीपासून भारत आणि ब्रिटन दरम्यानच्या विमान उड्डाणांना संमती देण्यातली आहे. विमान वाहतूक मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. करोना विषाणूचा नवा प्रकार ब्रिटनमध्ये आढळल्याने २३ डिसेंबर ते ७ जानेवारी या कालावधीत भारत ते ब्रिटन दरम्यानच्या विमान उड्डाणांना स्थगिती देण्यात आली होती. दरम्यान ८ ते २३ जानेवारी दरम्यान मुंबई, बंगळुरु आणि हैदराबादसाठी आठवड्याला फक्त १५ उड्डाणांना संमती देण्यात आल्याचंही पुरी यांनी सांगितलं.

  • एकीकडे देशात करोनाचा आलेख खालावत असतानाच दुसरीकडे ब्रिटनमध्ये आढळलेल्या करोना व्हायरसच्या नव्या प्रकारामुळे चिंता वाढली आहे. ब्रिटनमध्ये झपाट्याने पसरत असलेल्या करोनाच्या नव्या स्ट्रेनचे रुग्ण देशात आढळत आहेत. यावर खबरदारीचा उपाय म्हणून २३ जानेवारीपासून ब्रिटन आणि भारत यांच्यातील विमानसेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली होती. आधी ही मुदत ३१ डिसेंबरपर्यंत होती मात्र त्यानंतर ती वाढवून ७ जानेवारीपर्यंत करण्यात आली. आता ८ जानेवारीपासून भारत-ब्रिटनमधील विमान सेवा पुन्हा सुरु होणार आहे.

  • दरम्यान देशातील नव्या करोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांमध्ये २० हजारांच्या आसपास राहिली आहे. गेल्या २४ तासांमध्ये २० हजार ३५ इतकी रुग्णसंख्या नोंदवली गेली आहे. तर मागील २४ तासांमध्ये २३ हजार १८१ रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या ३५ दिवसांमध्ये बरे झालेल्या रुग्णांची संख्या नवीन रुग्णसंख्येपेक्षा जास्त राहिली आहे त्यामुळे सक्रिय रुग्णसंख्येत घट दिसून येते आहे.

सीरमच्या लसीला तातडीच्या वापरासाठी परवानगी, केंद्र सरकारचा मोठा निर्णय :
  • सीरम इन्स्टिट्युटच्या कोविशिल्ड या लसीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्याची बातमी समोर येते आहे. पीटीआयने यासंदर्भातले वृत्त सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. करोना लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानागी देण्याबाबत दिल्लीत तज्ज्ञांच्या समितीची महत्त्वाची बैठक पार पडली.

  • बैठकील कोविशिल्ड लसीला तातडीच्या वापरासाठी परवानागी देण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या लसीला मान्यता देण्यात आल्याने लसीकरणाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात ३० कोटी लोकांना लस दिली जाण्याची शक्यता आहे.

  • फायझर, भारत बायोटेक आणि सीरम इन्स्टिट्युट या तिन्ही संस्थांनी एकापाठोपाठ लस, त्याचे होणारे परिणाम यासंदर्भातलं एक प्रेझेंटेशन दिलं होतं. आता सीरमच्या कोविशिल्ड ला आपात्कालीन वापरासाठी संमती देण्यात आली आहे. २ जानेवारीला देशातल्या प्रत्येक राज्यात ड्राय रन होणार आहे. करोना लसीची तयारी करण्याबाबत केंद्रीय मंत्री आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली.

  • याआधी पंजाब, आसाम, गुजरात आंध्र प्रदेशात ड्राय रन राबवला गेला होता. आता कोविशिल्ड लसीला परवानगी देण्यात आपात्कालीन वापरासाठी संमती देण्यात आली आहे. कोविशिल्ड लसीला आपात्कालीन वापरासाठी मान्यता देण्याबाबत समितीच्या याआधीही दोन बैठका झाल्या आहेत. त्या बैठकांमध्ये लस उत्पादक कंपन्यांकडून काही माहिती मागवण्यात आली होती.

०२ जानेवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.