चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०२ डिसेंबर २०२१

Updated On : Dec 02, 2021 | Category : Current Affairs


जगातील सर्वात महागडं शहर कोणतं? पॅरिस किंवा लंडन नाही, तर :
 • आधुनिकता, श्रीमंती किंवा उच्च राहणीमान या सगळ्या गोष्टींवरून जगातलं सर्वात महागडं शहर कोणतं म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर लंडन, पॅरिस, न्यूयॉर्क किंवा वॉशिंग्टन वगैरे येऊ शकतं. पण आपल्या या सगळ्या अंदाजांना बाजूला सारत अनपेक्षितपणे एक वेगळंच शहर जगातलं सर्वात महाग शहर ठरलं आहे.

 • वर्ल्डवाईड कॉस्ट लिव्हिंग इंडेक्स हा अहवाल इकोनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटनं तयार केला असून त्यामध्ये यासंदर्भात करण्यात आलेल्या सर्वेक्षणाची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. या आकडेवारीमुळे सर्वात महाग ठरलेल्या शहरासमोर जगातील महासत्तांमधली शहरं देखील फिकी पडली आहेत!

 • इस्त्रायलमधलं तेल अविव हे शहर जगातलं सर्वात महागडं शहर ठरलं आहे. या अहवालातील निष्कर्षांनुसार, तेल अविवपाठोपाठ पॅरिस आणि सिंगापूर ही दोन शहरं संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहेत. तर त्यामागे तिसऱ्या स्थानी झुरिच आणि चौथ्या स्थानी हँगकाँग आहे.

 • हमखास महागडं वाटणारं न्यूयॉर्क या यादीमध्ये सहाव्या स्थानी तर जिविव्हा सातव्या स्थानी आहे. जिनिव्हापाठोपाठ आठव्या स्थानी कोपनहेगन, नवव्या स्थानी लॉस एंजेलिस आणि दहाव्या स्थानी जपानमधील ओसाका हे शहर आहे.

आता जगातला पहिला जिवंत रोबोट पुनरुत्पादन करणार; शास्त्रज्ञांचा दावा :
 • तंत्रज्ञानाच्या युगात रोज नवनवे शोध समोर येत आहेत. अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनी जगातील पहिला जिवंत रोबोट बनवण्यात यश मिळवलं होतं.अफ्रिकेतील बेडकाच्या स्टेमसेलपासून हा रोबोट तयार करण्यात आला होता. हा रोबोट पहिल्यांदा २०२० मध्ये तयार करण्यात आला होता.

 • वर्मोट युनिव्हर्सिटी, टफ्ट्स युनिव्हर्सिटी आणि हॉवर्ड युनिव्हर्सिटीच्या वायस इन्स्टिट्यूट फॉर बायोलॉजिकलली इन्स्पायर्ड इंजिनिअरिंगमधील शास्त्रज्ञांनी तयार केला आहे. या रोबोटला जेनोबोट्स असं नाव देण्यात आलं आहे.

 • विशेष म्हणजे हा रोबोट प्रजनन करू शकतो, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. मात्र प्रजनन प्रक्रिया प्राणी आणि वनस्पतींपेक्षा वेगळी आहे. विशेष म्हणजे, शास्त्रज्ञांनी जैविक पुनरुत्पादनाचा एक वेगळा प्रकार शोधला आहे, जो प्राणी किंवा वनस्पतीपेक्षा वेगळा आहे. अनेक एकल पेशी एकत्र करून हा रोबोट स्वतःचे शरीर तयार करू शकतो.

 • नवीन शोध वैद्यकीय क्षेत्रात उपयुक्त ठरू शकेल, असे शास्त्रज्ञांचे मत आहे. हा रोबोट त्यांच्या तोंडात एकल पेशी गोळा करतात आणि त्यांच्यासारखे दिसणारे बाळ तयार करू शकतात.शास्त्रज्ञ जोशुआ बोन्गार्ड यांनी सांगितले की, झेनोबॉट्स चालू शकतात, झेनोबॉट्स पोहू शकतात हे आम्ही आधीच पाहिले आहे, आता ते त्यांची संख्या देखील वाढवू शकतात.

आंतरराष्ट्रीय विमानसेवा १५ डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय स्थगित :
 • नियोजित आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे यापूर्वी ठरल्यानुसार १५ डिसेंबरपासून पुन्हा सुरू न करण्याचा निर्णय सरकारने बुधवारी घेतला. ही उड्डाणे सुरू करण्याचे यापूर्वी जाहीर केल्यानंतर, करोनाच्या ‘ओमायक्रॉन’ या उत्परिवर्तित विषाणूबाबत वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय फिरवण्यात आला आहे.

 • आंतरराष्ट्रीय व्यावसायिक प्रवासी सेवा पुन्हा सुरू करण्याची नवी तारीख यानंतर अधिसूचित केली जाईल, असे नागरी विमान वाहतूक संचालनालयाने (डीजीसीए) सांगितले.

 • करोना महासाथीमुळे नियोजित आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक २३ मार्च २०२० पासून बंद करण्यात आली आहे.

वाराणसीतील काशी विश्वनाथ धामचे १३ डिसेंबरला लोकार्पण :
 • देश-विदेशातील कोटय़वधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वाराणसी येथील काशी-विश्वनाथ धामचे १३ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे.

 • पुरातन काशी-विश्वनाथ मंदिर परिसरात पाच लाख चौ. फूट जागेवर हा विस्तारीकरण प्रकल्प साकारण्यात आला असून एका वेळी ७५ हजार भाविक परिसरात सामावले जाऊ शकतील. घाटावरून गंगा नदीचे पवित्र जल घेऊन काशी विश्वेश्वरास अभिषेक करण्याची सुविधा आता भाविकांना उपलब्ध  होणार आहे.

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापुढे या प्रकल्पाचे सादरीकरण झाले होते आणि भाविकांच्या सोयीसुविधांसाठी त्यांनी केलेल्या सूचनांनुसार प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ८ मार्च २०१९ रोजी प्रकल्पाचा शिलान्यास करण्यात आला होता. या प्रकल्पासाठी ८०० कोटी रुपये खर्च आला आहे.

कनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धा - भारताची उपांत्य फेरीत धडक ; शरदानंद तिवारीच्या गोलमुळे बेल्जियमवर सरशी :
 • शरदानंद तिवारीने केलेल्या गोलच्या जोरावर भारताने बलाढय़ बेल्जियमवर १-० अशी सरशी साधत कनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक दिली. या फेरीत गतविजेत्या भारतापुढे जर्मनीचे आव्हान असेल.

 • लखनऊ येथे २०१६ साली झालेल्या मागील कनिष्ठ विश्वचषकात भारताने बेल्जियमलाच धूळ चारत दुसऱ्यांदा जगज्जेते होण्याचा मान मिळवला होता.

 • या पराभवाची परतफेड करण्यासाठी बेल्जियमचा युवा संघ उत्सुक होता. परंतु भारताने शरदानंदचा गोल, भक्कम बचाव आणि राखीव गोलरक्षक पवनच्या उत्कृष्ट खेळामुळे पुन्हा बेल्जियमवर वर्चस्व गाजवले.

जागतिक मालिकेचा अंतिम टप्पा सिंधू, श्रीकांतचा विजयी प्रारंभ ; सात्त्विक-चिराग, पोनप्पा-सिक्की रेड्डी यांचा पराभव :
 • आघाडीचे भारतीय बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आणि किदाम्बी श्रीकांत यांनी जागतिक मालिकेच्या अंतिम टप्प्याचा (वर्ल्ड टूर फायनल्स) विजयी प्रारंभ केला. सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी, अश्विनी पोनप्पा आणि एन. सिक्की रेड्डी या जोडय़ांना मात्र पराभव पत्करावा लागला.

 • दोन ऑलिम्पिक पदकविजेत्या सिंधूने अ-गटातील पहिल्या लढतीत डेन्मार्कच्या लिन ख्रिस्टोफर्सनला २१-१४, २१-१६ असे सरळ गेममध्ये पराभूत केले.

 • पहिल्या गेममध्ये ६-८ असे पिछाडीवर पडल्यानंतर सिंधूने सलग १० गुण मिळवत वर्चस्व प्रस्थापित केले. मग तिने पहिला गेम २१-१४ असा जिंकला. दुसऱ्या गेममध्ये मध्यंतराला सिंधूकडे ११-१० अशी केवळ एका गुणाची आघाडी होती. त्यानंतर तिने आक्रमक खेळ करत हा गेम पाच गुणांच्या फरकाने जिंकला. सिंधूपुढे गुरुवारी यव्होने लिचे आव्हान असेल.

०२ डिसेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

टिप्पणी करा (Comment Below)