चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०२ डिसेंबर २०२०

Date : 2 December, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
“अंबानींना टेलीकॉम, अदानींना एअरपोर्ट्स अन् शेतकऱ्यांवर लाठीचार्ज; मोदी है तो मुमकीन है” :
  • पाच सदस्यांची समिती नेमून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्याचा सरकारचा प्रस्ताव ३५ शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी फेटाळला. त्यामुळे केंद्र सरकारने मंगळवारी विज्ञान भवनात बोलावलेल्या बैठकीची तिसरी फेरीही निष्फळ ठरली. कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम असून, त्यांचे आंदोलनही सलग सातव्या दिवशी कायम आहे. या आंदोलनाच्या मुद्द्यावरुन आता शेतकऱ्यांना ऑनलाइन माध्यमातूनही पाठिंबा मिळताना दिसत आहे.

  • विरोधी पक्षांपासून ते अनेक नामवंत व्यक्तींनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनीही ट्विटवरुन या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारवर टीका केली आहे. एकीकडे बड्या उद्योजकांना फायदा पोहचवला जात असताना दुसरीकडे शेतकऱ्यावर लाठीचार्ज केला जात आहे अशी टीका भूषण यांनी ट्विटवरुन केली आहे.

  • प्रशांत भूषण यांनी ट्विटवरुन एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला त्यांनी, ‘मोदी है तो मुमकीन है’ अशी कॅप्शन दिली आहे. या फोटोमध्ये मोदी अंबानी, अदानींसारख्या मोठ्या उद्योजकांसोबत दिसत आहे. अंबानींसमोरच्या फोटोवर टेलिकॉम, रिटेल, संरक्षण आणि शेतीसंबंधितील उद्योग अंबानींना देण्यात आल्याचे म्हटले आहे. तर विमानतळं, रेल्वे, सौरऊर्जा आणि शेतीसंदर्भातील उद्योग अदानींकडे असल्याचं म्हटलं आहे.

  • एकीकडे उद्योजकांकडे प्रमुख उद्योग असतानाच दुसरीकडे शेतकऱ्यांच्या नशिबी वॉटर कॅनन, लाठीचार्ज आणि तुरुंगवास आहे, असं फोटोच्या शेवटच्या भागात नमूद करण्यात आलं आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती दाखवताना डोळ्यावर जखम झालेल्या वयोवृद्ध शीख शेतकऱ्याचा फोटो वापरण्यात आला आहे.

चीनचे यान यशस्वीरित्या चंद्रावर :
  • बीजिंग : चीनचे यंत्रमानव म्हणजे रोबोटयुक्त चांद्रयान चंद्राच्या पृष्ठभागावर अपेक्षित ठिकाणी मंगळवारी उतरले .  चँग इ-५ हे यान यशस्वीरित्या चंद्रावर उतरल्याचे चीनच्या अधिकृत वृत्तसंस्थेने म्हटले आहे. चीनच्या अवकाश कार्यक्रमातील हे मोठे यश असून त्यातून मानवाला यापुढील काळात चंद्रावर उतरवण्यात चीनला यश येऊ शकते.

  • चंद्रावरील खडकांचे नमुने गोळा करुन ते पृथ्वीवर आणण्यासाठी चीनचे मानवरहित यान गेल्या  मंगळवारी चंद्राकडे रवाना झाले होते.  हे यान लाँग मार्च ५ या प्रक्षेपकाच्या मदतीने सोडण्यात आले होते. चँग इ ५ ही अतिशय गुंतागुंतीची चांद्र मोहीम असून त्यात अवकाश इतिहासावर भर देण्यात आला आहे. गेल्या चाळीस वर्षांच्या काळात जगात प्रथमच चंद्रावरील खडकांचे नमुने गोळा करून ते पृथ्वीवर आणण्याची मोहीम राबवली जात आहे.

  • अमेरिकेने चंद्रावरील खडकांचे नमुने गोळा करण्यासाठी अवकाशवीर पाठवले होते. रशियाने खडकांचे नमुने आणण्यासाठी मानवरहित मोहिमा राबवल्या होत्या. ही अवकाशयाने चंद्रावर जाऊन परत आली होती. चीनची मोहीम गुंतागुंतीची आहे कारण त्यात हे यान चंद्राच्या कक्षेत प्रस्थापित केल्यानंतर  त्याचे लँडर व अ‍ॅसेंडर हे भाग चंद्रावर उतरले असून तेथील खडकांचे जास्तीत जास्त नमुने गोळा करणार आहे.

तुम्हाला शेतकरी आंदोलनाविषयी बोलण्याचा अधिकार नाही; भारताने कॅनडाच्या पंतप्रधानांना सुनावले :
  • कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन त्रुडो यांनी शेतकरी आंदोलनाचा उल्लेख करत भारतामधील परिस्थिती काळजी करण्यासारखी असल्याचे म्हटलं आहे. मात्र आता भारताने यावर आक्षेप घेतला असून या वक्तव्याचा निषेध केला आहे. कॅनडामधील लोकप्रतिनिधींना या संदर्भात पुरेशी माहिती नसल्याचं म्हटलं आहे. तसेच यासंदर्भात भाष्य करण्याचा अधिकार कॅनडामधील नेत्यांना नाही असंही भारताने म्हटल्याचे वृत्त पीटीआयने दिलं आहे.

  • मंगळवारी सलग सहाव्या दिवशी शेतकऱ्यांचे आंदोलन चिघळल्याचे चित्र दिसत आहे. प्रामुख्याने पंजाब आणि हरयाणामधील शेतकऱ्यांचा या कृषी कायद्यांना विरोध आहे. याच पार्श्वभूमीवर आता थेट परदेशातून या शेतकरी आंदोलनाचा पाठिंबा मिळताना दिसत आहे.

  • भारताचे मित्र राष्ट्र असणाऱ्या कॅनडाच्या पंतप्रधानांनी शेतकरी आंदोलनाचा उल्लेख करत कोणत्याही शांततापूर्ण आंदोलनाचा आमचा पाठिंबा असून भारतामधील परिस्थिती चिंताजनक वाटत असल्याचे म्हटले आहे.

यूजीसी नेट परीक्षेत ४७ हजार १५७ उमेदवार पात्र :
  • पुणे : राष्ट्रीय परीक्षा मंडळाने (एनटीए) घेतलेल्या राष्ट्रीय पात्रता परीक्षेचा (नेट) निकाल जाहीर झाला आहे. त्यात सहायक प्राध्यापक पदासाठी ४० हजार ९८६ आणि कनिष्ठ संशोधक पाठय़वृत्ती, सहायक प्राध्यापक पदासाठी ६ हजार १७१ असे एकू ण ४७ हजार १५७ उमेदवार पात्र ठरले आहेत.

  • करोना संसर्गामुळे जूनमध्ये होणारी परीक्षा यंदा २४ सप्टेंबर ते १३ नोव्हेंबरदरम्यान बारा दिवसांमध्ये देशभरातील २२५ शहरांतील १ हजार  ११९ केंद्रांवर घेण्यात आली.

  • परीक्षेसाठी एकू ण ८ लाख ६० हजार ९७६ उमेदवारांनी नोंदणी के ली होती. त्यापैकी ५ लाख २६ हजार ७०७ उमेदवारांनी परीक्षा दिली. त्यात सहायक प्राध्यापक पदासाठी नोंदणी केलेल्या २ लाख ५९ हजार ७३४ उमेदवारांपैकी १ लाख ४० हजार ४७९ उमेदवारांनी, तर कनिष्ठ संशोधक पाठय़वृत्ती, सहायक प्राध्यापक पदासाठी नोंदणी के लेल्या ६ लाख १ हजार २४२ उमेदवारांपैकी ३ लाख ८६ हजार २२८ उमेदवारांनी परीक्षा दिली.

  • कनिष्ठ संशोधक पाठय़वृत्ती, सहायक प्राध्यापक पदासाठी अर्ज के लेल्या आणि सहायक प्राध्यापक पदासाठी पात्र ठरलेल्या ३६ हजार १३८ उमेदवारांपैकी ४ हजार २९ उमेदवारांची एनएफएससी पाठय़वृत्तीसाठी, ४३१ उमेदवारांची एनएफओबीसी पाठय़वृत्तीसाठी आणि ४७५ उमेदवारांची एमएएनएफ पाठय़वृत्तीसाठी निवड झाली असल्याचे एनटीएने प्रसिद्धिपत्रकाद्वारे नमूद के ले आहे.

यॉर्कर किंग नटराजनचं भारतीय संघाकडून पदार्पण :
  • तिसऱ्या एकदिवस सामन्यात तामिळनाडूचा वेगवान गोलंदाज टी नजराजन यानं भारतीय संघात पदार्पण केलं आहे. कर्णधार विराट कोहलीनं सामना सुरु होण्यापूर्वी पदार्पणाची कॅप देत नटराजनचं भारतीय संघात स्वागत केलं आहे. याचा व्हिडिओ बीसीसीआयने ट्विटरवर शेअर केला आहे. टी नटराजन भारताकडून एकदिवसीय सामन्यात पदार्पण करणारा २३२ वा खेळाडू ठरला आहे.

  • भारतीय एकदिवसीय संघात पदार्पण करताना नटराजन तामिळनाडूचा पाचवा गोलंदाज आहे. याआधी १९८२ मध्ये टी.ए. शेखर यांनी १९८२ मध्ये भारतीय एकदिवसीय संघात पदार्पण केलं होतं. भारतीय संघात स्थान मिळालेला शेखर तामिळनाडूचा पहिला गोलंदाज होता. त्यानंतर बी. अरुण (१९८६), टी कुमारन (१९९९), बालाजी (२००२) आणि नटराजन (२०२०) यांनी भारतीय संघात पदार्पण केले आहे.

  • दुबईत पार पडलेल्या आयपीएलच्या १३ व्या हंगामात नटराजन यानं आपल्या गोलंदाजीनं सर्वांना प्रभावित केलं होतं. हैदराबाद संघाकडून खेळताना नटराजन यानं आपल्या कामगिरीच्या जोरावर भारतीय संघात स्थान मिळवलं आहे. आयपीएलच्या १६ सामन्यात नटराजन यानं १६ बळी घेतलं आहेत. या हंगामात सर्वाधिक यॉर्कर नटराजनच्या नावावर आहेत. नटराजन यानं आयपीएलच्या १३ व्या हंगामात जवळापास ७० यॉर्कर टाकले होते.

०२ डिसेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.