चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०२ ऑगस्ट २०२०

Date : 2 August, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
देशभरात २४ तासांत ५४ हजार ७३६ नवे करोनाबाधित, ८५३ रुग्णांचा मृत्यू :
  • जगभरात थैमान घालत असलेल्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव देशभरात दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील करोनाबाधितांची संख्येने आता १७ लाखांटा टप्पा ओलांडला आहे. मागील चोवीस तासांत देशभरात तब्बल ५४ हजार ७३६ नवे करोना पॉझिटिव्ह आढळले व ८५३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता १७ लाख ५० हजार ७२४ वर पोहचली आहे.

  • देशातील १७ लाख ५० हजार ७२४ करोनाबाधितांमध्ये सध्या ५ लाख ६७ हजार ७३० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, ११ लाख ४५ हजार ६३० जणांनी करोनावर मात केली आहे. आतापर्यंत ३७ हजार ३६४ जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.

  • चिंताजनक बाब म्हणजे, फक्त जुलै महिन्यात भारतामध्ये ११.१ लाख करोनाबाधित रुग्ण आढळले असून १९ हजार १२२ जणांना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. देशात करोनामुळे मरण पावणाऱ्यांच्या एकूण संख्येपैकी ४९ टक्के मृत्यू २० शहरांमध्ये झाले आहेत. या शहरात करोना संक्रमणाच्या सरासरीतही वाढ झालेली आहे. दुसरीकडे आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार ३० जूनपर्यंत देशात ५ लाख ६६ हजार ८४० इतकी करोना रुग्णांची संख्या होती. जुलै महिन्यात यात सर्वाधिक भर पडली आहे. जून महिन्याच्या तुलनेत जुलै महिन्यात करोनाबाधितांच्या संख्येत २.८ टक्क्यांनी वाढ झाली.

चंद्रकांत पाटील झाले गुजरात भाजपाचे अध्यक्ष :
  • भारतीय जनता पार्टीने गुजरातच्या प्रदेशाध्यक्षपदी खासदार चंद्रकांत रघुनाथ पाटील अर्थात सीआर पाटील यांची निवड केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांचे निकटवर्तीय समजले जाणारे, सीआर पाटील हे गुजरातमधील नवसारी येथील खासदार आहेत.

  • या अगोदर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी जीतूभाई वाघाणी यांच्यकडे होती. त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर आता सीआर पाटील यांची पक्षाने या पदासाठी निवड केली आहे. गुजरातमधील आगामी पोटनिवडणुका, जिल्हा व तालुका पातळीवरील निवडणुकांसह विधानसभा निवडणुकीत पक्षाला यश मिळवून देण्याचे त्यांच्यासमोर आव्हान असणार आहे.

  • एक टेक्नोसॅव्ही नेता म्हणूनही सीआर पाटील यांच्याकडे पाहिले जाते. सोशल मीडियाचा वापर करून ते कायम आपला जनसंपर्क वाढवत असतात. त्यांचे जन्मगाव महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील पिंपरी आक्राउट आहे. १९६० मध्ये भाषावर प्रांतरचना झाल्यानंतर पाटील यांचे कुटुंब गुजरातमध्ये स्थलांतरित झाले.

चंद्रावर ‘प्रज्ञान रोव्हर’ अजून सुस्थितीत? फोटोंवरुन समोर आली नवीन माहिती :
  • चांद्रयान-२ मोहिमेअंतर्गत ‘प्रज्ञान रोव्हर’ला घेऊन रवाना झालेल्या ‘विक्रम लँडर’चा चंद्रावरील सॉफ्ट लँडिंगचा प्रयत्न अयशस्वी झाला होता. . जवळपास १० महिन्यांनंतर आता त्याबाबत एक नवीन माहिती समोर आली आहे.

  • गेल्या वर्षी ‘नासा’च्या फोटोंचा वापर करुन विक्रमचा ढिगारा(डेब्रिस) ओळखणारे चेन्नईचे इंजिनिअर शनमुग सुब्रमण्यन यांनी इस्त्रोला एक ईमेल पाठवून प्रज्ञान रोव्हर काही मीटर पुढे सरकल्याचा दावा केला आहे.

  • भारतीय अवकाश संस्था इस्त्रोला पाठवलेल्या ई-मेलमध्ये शनमुग सुब्रमण्यन यांनी ‘नासा’ने मे महिन्यात जारी केलेल्या फोटोंवरुन प्रज्ञान काही मीटर पुढे आल्याचे संकेत मिळाले असल्याचा दावा केला आहे. दरम्यान, यावर इस्त्रोचे प्रमुख के. सिवन यांचीही प्रतिक्रिया आली आहे.

  • टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना त्यांनी, “आम्हाला याबाबत अजून नासाकडून कोणतीही माहिती मिळालेली नाही. पण, ज्या व्यक्तीने विक्रमचा ढिगारा ओळखला होता, त्याने आम्हाला याबाबत ई-मेल केला आहे. आमचे तज्ज्ञ त्यावर अभ्यास करत आहेत, पण आताच याबाबत काहीही सांगता येणार नाही”,अशी माहिती दिली आहे.

मुलांचे शिक्षण समाजाने ठरवू नये : 
  • कला, विज्ञान, वाणिज्य असे कप्पे नसतील. गणित शिकताना संगीतही जोपासता येईल. ‘कोडिंग’ करताना रसायनशास्त्राचाही अभ्यास करता येईल. मुला-मुलींनी काय शिकायचे हे समाजाने ठरवू नये, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील बदलणाऱ्या शिक्षण पद्धतीची गरज स्पष्ट केली.

  • अखिल भारतीय तंत्रज्ञान शिक्षण परिषद आणि केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने आयोजित केलेल्या ‘स्मार्ट इंडिया हेकेथॉन’च्या समारोपात मोदी यांनी नव्या शैक्षणिक धोरणावर मत मांडले.

  • नव्या शिक्षणात विद्यार्थ्यांना जे शिकावेसे वाटते ते शिकण्याची संधी मिळेल. कोणत्या तरी विषयाच्या आधारावर त्यांची बौद्धिक क्षमता जोखली जाणार नाही. आई-वडिलांना वाटले, लोकांना वाटले म्हणून त्यांनी कुठला तरी विषय शिकण्याची गरज उरणार नाही. केवळ शिकायचे म्हणून पदवी घेण्याची गरज नाही.

  • आत्ताच्या शिक्षणातून साक्षर बनवले जाते पण, त्या अभ्यासाचा पुढील आयुष्यात उपयोग होतोच असे नाही. निव्वळ पदवी घेणे अपुरे ठरते. त्यातून विद्यार्थी आत्मविश्वास गमावतात. त्याचा प्रभाव संपूर्ण जीवनावर होतो, असे मत मोदींनी मांडले. नवे शैक्षणिक धोरण निव्वळ दस्तऐवज नव्हे, देशातील तरुणांच्या आकांक्षा पूर्ण करणारे साधन आहे. त्यातून रोजगार शोधणारे हे तरुण रोजगार देणारे ठरतील, असेही मोदी म्हणाले.

०२ ऑगस्ट चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.