चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०१ नोव्हेंबर २०१९

Date : 1 November, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
अभिमानास्पद…! मराठमोळे सतिश खंदारे लडाखचे पहिले पोलीस महासंचालक :
  • जम्मू काश्मीरमधील कलम ३७० हटवून जम्मू काश्मीर व लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती झाली. केंद्रशासित प्रदेश म्हणून गुरुवारपासून (३१ ऑक्टोबर) अस्तित्वात आलेल्या लडाखच्या पोलीस प्रमुखपदी मराठमोळ्या सतीश खंदारे यांची नियुक्ती करण्यात आली. अमरावतीच्या धामणगावचे सूपुत्र असलेले खंदारे हे लडाखचे पहिले पोलीस प्रमुख ठरले आहेत. ते ११९५च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.

  • सतिश खंदारे हे प्रथम जम्मू काश्मीर कॅडरमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी श्रीनगर परिसरात वेगवेगळ्या जिल्ह्यत जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून पदभार सांभाळला.

  • २००५ मध्ये हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक, २००७ मध्ये पुणे येथे पोलीस उपमहानिरीक्षक, तर सीआरपीएफ नागपूर येथे अतिरिक्त पोलीस महानिरीक्षक, खारघर येथे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल विभागात पोलीस उप महानिरीक्षक म्हणून सेवा दिली. त्यानंतर पुन्हा जम्मू काश्मीरमध्ये दाखल होऊन दोन वर्षे पोलीस महानिरीक्षक म्हणून खंदारे यांनी कार्यभार सांभाळला.

व्होडाफोन इंडिया व्यवसाय गुंडाळण्याच्या तयारीत :
  • दूरसंचार क्षेत्रातील दिग्गज कंपनी व्होडाफोन आपला भारतातील व्यवसाय बंद करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. व्होडाफोनला सततच्या होणाऱ्या तोट्यामुळे कंपनी हा निर्णय घेऊ शकते. आयएएनएस या वृत्तसंस्थेनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. अद्याप कंपनीकडून मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही.

  • दोन वर्षांपूर्वी रिलायन्स जिओने दूरसंचार क्षेत्रात प्रवेश केला होता. त्यानंतर मोफत कॉलिंग आणि अन्य सुविधांमुळे इतर दूरसंचार कंपन्यांचे धाबे दणाणले होते. तर काही कंपन्यांना या शर्यतीत टिकाव धरता आला नसल्यानं त्यांनीदेखील आपला व्यवसाय गुंडाळण्याचा निर्णय घेतला होता. तसंच यानंतर व्होडाफोन आणि आयडिया सेल्युलर या कंपन्यांचं मर्जरदेखील झालं होतं. सध्या व्होडाफोन आणि आयडिया या दोन्ही कंपन्या एकत्रित सेवा पुरवत आहे. परंतु आयएएनएसने दिलेल्या माहितीनुसार व्होडाफोन कोणत्याही क्षणी आपला भारतातील व्यवसाय बंद करण्याची शक्यता आहे.

  • ऑपरेशनल लॉस आणि कॅपिटलायझेशनमध्ये आलेली कमी यामुळे कंपनी हा निर्णय घेण्याची शक्यता आहे. यामुळेच कंपनीला मोठ्या प्रमाणात तोटादेखील सहन करावा लागत आहे.

कॉग्निझंटच्या १३ हजार कर्मचाऱ्यांच्या रोजगारावर टांगती तलवार :
  • माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अमेरिकी कंपनी कॉग्निझंट टेक्नॉलॉजी सोल्युशन्स कॉर्पने व्यावसायिक पुनर्रचना आणि खर्चात कपातीच्या नियोजनानुसार, येत्या काही महिन्यांमध्ये तब्बल सात हजार कर्मचाऱ्यांची कपात करणार असल्याचे गुरुवारी जाहीर केले. शिवाय कंपनी कंटेंट अवलोकन व्यवसायातूही बाहेर पडण्याचा विचार करीत असल्याने आणखी सहा हजार कर्मचाऱ्यांवर नोकरी गमावण्याचे गंडांतर येणार आहे.

  • गंभीर बाब म्हणजे नोकरी गमावणारे बहुतांश कर्मचारी हे भारतातीलच असण्याची शक्यता आहे. सप्टेंबरअखेर कॉग्निझंटच्या वेतनपटावर २,८९,९०० कर्मचारी आहेत. तर त्यापैकी कंपनीचे जवळपास दोन लाख कर्मचारी हे भारतात कार्यरत आहेत. कंपनीच्या कर्मचारी संख्येत भारताचाच मोठा वाटा असल्याने, कपातीची सर्वाधिक झळही भारतालाच बसणार आहे.

  • कॉग्निझंटने तिमाही निकाल जाहीर केल्यानंतर प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात या नोकर कपातीसंबंधाने तपशील दिला आहे. येत्या काही महिन्यांमध्ये जगभरातून कंपनी सुमारे १३ हजार मध्यम आणि वरिष्ठ स्तरावरील कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखविणार असल्याचे यातून स्पष्ट होते.

अनुच्छेद ३७० रद्द करण्याचा निर्णय मोदींकडून सरदार पटेल यांना समर्पित :
  • फुटीरतावाद आणि दहशतवाद यांना प्रोत्साहन देणारी भारतीयांमधील ‘तात्पुरती भिंत’ आता नष्ट झाली असल्याचे सांगून, जम्मू- काश्मीरशी संबंधित अनुच्छेद ३७० रद्द करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सरदार वल्लभभाई पटेल यांना समर्पित केला.

  • सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती असलेला ‘राष्ट्रीय एकता दिवस’ आणि जम्मू- काश्मीर राज्याचे दोन केंद्र शासित प्रदेशांत औपचारिक विभाजन यानिमित्त मोदी यांनी नर्मदेच्या केवडिया वसाहतीत एका मेळाव्याला संबोधित केले. गेली अनेक दशके अनुच्छेद ३७० आपणा भारतीयांमध्ये एका तात्पुरत्या भिंतीसारखा उभा होता. या भिंतीपलीकडील आमचे बंधूभगिनी नेहमीच संभ्रमावस्थेत असत.

  • आज मी सरदारसाहेबांच्या या भव्य पुतळ्यापुढे उभा राहून त्यांच्यासमोर नतमस्तक होत होऊन सांगतो आहे, की काश्मिरात फुटीरवाद आणि दहशतवाद यांना प्रोत्साहन देणारी ही भिंत पडली असून त्यामुळे सरदारसाहेब, तुमचे अपुरे स्वप्न पूर्ण झाले आहे.

देशात आता २८ राज्ये आणि नऊ केंद्रशासीत प्रदेश :
  • तेलंगणा राज्याच्या निर्मितीनंतर देशात २९ राज्ये आणि सात केंद्रशासीत प्रदेश अस्तित्वात होते. जम्मू आणि काश्मीर हा प्रदेशाचा राज्याचा दर्जा गुरुवारपासून रद्द झाला. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचे औचित्य साधीत केंद्र सरकारने जम्मू आणि काश्मीर व लडाख या दोन केंद्रशासीत प्रदेशांची निर्मिती केली.

  • हे दोन्ही केंद्रशासीत प्रदेश अस्तित्वात आले. केंद्रातील सनदी अधिकारी गिरीशचंद्र मुर्मू आणि निवृत्त सनदी अधिकारी राधाकृष्ण माथूर यांनी अनुक्रमे जम्मू आणि काश्मीर व लडाख या दोन केंद्रशासीत प्रदेशांचे नायब राज्यपाल म्हणून कार्यभार स्वीकारला.

  • मावळते राज्यपाल सत्यपाल मलिक यांची केंद्राने गोव्याच्या राज्यपालपदी बदली केली. राज्यपाल पदाच्या तुलनेत नायब राज्यपालपद हे तुलनेत कमी महत्त्वाचे पद मानले जाते. यामुळेच मलिक यांना बदलण्यात आले.

भाकप नेते गुरुदास दासगुप्ता यांचे निधन :
  • देशातील कामगार चळवळीतील अध्वर्यूपैकी एक असलेले भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीआय) ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार गुरुदास दासगुप्ता यांचे गुरुवारी दीर्घ आजाराने निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगी आहेत.

  • १९८५ सालापासून पाच वेळा खासदार म्हणून निवडून आलेले दासगुप्ता यांची तीन वेळा राज्यसभेवर, तर दोन वेळा पश्चिम बंगालमधून लोकसभेवर निवड झाली होती.

  • दासगुप्ता यांचा जन्म ३ नोव्हेंबर १९३६ रोजी सध्या बांगलादेशात असलेल्या अविभाजित बंगालच्या बारिशाल जिल्ह्य़ात झाला होता. विभाजनानंतर ते त्यांचे आईवडील व भावंडे यांच्यासह पश्चिम बंगालमध्ये आले. त्यांनी १९५०च्या दशकात अविभाजित बंगाल प्रांतिक विद्यार्थी महासंघाचे अध्यक्ष आणि सरचिटणीस म्हणून काम पाहिले आणि अनेकदा भूमिगत झाले.

लवकरच धावणार देशातील पहिली ‘वॉटर मेट्रो’ :
  • लवकरच देशातील पहिली वॉटर मेट्रो सेवा सुरू होणार आहे. सर्वकाही नियोजित राहिल्यास केरळमधील कोची शहरात नोव्हेंबर 2020 मध्ये ‘वॉटर मेट्रो’ सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. ही देशातील पहिली ‘वॉटर मेट्रो’ ठरेल. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून पर्यावरण विषयक मंजुरी देखील मिळाली आहे. ही वॉटर मेट्रो 15 मार्गांवर चालेल आणि याद्वारे कोचीच्या आजुबाजूला असलेल्या 10 बेटांशी संपर्क होऊ शकेल. 78 किमीचा प्रवास ही वॉटर मेट्रो करेल.

  • ‘कोची मेट्रो रेल लिमिटेड’कडे(केएमआरएल) या प्रकल्पाची संपूर्ण जबाबदारी असून यामुळे बेटांवरील एक लाखांहून अधिक नागरिकांना फायदा होईल.

  • “नोव्हेंबर 2020 पर्यंत जास्तीत जास्त टर्मिनल पूर्ण करण्याची आमची योजना आहे. कोचीन शिपयार्डने नोव्हेंबर 2020 पर्यंत वॉटर मेट्रोची पहिली बोट सोपविण्याची तयारी दर्शविली आहे. एकदा हा वॉटर मेट्रोचा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर तो आशिया खंडातील सर्वोत्कृष्ट जलवाहतूक प्रकल्प ठरेल, असं केएमआरएलचे व्यवस्थापकीय संचालक अलकेश कुमार शर्मा म्हणालेत.

दिनविशेष :
  • जागतिक शाकाहार दिन

महत्वाच्या घटना 

  • १६८३: छत्रपती संभाजी राजे यांच्या फौजेने फोंडा येथे अद्वितीय पराक्रम करून पोर्तुगिजांचा पराभव केला.

  • १७५५: भूकंप आणि सुनामीमुळे पोर्तुगालमधील लिस्बन शहर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले तर सुमारे ६०,००० ते ९०,००० लोक ठार झाले.

  • १८७०: अमेरिकेत हवामान विभागाने पहिला अधिकृत हवामान अंदाज सांगितला.

  • १८४५: मुंबईत आधुनिक पाश्चात्य पद्धतीचे वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या आद्य ग्रँट मेडिकल कॉलेज या पहिल्या वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रारंभ झाला.

  • १८४८: महिलांसाठी पहिले वैद्यकीय महाविद्यालय बोस्ट्न, मॅसेच्युसेट्स, यूएसए येथे सुरू झाले. नंतर याचे बोस्टन विश्वविद्यालयात विलीनीकरण झाले.

  • १८९६: नॅशनल जिओग्राफिक मॅगझिनमध्ये पहिल्यांदाच नग्न चित्र प्रकाशित झाले.

  • १९२५: गोविंदराव देशमुखांच्या अध्यक्षतेखाली मध्यप्रांत वऱ्हाडातील स्वराज्य पक्षाच्या तिन्ही प्रांतिक समित्यांची एक अनौपचारिक संयुक्त बैठक झाली.

  • १९२८: हिंदुस्थान सरकारने आपल्याला हवे तसे बदल विधेयकात करून त्याचे कायद्यात रुपांतर केले आणि नवी महसूल संहिता वऱ्हाडात लागू करण्यात आली.

  • १९४५: ऑस्ट्रेलियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

  • १९५६: भारतामध्ये भाषावार प्रांतरचना अस्तित्त्वात आली.

  • १९५६: आंध्र प्रदेश राज्याची निर्मिती झाली. त्यावेळी कुर्नुल ही त्याची राजधानी होती.

  • १९५६: दक्षिण भारतातील कन्नड भाषिक प्रदेश एकत्र करुन कर्नाटक राज्याची स्थापना करण्यात आली.

  • १९५६: केरळ राज्य स्थापना दिन.

  • १९५६: कन्याकुमारी जिल्हा केरळ मधुन तामिळनाडूमध्ये हस्तांतरित करण्यात आला.

  • १९६६: पंजाब राज्याची पंजाब व हरियाणा राज्यात विभागणी झाली.

  • १९६८: मोशन पिक्चर असोसिएशन ऑफ अमेरिकाच्या फिल्म रेटिंग सिस्टीमची अधिकृतपणे सुरवात झाली.

  • १९७३: मैसूर राज्याचे नाव बदलुन ते कर्नाटक असे करण्यात आले.

  • १९७३: लखदीप, मिनिकॉय, अग्निदीव बेटांचे नांव लक्षद्वीप असे ठेवण्यात आले.

  • १९८२: अमेरिकेत मोटारगाड्यांचे उत्पादन करणारी होंडा ही पहिली आशियाई कंपनी बनली.

  • १९९३: औपचारिकपणे युरोपियन युनियन स्थापन झाले.

  • १९९४: मराठी चित्रपटसृष्टीतील विशेष कामगिरीचा गौरव म्हणून चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व लेखक दिनकर द. पाटील यांची चित्रभूषण पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

  • १९९९: कवी नारायण सुर्वे यांना मध्यप्रदेश सरकारचा कबीर पुरस्कार हा मानाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला.

  • २०००: सर्बियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

  • २००५: योगेशकुमार सभरवाल यांनी भारताचे ३६वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

जन्म 

  • १८८८: चित्रकार, नेपथ्यकार, रंगभूमिविषयक ग्रंथांचे लेखक पुरुषोत्तम श्रीपत काळे यांचा जन्म.

  • १८९३: शीख धर्माचा समग्र इतिहास लिहिणारे आधुनिक बंगाली इतिहासकार इंदुभूषण बॅनर्जी यांचा जन्म. (मृत्यू: १३ नोव्हेंबर १९५६ – कोलकता, पश्चिम बंगाल)

  • १९१८: विनोदी अभिनेते शरद गणेश तळवळकर यांचा जन्म. (मृत्यू: २१ ऑगस्ट २००१)

  • १९२६: संगीत दिग्दर्शक कवी रेडिओ वरील सुगम संगीत विभाग प्रमुख, शब्द प्रधान गायकी चे लेखक यशवंत देव यांचा पेण येथे जन्म.

  • १९३२: कवी अरुण बाळकृष्ण कोलटकर यांचा कोल्हापूर येथे जन्म.

  • १९४०: भारताचे ३५वे सरन्यायाधीश रमेश चंद्र लाहोटी यांचा जन्म.

  • १९४५: महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोलकर यांचा जन्म. (मृत्यू: २० ऑगस्ट २०१३)

  • १९६०: अॅपल इन्कचे सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कूक यांचा जन्म.

  • १९६३: भारतीय उद्योजीका नीता अंबानी यांचा जन्म.

  • १९७३: अभिनेत्री ऐश्वर्या राय यांचा जन्म.

  • १९७४: क्रिकेटपटू वी. वी. एस. लक्ष्मण यांचा जन्म.

मृत्यू 

  • १८७३: बंगाली नाटककार दीनबंधू मित्र यांचे निधन.

  • १९५०: जागतिक ख्यातीचे बंगाली साहित्यिक बितीभूषण बंदोपाध्याय यांचे निधन. (जन्म: १२ सप्टेंबर १८९४)

  • १९८८: ज्येष्ठ राष्ट्रीय कीर्तनकार गोविंदस्वामी आफळे यांचे पुणे येथे निधन.

  • १९९१: संगीतकार व संगीत संयोजक अरुण पौडवाल यांचे निधन.

  • १९९३: ठुमरी, दादरा व गझल गायिका नैनोदेवी यांचे निधन.

  • १९९४: शेती आणि पाणी विषयाचे तज्ञ, कामगार नेते कॉम्रेड दत्ता देशमुख यांचे निधन.

  • १९९६: श्रीलंकेचे दुसरे राष्ट्राध्यक्ष ज्युनिअस जयवर्धने यांचे निधन. (जन्म: १७ सप्टेंबर १९०६)

  • २००५: लेखिका योगिनी जोगळेकर यांचे निधन. (जन्म: ६ ऑगस्ट १९२५)

  • २००७: भारतीय दिग्दर्शक आणि पटकथा लेखक एस. अली रझा यांचे निधन.

 

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.