चालू घडामोडी आणि दिनविशेष - 01 एप्रिल 2023

Date : 1 April, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
पोलीस भरतीसाठी उद्या लेखी परीक्षा 
  • police recruitment 2023 मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील भरती प्रक्रियेमध्ये रविवार, २ एप्रिलला शिपाई पदाची लेखी परीक्षा पार पडणार आहे. पुरुष उमेदवारांसाठी भाईंदर पश्चिमेच्या नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानात तर महिला उमेदवारांसाठी भाईंदर पूर्वच्या बाळासाहेब ठाकरे मैदानात लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. सकाळी ५ वाजता उमेदवारांना परीक्षा केंद्राच्या ठिकाणी पोहचावे लागणार आहे. सकाळी ८:३० ते १० यावेळेत  लेखी परीक्षा होईल.  

  • उमेदवारांना महाआयटीकडून प्रवेशपत्र देण्यात येणार असून उमेदवारांनी ते महाआयटीच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करायचे आहे. कुठलाही गैरप्रकार होऊ नये, यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे. यासाठी फक्त प्रवेशपत्र सोबत आणायचे आहे. उमेदवारांना पेन आणि पॅडदेखील पुरवले जाणार आहे.

भारताबरोबर संबंध दृढ करण्याचा रशियाचा मनोदय
  • भारत आणि चीनचा ‘ सार्वभौम जागतिक शक्ती केंद्रे’ म्हणून गौरव करून या देशांबरोबर संबंध अधिक दृढ करण्याबरोबर समन्वय वाढविण्याचा मनोदय रशियाने व्यक्त केला.

  • राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी मंजूर केलेल्या परराष्ट्र धोरणाच्या नवीन संकल्पनेची सुरुवात करताना  मॉस्कोने  सांगितले की, रशिया भारताबरोबर राजकीय आणि व्यापारी संबंध अधिक मजबूत करण्यावर लक्ष केंद्रीत करणार आहे.

  • या नव्या धोरणानुसार रशिया मित्र देश नसलेल्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या धोकादायक कारवाया रोखण्यासाठी प्रयत्न करणार आहे. दरम्यान, मास्कोने युक्रेवर आक्रमण केल्यानंतरही भारत आणि रशिया यांच्यातील संबंध मजबूत आहेत.

खुशखबर! Layoffs च्या काळात ‘ही’ भारतीय कंपनी करणार १ हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती
  • संपूर्ण जगभरामध्ये सध्या जागतिक आर्थिक मंदीचे कारण देत अनेक दिग्गक टेक कंपन्या काही विविध क्षेत्रातील कंपन्या मोठ्या प्रमाणात आपल्या कर्मचारीकाची कपात करत आहेत. अनेक कंपन्यांनी तर चार वेळा, दोन वेळा सुद्धा कर्मचारी कपात केली आहे. या कर्मचारी कपातीच्या पार्श्वभूमीवर एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. एका भारतीय कंपनीने या ताळेबंदीच्या वातावरणामध्ये अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. HCLTech ने पुढील दोन वर्षांमध्ये १,००० कर्मचारी नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • PTI च्या वृत्तानुसार HCLTech कंपनी रोमानिया देशामध्ये आपला विस्तार करणार आहे. HCLTech कंपनी गेल्या पाच वर्षांपासून रोमानियामध्ये कार्यरत आहे. ग्राहकांच्या सेवेसाठी देशामध्ये आधीपासूनच सुमारे १,००० लोकांना रोजगार देत आहे. तसेच आता कंपनी स्थानिकांना टेक्नॉलॉजीमध्ये आपले करिअर घडवण्यासाठी अधिक संधी निर्माण व्हाव्यात यासाठी Bucharest आणि Iasi आपल्या ऑफिसचा विस्तार करणार आहे. याबाबतचे आम्ही रोमानियामधील स्थानिकांना टेक्नॉलॉजी क्षेत्रामध्ये करिअर करता यावे यासाठी आम्ही गुंतवणूक करत आहोत असे HCLTech चे रोमानियाचे कंट्री लीड युलियन पडुरारू म्हणाले.
  • HCLTech ने आपला विस्तार करण्यासाठी रोमानियामध्ये अधिक लोकांना कामावर नियुक्त करण्याचे उचललेले पाऊल देशासाठी आणि एकूणच IT उद्योगासाठी एक सकारात्मक पाऊल आहे. कंपनीने घेतला हा निर्णय या देशामध्ये आपला व्यवसाय वाढवण्यासाठी मदतशीर ठरणार आहे.
सरकारी कर्मचार्‍यांसाठी आनंदाची बातमी, आता निवृत्तीचे वय ६० वर्षे, जाणून घ्या…
  • चंदीगडमधील २०,००० हून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांसाठी (Central Government Employees) आनंदाची बातमी आहे. केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक बनवारीलाल पुरोहित यांनी चंदीगडमध्ये (Chandigarh) लागू होणाऱ्या केंद्रीय सेवा नियमांची (Central Service Rules) अधिसूचना जारी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही अधिसूचना जारी झाल्यानंतर आता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय (Central Government Employees Retirement Age) ६० वर्षे होणार आहे. तसेच वेतनश्रेणी आणि डीएमध्ये केंद्रीय कर्मचार्‍यांप्रमाणेच शिक्षकांना दरमहा सुमारे ४००० रुपयांपर्यंत प्रवास भत्ता मिळणार आहे.

  • शाळांमध्ये आता उपमुख्याध्यापक हे पदसुद्धा असणार आहे. तसेच सेवाज्येष्ठतेच्या आधारे त्यांची नियुक्ती केली जाणार आहे. महिला कर्मचाऱ्यांना बाल संगोपणासाठी दोन वर्षांची रजा मिळणार आहे. इयत्ता १२ पर्यंतच्या दोन मुलांच्या पालकांना शिक्षण भत्ता मिळेल.

  • या अधिसूचनेमुळे यूटी कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणी आणि सेवा शर्थींमध्येही बदल होणार आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाने गेल्या वर्षी २९ मार्च रोजी चंदीगड कर्मचारी (सेवा आणि शर्थी) नियम २०२२ अधिसूचित केले होते आणि पंजाब सेवा नियम १ एप्रिल २०२२ पासून केंद्रीय सेवा नियमांसह बदलण्यात आले होते. अधिसूचनेनुसार कर्मचारी थकबाकीसाठी पात्र असतील, केंद्रीय सेवा नियम लागू केल्याने २०२२ पासून निवृत्तीचे वयही ५८ वर्षांवरून ६० वर्षे करण्यात आले आहे.

मोठी बातमी! ‘या’ तारखेपासून Hero Motocorp च्या CEO पदाची धुरा आता निरंजन गुप्ता यांच्या हाती; तब्बल २५ वर्षांचा आहे अनुभव
  • Hero MotoCorp कंपनी देशातील सर्वात मोठी Two Wheeler कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी नवनवीन मॉडेल्स लॉन्च करतच असते. हिरो कंपनीबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे. आता हिरो कंपनीने व्यवस्थापनमध्ये काही बदल करण्याचे निर्णय घेतले आहेत. कंपनीने ३० मार्च २०२३ म्हणजेच काल गुरुवारी निरंजन गुप्ता यांची कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदा (CEO) साठी घोषणा केली आहे.
  • निरंजन गुप्ता हे १ मे २०२३ पासून विद्यमान सीईओ डॉ. पवन मुंजाल यांची जागा घेणार आहेत. म्हणजेच गुप्ता हे १ मे २०२३ रोजी सीईओ पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. तसेच कंपनीने सांगितले की डॉ. पवन मुंजाल हे कंपनीचे कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष आणि पूर्णवेळ संचालक असतील. तसेच नवीन CFO चे नाव नंतर जाहीर करणार असल्याचे कंपनीने सांगितले.
  • गुप्ता यांच्या सीईओ पदावर भाष्य करताना, हिरो मोटोकॉर्पचे कार्यकारी अध्यक्ष आणि पूर्णवेळ संचालक डॉ. पवन मुंजाल म्हणाले, सीईओ पदासाठी त्यांची झालेली निवड ही आम्ही कंपनीमध्ये सुरु केलेल्या मजबूत उत्तराधिकार नियोजन प्रक्रियेची साक्ष आहे.
  • निरंजन गुप्ता सध्या कंपनीच्या मुख्य वित्त अधिकारी, प्रमुख – स्ट्रॅटेजी आणि M&A म्हणून काम करत आहेत. OEM च्या मते, गेल्या ६ वर्षांमध्ये निरंजन यांनी अत्यंत स्पर्धात्मक वातावरणात कंपनीचे आर्थिक स्थिती सुधारण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. हार्ले डेव्हिडसन आणि झिरो मोटरसायकल यांसारख्या जागतिक ब्रँडसह महत्त्वपूर्ण भागीदारी करण्यातही निरंजन गुप्ता यांनी महत्वाची भूमिका बजवाली आहे.
राज्यातील नव्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांसाठी स्थळ निश्चित, जाणून घ्या सविस्तर..
  • अर्थसंकल्पीय अधिवेशनात घोषणा केल्याप्रमाणे राज्यातील अकरा जिल्ह्यातील नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांसाठी स्थळनिश्चिती करण्यात आली आहे. पालघर, गडचिरोली, अमरावती, हिंगोली, वाशीम, जालना, बुलढाणा, अहमदनगर, अंबरनाथ, भंडारा या जिल्ह्यात शंभर विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्न ४३० खाटांचे रुग्णालय निर्माण केले जाईल.
  • जिल्ह्यातील स्थळसुद्धा निश्चित झाले आहे. पालघर येथील दोन एकर जागा असलेल्या जागेत, ग्रामीण रुग्णालयात किंवा कोलगाव येथे महाविद्यालय स्थापन होईल. गडचिरोलीत सामान्य रुग्णालय किंवा स्त्री रुग्णालयातील शिल्लक असलेल्या पाच एकर जागेत प्रस्तावित आहे. तसेच सामान्य रुग्णालयालागून वनविभागाच्या मालकीच्या २२० एकर जागेपैकी ५० एकर जागा उपलब्ध झाल्यास महाविद्यालय स्थापन होईल. अमरावतीत जिल्हा सामान्य रुग्णालय किंवा स्त्री रुग्णालयात तात्पुरत्या जागेत सुरू केले जाईल. मात्र नांदगावपेठ येथे उपलब्ध असलेली १८ हेक्टरची शासकीय जागा विचारार्थ आहे. वाशीममध्ये मालेगाव तालुक्यातील चिवरा येथील ७७ एकर जागा प्रस्तावित आहे.
  • जालन्यात २५ एकर शासकीय जागा उपलब्ध आहे. बुलढाणा येथे आरोग्यधाम परिसरातील २३ एकर जागा हस्तांतरित झाल्यास किंवा बुलढाणालगत हातेडी गावात उपलब्ध असलेल्या २० एकर जागेत बांधले जाईल. अंबरनाथ येथे लोकनगरीलगत २६ एकर जागा प्रस्तावित करण्यात आली आहे. अहमदनगर येथील सामान्य रुग्णालयाच्या परिसरातील जागा प्रस्तावित आहे. भंडारा येथे महसूल विभागाची टेकडीवरील २५ एकर जागा उपलब्ध आहे. हिंगोलीत सामान्य रुग्णालयातील १२ एकरच्या परिसरात किंवा पशुसंवर्धन विभागाच्या जागेत होईल. वर्धा येथे साटोडा गावात १७ एकर शासकीय जागा उपलब्ध आहे. तूर्तास या जिल्ह्यातील आरोग्य विभागाची जिल्हा रुग्णालये तात्पुरत्या स्वरुपात हस्तांतरित करण्याचा निर्णय आहे.

चालू घडामोडी आणि दिनविशेष - 01 एप्रिल 2022

 

विश्वचषक पात्रता फुटबॉल स्पर्धा - मेक्सिको सलग आठव्यांदा पात्र :
  • मेक्सिकोने बुधवारी रात्री झालेल्या अंतिम पात्रता फेरीतील सामन्यात एल सॅल्वॅडोरवर २-० असा विजय मिळवत सलग आठव्यांदा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले. ‘कॉनकॅकॅफ’कडून (उत्तर आणि मध्य अमेरिका आणि कॅरेबियन फुटबॉल संघटनांचा विभाग) कॅनडा, मेक्सिको आणि अमेरिका हे तीन संघ थेट पात्र ठरले आहेत.

  • मेक्सिकोसाठी अ‍ॅझटेका स्टेडियममध्ये झालेल्या लढतीत युरील अँटुनाने १६व्या मिनिटाला गोल केला आणि नंतर पहिले सत्र संपण्याच्या आधी रॉल जिमिनेझने पेनल्टी किकच्या मदतीने गोल करत संघाला २-० अशी आघाडी मिळवून दिली. संघाच्या बचावफळीने अखेपर्यंत ही आघाडी कायम ठेवत विजय सुनिश्चित केला. यापूर्वी, रविवारी टोरंटो येथे कॅनडाने जमैकाला ४-० असे नमवत ३६ वर्षांनंतर पहिल्यांदाचा विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता मिळवली.

  • सॅन जोस : बुधवारी अखेरच्या पात्रता सामन्यात कोस्टा रिकाकडून ०-२ अशा पराभवानंतरही अमेरिकेने विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी स्थाननिश्चिती केली आहे. अमेरिकेचा संघ २०१८मध्ये रशिया येथे झालेल्या विश्वचषक स्पर्धेत पात्र ठरला नव्हता. कोस्टा रिकाकडून जुआन पाब्लो व्हर्गास (५१वे मि.) व अँथनी काँट्रेरास (५९ वे. मि.) यांनी गोल झळकावत संघाच्या विजयात योगदान दिले. गेल्या आठवडय़ात अमेरिकेने पनामावर ५-१ असा विजय मिळवला होता. त्यामुळे उत्तम गोलफरकाच्या बळावर अमेरिकेचा संघ तिसऱ्या स्थानी राहिला.

चीनने भारतावर आक्रमण केल्यास रशिया…”; अमेरिकेने भारताला स्पष्टच सांगितलं :
  • अमेरिकेने रशियाच्यासंदर्भाने भारताबद्दल एक मोठं वक्तव्य केलं आहे. भारताने रशियासोबत व्यापार करु नये यासाठी अमेरिकेकडून बरेच प्रयत्न केले जात होते. त्यामुळे अमेरिकेचे उप राष्ट्रीय सुरक्षा सल्लगार दलीप सिंह यांनी भारताला इशारा देताना चीन आणि रशियाच्या मैत्रीपासून सावध राहण्यास सांगितलंय. चीनने एलओसीचं उल्लंघन केलं तर रशिया भारताच्या बाजूने उभा राहील असा विचार करु नये असं दलीप सिंह यांनी म्हटलं आहे.

  • रशिया आणि चीनमधील मैत्रीचं नातं हे फार घट्ट असून हे दोन्ही देश मित्रराष्ट्र आहेत असं दलीप यांनी म्हटलंय. दलीप सिंह यांनी इशारा दिलाय की जर चीनने भारतावर हल्ला केला तर भारताने या भ्रमामध्ये राहू नये की त्यांचा जुना मित्र असणारा रशिया हा भारताच्या बाजूने उभा राहील. कारण सध्या चीन आणि रशिया हे अधिक जवळ आलेत, असं दलीप सिंह यांनी अप्रत्यक्षपणे म्हटलंय.

  • अमेरिकेचे उप राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार काही दिवसांमध्ये भारत दौऱ्यावर येणार आहेत. त्यापूर्वीच त्यांनी केलेलं हे वक्तव्य फार महत्वाचं मानलं जात आहे. यापूर्वी भारताचे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी त्यांची भेट घेतली आहे. या मुलाखतीनंतरच दलीप सिंह यांनी भारताने रशिया-चीन यांच्या मैत्रीची दखळ घेणं गरजेचं असल्याचं म्हटलंय.

कर्नाटकात हिजाबधारी विद्यार्थिनींना परवानगी देणारे सात शिक्षक निलंबित :
  • कर्नाटकच्या गदग जिल्ह्यात हिजाब घातलेल्या मुलींना कथितरीत्या दहावीच्या परीक्षेला बसू दिल्याबद्दल सात शिक्षकांना निलंबित करण्यात आले असल्याचे शिक्षण खात्यातील सूत्रांनी सांगितले. हे शिक्षक सी.एस. पाटील शाळेत परीक्षा पर्यवेक्षक होते.  याच शाळेत केंद्र अधीक्षक असलेल्या आणखी दोन शिक्षकांनाही निलंबनाची नोटीस देण्यात आली आहे, अशीही माहिती सूत्रांनी दिली.

  • शांतता, सौहार्द व सुव्यवस्था यांना बाधा पोहचवणारा हिजाब किंवा कुठलाही धार्मिक पोशाख घालण्यावर कर्नाटक सरकारने एका आदेशान्वये बंदी घातल्यानंतर, उडुपीतील सरकारी कनिष्ठ महिला महाविद्यालयाच्या काही मुस्लीम विद्यार्थिनींनी या आदेशाला न्यायालयात आव्हान दिले होते.

  • कर्नाटक उच्च न्यायालयाने त्यांच्या याचिका फेटाळून लावल्या होत्या. वरील शिक्षकांची कृती न्यायालयीन आदेशाच्या विरोधात असल्यामुळे त्यांच्याविरुद्ध ही कारवाई करण्यात आली. हिजाब ही आवश्यक धार्मिक प्रथा नसल्याचे सांगून, विद्यार्थ्यांना शाळेच्या गणवेषविषयक निकषांचे पालन करावे लागेल, असा निर्णय उच्च न्यायालयाने दिला होता.

मुंबई आंतरराष्ट्रीय क्रुझ टर्मिनल जुलै २०२४ पर्यंत होणार सुरु :
  • मुंबई आंतरराष्ट्रीय क्रुझ टर्मिनल हे बीपीएक्स – इंदिरा डॉक्स येथे बनत असलेले आयकॉनीक क्रुझ टर्मिनल, जुलै २०२४ मध्ये सुरु होण्याची अपेक्षा आहे. या टर्मिनलची क्षमता वर्षाला २०० जहाजे आणि दहा लाख प्रवसी हाताळण्याची क्षमता आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च ४९५ कोटी रुपये असून, यापैकी ३०३ कोटी रुपये खर्च मुंबई पोर्ट ट्रस्टने वाहन केला आहे आणि उर्वरित खाजगी उद्योजकांनी. भारताचा बंदर विकास कार्यक्रम ‘सागरमाला’ प्रकल्पाला ७ वर्ष पूर्ण झाले, त्या प्रसंगी माध्यमांना संबोधित करताना मुंबई पोर्ट ट्रस्ट प्राधिकरणाचे अध्यक्ष राजीव जलोटा यांनी ही माहिती दिली.

  • हे भारतातील अशा प्रकारचे पहिलेच आयकॉनीक सी क्रुझ टर्मिनल आहे, जे ४.१५ लाख वर्ग फुट क्षेत्रावर बांधले गेले जाईल, येथे २२ लिफ्ट्स, १० एस्क्लेटर्स आणि ३०० चारचाकी वाहनांसाठी बहुमजली वाहनतळ असेल. या डॉकवर एकावेळी दोन क्रुझ जहाजे लागू शकतील.

  • राजीव जलोटा यांनी माहिती दिली की, येणाऱ्या काळात अंतर्देशीय आणि आंतरराष्ट्रीय कृझिंग म्हणजेच जलवाहतूक हाच मुंबई पोर्ट ट्रस्टचा प्रमुख उपक्रम असण्याची अपेक्षा आहे. मुंबई पोर्ट ट्रस्ट प्राधिकरण क्रुझ पर्यटन, प्रवासी वाहतूक आणि जहाज दुरुस्ती यावर विशेष लक्ष देणार आहे, असेही ते म्हणाले. मुंबई, गोवा, कोची आणि भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील बंदरे देशाची क्रुझ केंद्रे म्हणून स्थापित करण्यासाठी आणि भारताची क्रुझ व्यवसायाचे केंद्र म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी मे महिन्यात एका क्रुझ परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

PAN Aadhaar Link करण्याची आजची शेवटची तारीख, लिंक न केल्यास…; प्राप्तिकर विभागाचा इशारा :
  • करदात्याला आधार आणि प्राप्तिकराचा कायम खाते क्रमांक अर्थात ‘पॅन’ यांच्या संलग्नतेसाठी (PAN Aadhaar Link), गुरुवार ३१ मार्च हा अखेरचा दिवस आहे. त्यानंतर मात्र पॅन आणि आधार संलग्न न करणाऱ्या करदात्यांना ५०० ते १००० रुपयांचा दंड भरावा लागेल, असे प्राप्तिकर विभागाकडून बुधवारी सांगण्यात आले.

  • प्राप्तिकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार अनेकवार दिल्या गेलेल्या मुदतवाढीनंतर, आधारशी पॅन क्रमांक संलग्न करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च २०२२ निश्चित केली गेली आहे. तिला आणखी मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता नाही. त्यामुळे अंतिम मुदतीचे पालन न केल्यास पॅन निष्क्रिय केले जाईल. करदात्यांने ३१ मार्च २०२२ नंतर तीन महिन्यांच्या कालावधीत म्हणजेच ३० जून २०२२ पर्यंत आधार-पॅन जोडणी केल्यास त्यावर ५०० रुपये विलंब शुल्क आकारले जाणार आहे. ही मुदतही उलटून गेल्यास, अशा चुकार करदात्यांवर १,००० रुपये दंड आकारला जाईल.

  • दंडाची रक्कम भरल्यानंतर संबंधित करदात्याचा ‘पॅन’ कार्यान्वित करण्यात येईल, असेही प्राप्तिकर विभागाने स्पष्ट केले आहे. विविध आर्थिक व्यवहारांची पूर्तता करण्यासाठी आधार आणि पॅनची संलग्नता अनिवार्य आहे.

  • बँक खाते उघडणे, स्थावर मालमत्तेची खरेदी-विक्री किंवा ओळखीचा पुरावा यासारख्या विविध व्यवहारांसाठी पॅनचा वापर केला जातो. पॅन निष्क्रिय झाल्यास करदात्यांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागू शकते.

विश्वचषक कार्यक्रमपत्रिकेसाठी विभागरचनेनुसार संघ जाहीर :
  • विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या शुक्रवारी होणाऱ्या कार्यक्रमपत्रिका निश्चिती सोहळय़ासाठी गुरुवारी ‘फिफा’कडून चार विभागरचनेनुसार संघ जाहीर करण्यात आले आहेत.

  • यात मेक्सिको व अमेरिका यांना दुसऱ्या विभागात स्थान देण्यात आले आहे. पनामाकडून पराभूत झाल्यामुळे कॅनडाचा संघ तिसऱ्या विभागाऐवजी चौथ्या विभागात असेल. पहिल्या विभागात यजमान कतारसह गुरुवारी ‘फिफा’ने जाहीर केलेल्या जागतिक क्रमवारीतील सात बलाढय़ संघांचा समावेश असेल. चौथा विभागवगळता इतर विभागातील संघ जागतिक क्रमवारीनुसार सहभागी होतील. चौथ्या विभागात क्रमवारीनुसार पाच देशांसह उर्वरित तीन पात्रता फेरीचे संघ सहभागी होतील. चार विभागांतील एक संघ प्रत्येक गटात असेल. आठपैकी पाच गटांत जास्तीत जास्त दोन युरोपियन संघ असतील.

  • विभाग १ : कतार (यजमान),ब्राझील, बेल्जियम, फ्रान्स, अर्जेटिना, इंग्लंड, स्पेन, पोर्तुगाल.

  • विभाग २ :   मेक्सिको, नेदरलँड्स, डेन्मार्क, जर्मनी, उरुग्वे, स्वित्झर्लंड, अमेरिका, क्रोएशिया.

  • विभाग ३ : सेनेगल, इराण, जपान, मोरोक्को,सर्बिया, पोलंड, दक्षिण कोरिया, टय़ूनिशिया.

  • विभाग ४ :  कॅमरून, कॅनडा, एक्वाडोर, सौदी अरेबिया, घाना, पेरू/ऑस्ट्रेलिया/संयुक्त अरब अमिराती, कोस्टा रिका/न्यूझीलंड, वेल्स/स्कॉटलंड/युक्रेन.

  • ’ वेळ : रात्री ९.३० वाजता ’  थेट प्रक्षेपण : व्हूट, हिस्ट्री टीवी १८

०१ एप्रिल चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.